मातीशी नाळ जोडणारा वाटसरु...

    01-Mar-2023   
Total Views |
Jayesh Paranjpe


पर्यावरण आणि पर्यटनाची सांगड घालून एक वेगळा प्रयोग करणार्‍या ‘द वेस्टर्न रुट्स’चे संस्थापक जयेश परांजपे यांच्याविषयी...

जयेश विश्वास परांजपे हे मूळचे पुण्याचे. पुण्यातच त्यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे ‘बीएससी मायक्रोबायोलॉजी’मध्ये पदवी शिक्षणही घेतले. त्याचबरोबर जयेश यांना पर्यावरण आणि प्राणिमात्रांचीही प्रचंड आवड. म्हणून मग पुढे ‘एन्व्हायर्नमेंटल सायन्स’मध्ये (एमएससीचे) त्यांनी पद्व्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नागपूरमधील ‘सातपुडा फाऊंडेशन’ या किशोर रिठे यांच्या वन्यजीव संवर्धन संस्थेत २००४ ते २००६ असे दोन वर्षं त्यांनी काम केले. या संस्थेबरोबर मेळघाट, ताडोबा अशा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांतही काम करण्याची संधी जयेश यांना मिळाली. यानिमित्ताने जंगलातील भटकंतीची त्यांची भूकही भागली. याच संस्थेमध्ये ‘सँच्युरी एशिया’ या मासिकाच्या पुढाकाराने राबविल्या जाणार्‍या ‘किड्स फॉर टायगर’ या प्रकल्पातही त्यांनी आपल्या कामाचा विशेष ठसा उमटविला. याच प्रकल्पातून ओळख झालेल्या ‘सँच्युरी एशिया’सोबत त्यांनी २००९ पर्यंत तीन वर्षं कामाचा अनुभव घेतला.हे काम करत असतानाच इंग्लंडमधील ‘रिस्पॉनसिबल टुरिझम मॅनेजमेंट’ अर्थात ‘जबाबदार पर्यटन व्यवस्थापना’च्या एका कोर्सबद्दल माहिती मिळाली आणि तो करण्याचा त्यांनी निश्चय केला. हा कोर्स करून भारतात परतल्यानंतर स्वतःची‘द वेस्टर्न रुट्स’ ही कंपनी जयेश यांनी सुरू केली.

महाराष्ट्रातील पर्यटन एका वेगळ्या अंगाने सुरू करायच्या उद्देशाने ही कंपनी त्यांनी सुरू केली. महाराष्ट्रातील पर्यटनाची ओळख अष्टविनायक, ठरावीक समुद्रकिनारे आणि अजिंठा लेणी या पलीकडे फारशी गेलेली नाही, असे सांगतानाच त्याला त्यापलीकडे नेण्याच्या प्रयत्नांतून ‘द वेस्टर्न रुट्स’चे काम सुरू झाले.पुण्यात ‘कॉर्पोरेट कल्चर’ बर्‍यापैकी रुजल्यामुळे शनिवार-रविवार बाहेर फिरायला जाणार्‍यांची संख्याही तितकीच मोठी. म्हणून जयेश यांनी पुण्यात हे काम सुरू केले. कोकण, पुणे अशा भागातील काही स्थळे निवडून, त्याला शेतीची, तिथल्या ऐतिहासिक वारशाची जोड देऊन एग आगळेवेगळे पर्यटन जयेश यांनी सुरू केले.
याविषयी सांगताना जयेश म्हणतात की, “पाचगणीतील शेतकर्‍यांशी चर्चा करून माझ्याबरोबर येणार्‍या पर्यटकांसाठी ‘स्ट्रॉबेरी पिकिंग’ म्हणजेच पर्यटकांना स्वतः शेतात जाऊन स्ट्रॉबेरी तोडायला शिकवली जाते आणि स्वतः तोडलेली स्ट्रॉबेरी ते घरी आणू शकतात. यातून शेतीशी, निसर्गाशी, तिथल्या स्थानिक माणसांशी संवाद होत असतो. औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाच्या मागे नेहमीच धावत असलेल्या स्वतःला शेतीशी आणि मातीशी असलेली नाळ यानिमित्ताने जपता येते.”
 
