फडणवीस-शिंदे सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून

९ मार्चला अर्थसंकल्प ; विधिमंडळ कामकाज समितीत निर्णय

    08-Feb-2023
Total Views |
budget-session-of-shinde-government


मुंबई: महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर स्थापन झालेल्या फडणवीस शिंदे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बुधवार, दि. ८ फेब्रुवारी बोलावण्यात आलेल्या विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. २७ फेब्रुवारी पासून सुरु होणार असून २५ मार्चपर्यंत कामकाज चालणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे ९ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडणार आहेत.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात पार पडलेल्या विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अधिवेशन आणि संबंधित इतर मुद्द्यांवर चर्चा झाली.
 
राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झालेला असून त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह एकूण २० मंत्र्यांचा समावेश आहे. विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये सादर करावा लागतो. त्यासाठी मंत्र्यांचे नाव प्राधिकृत करण्याची पद्धत आहे. यंदाच्या मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या कमी असल्यामुळे विधान परिषदेत अर्थसंकल्प कोण मांडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या तरी माजी अर्थमंत्री आणि विद्यमान वन मंत्री सुधीर मुनगंटीवार किंवा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
फडणवीस पहिल्यांदाच मांडणार अर्थसंकल्प !
 
आमदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि आता उपमुख्यमंत्री अशी चौफेर लोकप्रिय आणि वादातीत कारकीर्द गाजवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्याच्या अर्थमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आलेली आहे. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे या कडे सर्वांचे लक्ष आहे. फडणवीस हे अर्थसंकल्पीय तरतुदी, त्यातील बारकावे, त्रुटी, नियम आणि अधिनियम, अर्थसंकल्पाचे वाचन कसे करावे या बाबतीत वाकबगार समजले जातात. अर्थसंकल्प कसा वाचावा यावर एक पुस्तक देखील लिहिले होते. या अर्थसंकल्पात लोकांच्या सूचनांचे प्रतिबिंब असावे, म्हणून फडणवीस यांनी अर्थसंकल्पाविषयी जनतेतून सूचना मागवल्या आहेत.