‘लव्ह जिहाद’ नसतोच म्हणणार्‍यांनो...

    11-Mar-2023   
Total Views |
Love Jihad

 
दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून मुंबई,ठाणे, नवी मुंबई, रायगड, पनवेल, नाशिक, पुणे या सात शहरांमध्ये जानेवारीपासून ‘माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’च्या सभा घेतल्या. पहिल्या टप्प्यात जानेवारी ७ ते मार्च ११ पर्यंत म्हणजे जवळजवळ एका महिन्यांत ३० सभा झाल्या. या प्रत्येक सभेत आलेले अनुभव अतिशय महत्त्वाचे आणि ‘लव्ह जिहाद’विरोधात लोकभावना किती तीव्र आहेत, हेच सांगणारे आहेत. ३० सभांमध्ये आलेले काही विशिष्ट अनुभव इथे मांडत आहे. ‘लव्ह जिहाद’ नाहीच आणि महाराष्ट्र सरकारच्या समर्थनाने मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती कशी गरजेची नाही, ती घटनेविरोधी आहे, हे म्हणणार्‍या सगळ्यांसाठी हा लेख प्रपंच!

“हे बघा, आमच्या गावामध्ये कसला आलाय मेला ‘जिहाद.’ सगळे एकातले एक. तरीपण काय आहे ते ऐकायला आलो.” पेणमध्ये एकाच दिवशी ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’च्या चार सभा आयोजित केल्या होत्या. त्यावेळी तो ग्रामस्थ म्हणाला. सभा सुरू झाली. ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय? त्याचे परिणाम काय? त्यासंदर्भातल्या घटना सांगितल्या. विषय मांडणी झाली आणि तो ग्रामस्थ आला. म्हणाला, “अगं लेकी, जरा आधी तरी यायचस. याला ‘लव्ह जिहाद’ बोलतात का? हे तर आमच्या गावात झालेलं हाय.” एक घटना त्यांनी सांगितली की, गावाचे शहरीकरण होत आहे. जुने वाडे पाडून इमारती उभ्या राहत आहेत. ही सगळी कामं करण्यासाठी ‘मॅनपॉवर’ लागते. स्वस्तात बाहेरचेच मजदूर मिळणार. पण, या मजुरी करणार्‍या १९-२० वर्षांच्या पोरांसोबत चांगल्या घरच्या कर्त्या बायका पळून गेल्या. तेही घरचे दागिने, पैसेअडके घेऊन. एकाने तर एकाच गावातल्या दोन समाजातील बायकांना पळवून नेले. या बायका हिंदू आणि मुलगा मुसलमान. हळूहळू हे प्रमाण वाढतंय. बायांच्या पेशावर आता त्या पोरांनी ऐश करायला सुरुवात केली. कामधंदे सोडले. आता ते मजा करतात. बायका अखेरीस पस्तावल्या. पण आता काय होणार? तर हे असं सगळं ‘लव्ह जिहाद’ असतं, हे माहिती असते, तर त्या सगळ्या वेळीच सावध झाल्या असत्या.

ग्रामस्थांचे म्हणणे मला नवीन नव्हते. रूपाली चंदनशिवेचा गळा ती मुस्लीम पद्धतीने राहत नाही म्हणून तिच्या पतीने-इकबालने निर्घृणपणे चिरला. त्यानंतर तिच्या घरातल्यांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यावेळी भर पावसात गुडघाभर चिखलात अर्धा तासांत चालत मंत्री मंगलप्रभात लोढा आणि पत्रकार म्हणून मी, तसेच करिश्मा भोसले, आम्ही रूपालीच्या घरी गेलो होतो. या अर्ध्या तासात छत्रीसुद्धा घेऊ शकलो नाही. कारण, दोन चाळीतील अंतर एक हातसुद्धा नव्हते, तर चिंब भिजत आणि चिखलाने माखलेले आम्ही तिच्या घरी गेलो. मंगलप्रभात लोढांनी घरच्यांचे सांत्वन केले. ‘लव्ह जिहाद’ला थारा नाही. दोषीला शासन होणार असे ते म्हणाले. पण, मंगलप्रभात लोढा पुढे गेल्यानंतर रूपालीच्या बहिणीचे म्हणणे होते. माझ्या बहिणीसोबत ‘लव्ह जिहाद’ नव्हते. तिच्याकडे कुणी ‘लव्ह जिहाद’ नाही आला. तिला वाटत होते की ‘लव्ह जिहाद’ म्हणजे कुणीतरी एक व्यक्ती आहे. त्यानंतर करिश्मा भोसलेने तिला समजावले की, ‘लव्ह जिहाद’ कशाला म्हणतात ते. यावर तिचे म्हणणे, “याला ‘लव्ह जिहाद’ म्हणतात हे मला माहितीच नव्हते,” तर नागेवाडीतल्या त्या अत्यंत वंचित झोपडपट्टीतील गरीब कुटुंबातल्या त्या मुलीला ‘लव्ह जिहाद’ माहिती नव्हता. यात काय आश्चर्य? तसे तर सुप्रिया सुळेंनीही म्हटले की, त्यांना म्हणणे ‘लव्ह जिहाद’ माहिती नाही. ‘लव्ह जिहाद’ काय आहे?

