तुम्हाला ‘ते’ अजून समजलेले नाहीत

    09-Feb-2023
Total Views |
Editorial on narendra modi ls rs speech

एखादा उद्योजक बदनाम केल्याने मोदी हादरतील असे मानणे बावळटपणाचे आहे. त्यांच्या यशाच्या चढत्या कमानीचे यश हे कष्टाने घातलेल्या पायात आहे.


राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर चर्चा होती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची. आपल्या देशासाठी गर्जना करणार्‍या विन्स्टन चर्चिलची आठवण करून देणारा पंतप्रधानांचा पवित्रा विरोधकांच्या ठिकर्‍या उडवून गेल्या. अदानी प्रकरणावरून व्यक्तिगतरित्या पंतप्रधानांना लक्ष्य केले जात आहे. राहुल गांधींनी अदानी व पंतप्रधानांचे एकत्र फोटो दाखवून संसदेत व देशात खळबळ माजविण्याचा प्रयत्न केला. वस्तुत: अदानी समूहाला मिळालेल्या कामांची यादी तपासली, तर ती बहुसंख्य कामे काँग्रेसच्या काळातच दिली गेली आहेत. मात्र अदानींच्या वाढीच्या मागे मोदींचे सहकार्य असल्याचा दावा करून राहुल गांधींनी यापूर्वीच खळबळ उडवायचा प्रयत्न केला होता. मोदी व अदानी एकत्र असा एक फोटोही त्यांनी दाखविला.


अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान ज्या चर्चा व्हायला हव्या होत्या, त्या न होता अदानींच्या मुद्द्यावरून विरोधकांनी पंतप्रधानांना घेरण्याचा जो प्रयत्न केला तो पंतप्रधानांनी चांगलाच उलटविला. वस्तुत: ’हिडेनबर्ग’ अहवालाची विश्वासहर्ता तेव्हाच समोर आली जेव्हा त्यांनी अदानी समूहाची चिनी लोकांसोबत भागीदारी कशी? अशा आशयाचे अश्न उपस्थित करायला सुरूवात केली. जागतिकीकरणानंतर कोणत्याही देशात जाऊन व्यापार करण्याची मुभा उपलब्ध झाली आणि सर्वच देशांना त्याचा लाभ मिळाला यापूर्वीच प्रगत झालेल्या युरोपीय देशांनी जे स्वत:जवळ मार्ग राखून ठेवले होते, ते सगळ्यांसाठी खुले झाले आणि आशियाई देशांच्या प्रगतीचे मार्ग मोकळे झाले. तुम्हाला चीन किंवा आखाती देशात व्यवसाय करायचा असेल, तर तेथील लोकांशी व्यवहार ठेवणे भागीदारी करणे क्रमप्राप्त आहे. चीनच्या सीमेवरच्या कुरापती लक्षात घेता भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयी राग आहे हे नैसर्गिकच, पण हा सगळा राग अदानी व पर्यायाने मोदींच्या विरोधात वळविण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न होता. अशा भागीदार्‍या काही लपूनछपून होत नाहीत. त्याचे करार मदार असतात.


मात्र, ‘हिडेनबर्ग’सारख्या स्वत:ला शोधपत्रकारिता करणारे म्हणविणार्‍यांनी असे प्रश्न उपस्थित करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न का करावा, हा खरा प्रश्न आहे. अदानींशी जवळीक हा मुद्दा जेवढा तापेल तेवढचे त्यातून अजून कोळसा उगळला जाणार आहे. गोव्यातील कामांचा ‘व्हिडिओ’ बाहेर आला आहे. वाड्रांसोबतचे फोटोही ‘व्हायरल’ होऊन समोर यायला लागले आहेत. खरंतर आपल्याला असे १०० अदानी लागणार आहे. एका बालिश दृष्टिकोनातून उद्योग जगताला पाहण्याची सवय आपल्याला लागली आहे. याच्या मुळाशी सतत इतरांकडे असूयेने पाहणारा अतृप्त समाजवादी विचार आहे. देश म्हणून आपल्याला विस्तारायचे असेल आणि पुढच्या काळात आपल्याला आर्थिक लढायाच लढून आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल, तर पुण्याच्या ‘एस. एम. जोशी फाऊंडेशन’मध्ये व्याख्याने देणार्‍यांपेक्षा आपल्याला अदानींसारखेच लोक लागणार आहेत.


भारताचा प्रभाव निर्माण होण्यासाठी आपल्याला अत्याधुनिक शस्त्रे लागतील, तसेच निरनिराळ्या प्रकारचे यशस्वी उद्योजकही लागतील. ही निश्चित प्रक्रिया पंतप्रधानांच्या डोक्यात नक्की आहे. अदानींवर झालेला हल्ला हा असाच पाहिला पाहीजे. अदानींवर हल्ला केल्याने मोदी कोलमडतील, याच्यापेक्षा मजेशीर समज असता कामा नये. परवा ज्या आत्मविश्वासाने त्यांनी उदाहरणे आणि उत्तरे दिली तो आत्मविश्वास अदानी, अंबानी, बिर्ला यांच्या संगतीतून आलेला नाही. तो एका कसलेल्या राजकारण्याचा आणि कर्मयोग्याचा आत्मविश्वास आहे जो कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढून नवी दिशा दाखवू शकतो. ज्या आर्थिक संकटाच्या दिशेने जग आता वाटचाल करीत आहेत आणि ज्याचे परिणाम दिसू लागले आहेत. म्हणजे हा लेख लिहून होईपर्यंत ‘डेल’ या आघाडीच्या संगणक निर्मात्या कंपनीने सहा हजाराहून अधिक लोकांना घरी पाठवायची तयारी चालविली आहे.


भारतात मात्र अजून त्याची धग आलेली नाही या उलट उत्पादन प्रक्रियांमध्ये अग्रणी म्हणून पुढे येत असलेला देश म्हणून भारत समोर येत आहे. परदेशस्थ भारतीयांना ‘युपीआय’चा वापर करू देण्याची परवानगी देण्याचा निर्णय भारतीय रूपयाला त्याच्या देशवासीयांकडून चलनात आणण्याच्या प्रक्रियेला चालना देणारा निर्णय आहे. यातून रुपयाची प्रतिष्ठा तर वाढणारच आहे, पण भारतीयांना लहान मोठ्या गरजांसाठी डॉलरमधून रूपयात पैसे रुपांतरित करण्याची गरज भासणार नाही. सध्या काही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उपलब्ध असलेली ही सुविधा हळूहळू सर्वत्र पसरेल आणि लोकप्रिय होईल. सध्या ‘जी २०’ देश यात सहभागी व्हायला उत्सुक आहेत. प्रत्येक पुढाकारात भारताला काय मिळाले? या प्रश्नाचे उत्तर त्यांना बरोबर ठाऊक असते. नरेंद्र मोदींच्या यशाची चढती कमान या अशा लहान लहान प्रयत्नपूर्वक आणि कष्टाने केलेल्या कामाचे फलस्वरूप आहे. एखाद्या उद्योजकाला बदनाम केल्याने मोदी हादरतील, असे मानणे शुद्ध बावळटपणाचे आहे.