‘स्ट्रॉबेरी पिकिंग’सारखेच आंबे तोडण्यासाठीही पर्यटकांना अशा बागांमध्ये आवर्जून जयेश घेऊन जातात. इतरवेळी बाजारातून आणलेला महागडा आंबा, तो ही मूळ कोकणातील किंवा रत्नागिरीचा असतो की नाही त्याचीही धड शाश्वती नाही. स्वतः भटकून तोडून आंबे आपले की पर्यटकांनाही यामध्ये निश्चित आनंद मिळालेला दिसून येतो. असाच अजून एक पर्यटन प्रयोग ’द वेस्टर्न रुट्स’ राबवते, तो म्हणजे भात लावणी. भाताची रोपे प्रत्यक्षरित्या शेतात जाऊन स्वतः पेरण्याचा अनुभव या पर्यटन कंपनीकडून आपल्याला दिला जातो.या व्यतिरिक्त ‘फूड व्लॉग्स’ म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी फिरून तिथल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक खाद्यपदार्थांविषयी सांगणे, त्यांची चव चाखणे हे सगळं केलं जातं. महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीमध्ये ‘हुरडा पार्टी’ किंवा ‘पोपटी पार्टी’ यांसारख्या ऋतूनुसार येणार्‍या उत्सवांचीही पर्यटकांना सैर घडविली जाते. पर्यावरणाशी निगडित महाराष्ट्रातील वेळास, आंजर्ले, गुहागर येथे ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ यांच्या पुढाकाराने आयोजित कासव महोत्सवाचीही सफर पर्यटकांना घडविली जाते. याबरोबरच शिसवड गावातील ‘काजवा महोत्सव’ हासुद्धा पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव देणारा क्षण असतो, असे जयेश सांगतात.
 
पुण्यातील प्रसिद्ध गणेशोत्सवात ही ‘हेरिटेज वॉक’ही जयेश आयोजित करतात. यामध्ये प्रत्येक गणेश मंदिराची सविस्तर माहिती पर्यटकांना दिली जाते. पर्यावरण, शेती, खाद्यपदार्थ, परंपरा, संस्कृती या सगळ्याबरोबरच ऐतिहासिक स्थळांचा एक माहितीपूर्ण आणि वेगळा अनुभव देणारे ‘हेरिटेज वॉक’ म्हणूनच अनेक पर्यटकांच्या पसंतीस पडल्याचे जयेश आवर्जून नमूद करतात.महाराष्ट्राशी निगडित असलेल्या गोष्टींसोबतच आता ही कंपनी भारतीय स्तरावर जाऊन काम करत आहे. मुख्यत्वे, ‘डेस्टिनेशन’ म्हणजेच स्थळाला महत्त्व देण्यापेक्षा तिथल्या प्रमुख घटकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या टूर्स आयोजित केल्या जातात. यामुळे उद्देश फक्त पर्यटनापुरता मर्यादित न राहता त्या पर्यटकांची पर्यावरणाशी आणि मातीशीही नाळ जोडली जाते.असा हा पर्यावरणाची आवड आणि पर्यटनाचे वेड असलेला पांथस्थ आपली आवड जपण्याबरोबरच इतरांना पर्यटनाच्या माध्यमातून अनुभवसंपन्न करतो आहे. त्याबरोबरच मातीशी असलेलं मानवाचं नातं अधिक घट्ट रुजवण्याचा प्रयत्न करतोय. पर्यावरणाच्या आवडीतून सुरू झालेला असा हा अनोखा प्रवास अनेक वाटसरुंना सोबत घेऊन सुरू आहे. जयेश यांना पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.