कालच जितेंद्र आव्हाड यांनी मंगलप्रभात लोढा यांच्या विधानावर हरकत घेत भर विधानसभेत म्हटले की, ”महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या लाख घटना घडल्या नाहीत, तर केवळ ३ हजार, ६९३ घटना घडल्या. आम्ही ज्याला ‘इंटरफेथ मॅरेज’ म्हणतो, ते त्याला ‘लव्ह जिहाद’ म्हणतात.” म्हणजेच, जितेंद्र आव्हाड या मंत्री राहिलेल्या व्यक्तीलाही माहिती नाही की, ‘लव्ह जिहाद’ म्हणजे आंतरधर्मीय विवाह नाही, तर एखाद्या मुलीशी आंतरधर्मीय विवाह करून तिला फसवून तिचा छळ करणे अगदी श्रद्धा वालकरसारखे ३६ तुकडे करणे होय.काल विधानसभेमध्ये ‘लव्ह जिहाद’ विषयावरची खडाजंगी पाहिली. जितेंद्र आव्हाड, अबू आझमी या मंडळींना ‘लव्ह जिहाद’ आहे या शब्दावरही आक्षेप आहे. अजून किती मुली मेल्या, तडफडल्या तर यांची शांती होऊन यांना वाटेल की, ‘लव्ह जिहाद’ आहे म्हणून. ज्याचे जळते त्यालाच कळते. आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीची सदस्य म्हणून नाही, तर गेले २० वर्षे सामाजिक कार्य करताना जे अनुभव आहेत,त्याचा परिपाक मंत्री गुलाबरावांनी मांडला. काल की, ‘लव्ह जिहाद’चा बळी गेलेल्या मुलीच्या बापाला फाशी घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. इतका तो हतबल होतो. तळाहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या लेकीला दिवसाढवळ्या प्रेमाच्या नावाने जर कुणी फसवत असेल, तिचा अमानुष छळ करत असले, तर त्या बापाचे मन काय बोलत असेल? त्यामुळेच आ. आशिष शेलारांचे म्हणणे की, एकही हिंदू मुलीचा खून आम्ही सहन करणार नाही, हे महत्त्वाचे आहे, तर दुसरीकडे आ. योगेश सागर यांनी जितेंद्र आव्हाड कुणाची गुलामी आणि का करतात, हा विचारलेला प्रश्नही अगदी योग्यच आहे.

जनमानसात उतरून पाहा, लोकांच्या भावना ‘लव्ह जिहाद’विरोधात किती तीव्र आहेत. लोक आणि समाज काय वेडा आहे की, त्याला काय कामधंदा नाही म्हणून लाखोंच्या संख्येने ‘लव्ह जिहाद’विरोधात रस्त्यावर उतरत आहे.
विधानसभेत आमदार काय बोलले, यावर लिहिण्याचा हेतू हाच की अबू आझमीसारखे लोक ‘लव्ह जिहाद’ नाकारणारच. जितेंद्र आव्हाड त्यांच्या सोयीसवयीनुसार मुंब्र्याचं अढळपद मिळवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ला नाकारणारच. पण, हा माणूस स्वतःला इतर मागासवर्गीयांचा नेता म्हणतो म्हणून त्याचा समाचार घेतला पाहिजे. आज इतर मागासवर्गीयसमाजातही ‘लव्ह जिहाद’विरोधात तीव्र भावना आहेत. मी स्वतः इतर मागासवर्गीय समाजाची असल्याने मी कित्येकवेळा ते पाहिलेलेही आहे. नुसत्या मुलींसोबतचा ‘लव्ह जिहाद’ नाही, तर हिंदू मुलांसोबत होणारा ‘लव्ह जिहाद’ही आहे. त्यामुळे यापुढे जितेंद्र आव्हाडांनी स्वतःला इतर मागासवर्गीयांचा कैवारी वगैरे म्हणू नये. मुंब्र्याच्या त्यांच्या कारकिर्दीवरून महाराष्ट्राभर त्यांना ‘जितेंद्र’पेक्षा ‘जितुद्दीन’ म्हणतात ते का, हे काल विधानसभेत ‘याची देही याची डोळा’ पाहिले.असो. दै. ‘मुंबई तरुण भारत’अंतर्गत ‘माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ सभा घेताना २०० ते ३०० किशोरवयीन मुली आणि त्यांचे पालक असतात. त्या मुली सभा संपल्यानंतर येऊन हमखास सांगतात, “ताई, तुम्ही जे बोललात, ते एकदम बरोबर आहे. माझ्या मैत्रीणीसोबत हे झाले आहे,” तर काही महाविद्यालयातील प्रोफेसर तसेच विश्वस्तांनी खास बैठक घेऊन सांगितले की, “हे सगळे आमच्या इथे घडलेले आहे. पण, मुलींशी मोकळेपणाने कसे बोलावे हेच कळत नव्हते. बरे झाले तुम्ही बोललात.

