‘अभिनय कट्ट्या’चा ‘हिरो’

    10-Mar-2023   
Total Views | 129
Atharva Nakati

‘अभिनय कट्ट्या’वर अभिनयाचा श्रीगणेशा करून थेट चित्रपटसृष्टीला गवसणी घालणार्‍या अथर्व किरण नाकती या होतकरू युवा कलाकाराविषयी...

अभिनय आणि दिग्दर्शनाचे बाळकडू घरातच लाभलेल्या अथर्व किरण नाकती याचा जन्म १७ नोव्हेंबर, २००३ साली ठाण्यात झाला. ठाणे शहरातच प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेऊन सध्या तो ‘वझे-केळकर महाविद्यालया’मधून ‘बीएमएम’ पूर्ण करीत आहे. अथर्वचे वडील किरण नाकती हे ‘अभिनव कट्ट्या’चे संस्थापक आहेत.ठाण्याच्या सांस्कृतिक वारशात भर घालेल असाच इतिहास ‘अभिनय कट्ट्या’चा आहे. घरात धाकटी पात असलेल्या अथर्वच्या अभिनयाची आणि ‘अभिनय कट्ट्या’ची वाटचाल एकाच वेळी सुरू झाली. वडिलांकडून त्याला अभिनयाचे घडे नकळतपणे मिळत गेले आणि ’अभिनय कट्ट्या’वरील विविध कार्यक्रमांच्या तालमीतून त्याला एक वेगळा दृष्टिकोन प्राप्त झाला. लहानपणी झालेल्या संस्कारामुळे अथर्वचे पाय अभिनय क्षेत्राकडे वळले आणि वयाच्या चौथ्या वर्षी तो ’क्राईम डायरी’ या मालिकेच्या माध्यमातून सर्वप्रथम छोट्या पडद्यावर झळकला. तसेच आजूबाजूला प्रोत्साहन देणार्‍या कलेच्या वातावरणामुळे बालवयातच अथर्व अभिनयात पारंगत झाला.

बालनाट्य, एकांकिका, प्रायोगिक रंगभूमी; तसेच मालिका, चित्रपट, वक्तृत्व स्पर्धा यात त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. नाटक, नृत्य, एकांकिका यासाठी प्रकाशयोजना काय असते, ध्वनी कसा तगडा असावा, याची जाण असल्याने त्याने त्याच्या मोठ्या भावाच्या आदित्य नाकती याच्या जोडीने एका बालनाट्याला साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याचे शिवधनुष्य वयाच्या सातव्या वर्षीच पेलले. घरातील कलेच्या वातावरणामुळे त्याच्या या निर्णयाला प्रोत्साहन मिळाल्याने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून अथर्व नावारूपाला आला. या संधीचे सोने करीत अथर्वने अभिनय क्षेत्रातील एक एक शिखर पादाक्रांत केले. या संस्थेतून अथर्वने अनेक नाटकांचे लेखन, तसेच दिग्दर्शनही केले आहे. ‘अभिनय कट्ट्या’ला त्याने अनेक बक्षिसेदेखील मिळवून दिलीत. मालिका, चित्रपट, नाटक एवढेच नाही, तर जाहिरात क्षेत्रातदेखील अथर्वने बालकलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. मालिकांमध्ये चांगलाच जम बसवल्यानंतर अथर्वने बालनाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला.

‘झी मराठी’वरील ‘का रे दुरावा’ मालिकेतील ’चिनू’, ‘झी युवा’वरील ‘ज़िन्दगी नॉट आऊट’ मालिकेतील ’किकू ’ या त्याच्या भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या. सध्या मराठी रंगभूमीवर सुरु असलेले ‘जिगीषा’ निर्मित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ’हरवलेला पत्त्यांचा बंगला’ या नाटकात अथर्व आपली अदाकारी साकारत आहे. अशा अनेक मालिका व चित्रपटांमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारताना अभिनयासोबत ‘सिनेमॅटोग्राफी’ आणि ‘व्हिडिओ एडिटिंग’ अशा तांत्रिक विभागातसुद्धा काम करण्याची आवड असल्याचे अथर्व सांगतो.‘अभिनय कट्ट्या’वरूनच आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या अथर्वला कलेची प्रेरणा तेथूनच मिळाली. एकपात्री, द्विपात्री, एकांकिका, ‘स्किट’ करीत असताना अभिनय त्याच्या अंगात भिनला. या अपूर्व योगदानामुळे त्याला ‘कला क्रीडा महोत्सव २०१६’मध्ये शॉर्टफिल्मसाठी ‘बेस्ट स्पेशल अ‍ॅक्टर’, ‘ब्ल्यू फिल्म एंटरटेनमेंट फेस्टिव्हल’मध्ये ‘बेस्ट अ‍ॅक्टर’, ‘अखिल भारतीय नाट्य परिषदे’तर्फे २०१३ साली आयोजित केलेल्या ’राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय स्पर्धे’त द्वितीय पारितोषिक, ‘अभिनय कट्टा सन्मान सोहळ्या’त उत्कृष्ट बालकलाकार, ‘कला क्रीडा महोत्सव - २०१६’ या एकपात्री स्पर्धेतही त्याने प्रथम पारितोषिक पटकावले. अभिनय, साहाय्यक दिग्दर्शक या भूमिका सहजगत्या पेलणार्‍या अथर्वला संगीताचीदेखील विशेष आवड असून किबोर्ड, ड्रम आदी वाद्ये तो लिलया वाजवतो.

संगीतात रूची असल्याने अथर्वचे पाय विविध गाण्यांवर थिरकतात किंबहुना तो नृत्यही उत्तम सादर करतो. त्याने सादर केलेल्या एका काव्य अभिनय स्पर्धेतील त्याच्या ’मेरी माँ’ या प्रवेशासाठी उत्कृष्ट पारितोषिकही मिळाल्याचे तो सांगतो.अथर्वला भविष्यात अभिनयातच करिअर करायचे असून एक सहृदयी अभिनेता बनायचे आहे. या अनुषंगाने “लवकरच मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत काम करताना मी दिसेन,” असे तो सांगतो. युवा पिढीला संदेश देताना, “तुमची जी आवड आहे त्यातच करिअर करा,” असे तो आवर्जून नमूद करतो.‘स्लॅम बूक’,‘सिन्ड्रेला’,‘लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड’, ‘झालाय दिमाग खराब’, ‘मेमरी कार्ड’ या सिनेमांमधून आपल्या कलेची अदाकारी सादर केलेल्या अथर्वने आतापर्यंत विविध मालिकांमधून भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय विविध मासिके व वाहिन्यांवरील जाहिरातीतही अथर्व चमकत आहे. याखेरीज अनेक वक्तृत्व स्पर्धा, एकांकिका, लघुपटांमध्येही त्याने आपली वेगळी छाप पाडली आहे.अशा या हरहुन्नरी ठाणेकर युवा कलावंताला भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121