सोनाराने कान टोचले ते बरे झाले.” सभा झाल्यानंतर मुलींमध्ये काही फरक पडला का? किंवा त्यानंतर काय खबरदारी घेतली, यावर त्यांचे उत्तर होते - मुलींना ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय, हे कळले. त्यामुळे त्यापासून त्या सावध झाल्या. ज्या त्या मार्गात वळत होत्या, त्यांना जरा ब्रेक लागला. हे सगळे यासाठी लिहिते की, ज्यांना वाटते ‘लव्ह जिहाद’ नाहीच. त्यांना आमंत्रण देते की, या सगळ्यांसोबत तुमची पुराव्यासकट बैठक ठेवते. तळागाळात काय चालले आहे ते कळेल. ‘लव्ह जिहाद’चा भस्मासूर कसा संस्कृतीला, या देशाच्या, या धर्माच्या आणि समाजाच्या वैभवाला चुड लावत चालला आहे, ते कळेल.अशीच एक आठवण. नाशिक सटाण्याला ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभा होती. अत्यंत प्रतिष्ठित समाजमान्य व्यक्तीने सभा ठेवली हेाती. त्यांची मोठी शैक्षणिक संस्था. त्यांचे नाव लिहीत नाही. कारण, त्यांना आणखीन त्रास होऊ नये असे वाटते. त्यांच्या पत्नीने एका ग्रुपवर त्या सभेचे निमंत्रण टाकले. सभेसाठी मी त्यांच्या घरीच उतरले होते. इतक्यात पत्नीला फोन आला. तिला वहिनी म्हणू. वहिनी फोनवर बोलू लागल्या की, “अहो आम्ही मुस्लिमांना शिव्या देण्यासाठी सभा नाही ठेवली. आपली लेकंबाळ फसू नये, ‘लव्ह जिहाद’चा बळी ठरू नये म्हणून सभा ठेवली.” तरी समोरून तिला काहीबाही ऐकवले जात असेलच. त्यामुळे अस्वस्थपणे तिने फोन ठेवला. काय झाले विचारल्यावर ती म्हणाली, “मी शहराचे जिजाऊ ब्रिगेडचे काम बघते.

आमच्या वरिष्ठ पदाधिकारी बाईंचा फोन आला. त्या म्हणाल्या की, सभा का घेतली? ग्र्रुपवर निमंत्रण का टाकले? जातीवाद का पसरवता? ‘लव्ह जिहाद’ हा विषय असतो का? उगीच सभा ठेवल्यानंतर दंगल झाली, तर जबबादार कोण?” हे सगळे त्यांच्या पतीने ऐकले. मला वाटले बहुतेक सभा रद्द होणार. इतक्यात संतापाने थरथरत तिच्या पतीने त्या वरिष्ठ पदाधिकारीला फोन लावला आणि ते म्हणाले,”आम्ही पण मराठा आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत. धर्मासाठी हालहाल मृत्यू पावलेल्या शंभूराजांचे आम्ही वारस. जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड याच्याशी म्हणूनच आम्ही जोडले गेलो. जिजाऊंनी हिंदू स्त्रियांना त्रास देणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश छत्रपतींना दिले. आज आपण साधी सभा घ्यायची नाही. आम्ही घेणार सभा. कारण, आपल्या हिंदू लेकीबाळींचे रक्षण करण्यासाठीची सभा घेतली नाही, तर हा छत्रपतीचे आणि शंभूमहाराजांचे नाव घेण्याची आमची लायकी राहणार नाही,” असे म्हणून त्या भल्या हिंदूंने एक नाही, तर त्याच दिवशी तीन ठिकाणी ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त’ शहर सभा आयेजित केल्या.दुसरे असे की मला नेहमीच फोन येतात. थरथरत्या रडवेल्या आवाजातली ती आई तरी असते नाही तरी बाबा तरी असतो. लेकीची काळजी त्यांच्या आवाजात काळीज चिरून जाते. आपली लेक कशी फसली, हे सांगताना त्यांना अश्रू आवरतनाहीत. हे सगळे फोन करणारे आईबाबा काय परग्रहावरचे आहेत का? त्यांची काळजी, त्यांची चिंता, त्यांचे दुःख ऐकून, पाहून खरंच काळीज फाटतं. त्यामुळेच ‘लव्ह जिहाद’ नाहीच, असे म्हणत सत्तेच्या हस्तिदंती मनोर्‍यात बसण्यासाठी मुस्लीम लांगुलचालन करणार्‍यांनी फक्त इतकाच विचारा करावा- ‘लव्ह जिहाद’मध्ये तुकडे झालेल्या श्रद्धाच्या ऐवजी त्यांच्या घरातले कुणी असते तर? खूप अघोरी आणि विकृत वाटतील हे विचार. पण, असा विचार करून त्यांनी एकदा तरी पाहावाच!

या सगळ्यांनी ‘लव्ह जिहाद’ कशाला म्हणतात, याचा एकदा तरी खरा अर्थ जाणून घ्यायला पाहिजे. तसेच आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीचे कार्य आणि त्यासंदर्भातला ‘जीआर’ वाचला पाहिजे. पण ते करण्यासाठी आवश्यक असलेली संवेदनशीलता आणि समाजनिष्ठा या सगळ्याकंडे आहे का? मुळात सज्ञान मुस्लीम मुलगा आणि सज्ञान हिंदू मुलगी यांच्या विवाहाला ‘लव्ह जिहाद’ म्हणतच नाही. तसेच, आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती कोणाचे विवाह रोखण्यासाठी नाही, तर आंतरधर्मीय विवाहानंतर संबंधित पतीपत्नीच्या कुटुंबात विवाद झाले, तर समन्वय साधण्यासाठी मदत करण्यासाठी आहे. कारण, आंतरधर्मीय विवाहानंतर संबंधित दोन कुटुंबात बोलचालही नव्हती म्हणूनच रूपाली आणि श्रद्धा यांचा बळी गेला. आतंरधर्मीय विवाह केल्यानंतर दोन परिवारात सामजंस्य राहावे आणि पतीपत्नी देाघांनाही कौटुंबिक आणि सामाजिक कायदेशीर आधार असावा, यासाठीही समिती. तसेच मुलगी मुस्लीम असली आणि मुलगा हिंदू असेल आणि मुलीला त्रास झाला तर? तर त्या मुलीच्या सहकार्यासाठीही समिती काम करणार. हिंदू मुस्लीमच का? ख्रिश्चन बौद्ध, पारशी, जैन सगळ्याच समाजातील मुलामुलांनी आंतरधर्मीय विवाह केले, तर त्यांच्या परिवाराच्या समन्वयासाठी ही समिती असणार आहे. पण, ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबटच.’ त्यामुळे ज्यांना वाटते की मुलींनी प्रेमाच्या नावाने फसवणूक करून घेऊन तडफडून मेलेच पाहिजे. त्यांचा आतंरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीला विरोध असणारच आणि ‘लव्ह जिहाद’ला समर्थन असणारच! पण, कितीही समर्थन कराल तरी लोकभावना कशा थांबवणार?

कदाचित त्यांना वाटेल की आपण सत्ताधारी आहोत, आपल्याकडे असे काही घडणार नाही. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पिनराई विजयन यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचा विणाचा विवाह ‘डेमॉक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद रियाज यांच्याशी का लावला? कोणत्या परिस्थितीत केला? ते त्यांचं खासगी जीवन. मात्र, एका गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या स्वप्ना सुरेश हिने आरोप केला आहे की, ”पिनराई विजयन यांचे सोन्याची तस्करीच काय, सगळ्याच अवैध धंद्यांना समर्थन आहे. ते त्यांच्या मुलीसाठी काहीही करू शकतात.” आपण दुबईला पिनराई यांना लाखो रुपयांनी भरलेली बॅग दिली आहे, असेही तिचे म्हणणे. आता केरळचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून पिनराई विजयन त्यांचा जावई मोहम्मद रियाज याचे नाव पुढे करत आहेत. या सगळ्यामागचा तर्क कोणता असेल? सुज्ञ वाचकांना याचा मागोवा लागेलच. धूर्त सत्ताधारी पिनराई विजयन यांची ही गत तर बाकीच्यांचे काय? राखी सावंत. तिच्यावर काही लिहिण्याइतके दिवस वाईट आले नाहीत. पण, तिचा उल्लेख यासाठी की, आदिलसाठी ती फातिमा झाली. त्याने धोका दिला म्हणत तिने त्याला तुरुंगात टाकले. तिने सुरुवातीला ‘लव्ह जिहाद’नाकारला. मात्र, तीही एकदा म्हणाली की, “मला सुटकेसमध्ये जायचे नव्हते.” सुटकेस, फ्रिज आज ‘लव्ह जिहाद’चे परवलीचे शब्द झालेत. आता सांगा? ‘लव्ह जिहाद’ नाकरणारे कोणत्या नंदनवनात राहत आहेत?

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.