परमार्थाचे सार - रामनाम

    08-Feb-2023   
Total Views |
The essence of altruism - Ramnaam

आतापर्यंतच्या श्लोकांतून समर्थांनी रामनामाचे म्हणजेच नामस्मरणाचे महत्त्व सांगितले. आपण त्यावर विचार करु लागतो तेव्हा लक्षात येते की, कोणत्याही बाबतीत पूर्ण विश्वास नसल्याशिवाय माणूस त्या मार्गाचे आचरण करीत नाही. हा सर्वसामान्यांचा स्वभावधर्म असतो. त्यामुळे स्वामी आता पुन्हा ८१व्या श्लोकापासून नाममहात्म्य वेगवेगळ्या मार्गांनी समजावून सांगत आहेत.

 
सतराव्या शतकातील स्वामींच्या काळातील स्थिती चिंताजनक होती. राज्य परक्यांचे, शिवाय राज्यकर्ते असंवेदनशील, मूर्तिभंजक आणि हिंदूंचा अनादर, द्वेष करणारे होते. त्याचा परिणाम म्हणून एकंदर समाजाची खालावलेली सांस्कृतिक पातळी समर्थांना पाहवत नव्हती. तेव्हा लोकांच्या आत्मोद्धारासाठी स्वामी हा उपदेश तळमळीने करीत आहेत. आज साडेतीनशे वर्षांनंतरही बाह्य परिस्थितीत अनेक उलथापालथी झाल्या, तरी मूळ सांस्कृतिक पडझड सावरली गेली नाही. त्यात वेगळे विशेष आलेत. लोकमानसातील सांस्कृतिक अस्वस्थता काही कमी झाली नाही. त्यामुळे आजच्या काळातही स्वामींच्या उपदेशांचे महत्त्व कायम आहे. नामाचे महात्म्य प्रतिपादन करताना समर्थ पुढील श्लोक असा सांगतात,

मना मछरें नाम सांडूं नको हो।
अती आदरें हा निजध्यास राहो।
समस्तांमधें नाम हे सार आहे।
दुजी तूळणा तूळितां ही न साहे ॥८१॥


भक्ती करण्यासाठी स्वस्वरुपाचे अनुसंधान साधावे लागते. आपले मन नेहमी आवडीच्या विषयांकडे वळते. त्या आवडीच्या विषयातील नफा-नुकसान माणूस पाहत नाही. सगुण-निर्गुण भक्तीची स्वरुपाची आवड नसल्याने मन तिकडे आपणहून वळत नाही. मनाला उपाधीची आवड असते. भगवंताच्या नामाने उपाधी नसल्याने नाम घेण्याच्या क्रियेला माणूस कंटाळतो. नामस्मरणाला कसले आकर्षण अथवा चव नसल्याने माणूस आपणहून नामसाधनेकडे वळत नाही. असं असतानाही सर्व संत भगवंताच्या मानाचा महिमा सांगत असतात. त्यामुळे सामान्यांच्या मनात एक प्रकारचा मत्सर तयार होतो. माणसाला स्वत:विषयी, स्वत:च्या मताविषयी विलक्षण अहंकार असतो. या अहंकारातून तो दुसर्‍याच द्वेेष-मत्सर करीत असतो. ही देहबुद्धी माणसाला संतांचा त्यांच्या मताचा मत्सर करायला शिकवते. मी बुद्धिमान असल्याने मला कोणी काही सांगू नये. या बुद्धिमत्तेचा गर्व झाल्याने तो इतरांना त्यांच्या विचारांना तुच्छ समजत असतो.

संतांनाही तो तुच्छ समजतो, पण संतवचनाला समाजात मान आहे. त्यामुळे तो संतांचा मत्सर करु लागतो. मत्सर-द्वेष हे विषाप्रमाणे नाशाचे कार्य करतात. विषाने शरीराच्या कुठल्याही भागातून शरीरात प्रवेश केला, तरी ते सर्व शरीरभर पसरते. मत्सराचेही तसेच होते. मत्सर सर्व अंत:करण व्यापून टाकते. म्हणून स्वामी मनाला उपदेश करीत आहेत की, हे मना, या मत्सरामुळे तू नाम सोडू नको. मत्सर आणि नाम यापैकी तुझ्या हिताचे काय आहे. मत्सर सोडून देण्यात तुझे हित आहे. असं असलं तरी भगवंताचे नाम हे अत्यंत आदरपूर्वक घेतले पाहिजे. नाम घेताना नामाविषयी पूज्यभाव असेल, तर मत्सर हळूहळू मावळू लागतो. नामासाठी मनाची शुचिर्भूतता म्हणजे मन शांत होऊन त्याला नामाची गोडी लागेल. नाम हे शिष्याच्या शरणागत भावाने व आदराने घेतले पाहिजे. तसे झाले नाही, तर नामाची क्रिया यंत्रवत होऊ लागते. जपमाळेतील मणी मागे सरत असतात आणि मन भलत्याच विषयात भटकत असते. काही वेळा मन जपसंख्येचा विचार करुन अहंकार निर्माण करीत असते.

माझा अमुक माळांचा जप झाला, मी इतर साधकांच्या पुढे आहे असा गर्व होऊन मन त्यातच रमू लागते. भगवंताच्या नामाऐवजी इतर विचार उत्पन्न करणार्‍या या यंत्रवत क्रियांचा काहीही उपयोग होत नाही. त्याने ना मन आवरले जाते, ना मनाची शुद्धी होते, ना भगवंताचा विचार मन करु लागते. त्यातून अहंकार गर्व ताठा हे विचार मात्र उत्पन्न होतात. काहीवेळा कोणाच्या बोलण्याच्या आवाजाने अशा यांत्रिक जपक्रियेत व्यत्यय आल्याने जपकर्ता क्रोधाने अद्वातद्वा बोलू लागतो. क्रोधाचे पर्यवसान बुद्धिनाशात होते, असे भगवद्गीतेत सांगितले आहे. थोडक्यात भगवंताचे नाम घ्यायचे तर ते आदरपूर्वक नियमितपणे शांतपणे घ्यावे, असा समर्थांचा अभिप्राय आहे. मनाला नामाचा ध्यास लागला पाहिजे, नामाची उत्कट इच्छा उत्पन्न झाली पाहिजे, या सततच्या उत्कट इच्छेला समर्थांनी या श्लोकात ‘निजध्यास’ असे म्हटले आहे. नामस्मरणात अतिआदर आणि निजध्यास असले पाहिजेत, असे समर्थ सुचवतात.

आता आत्मोद्धारासाठी यज्ञ, तपसाधना, व्रतवैकल्ये, उपास, तीर्थयात्रा, दानधर्म, योगसाधना इत्यादी अनेक प्रकार शास्त्रात सांगितले असताना समर्थ नामाचा आग्रह का धरीत आहेत, याचे उत्तर समर्थ श्लोकाच्या तिसर्‍या व चौथ्या ओळीत देत आहेत. यज्ञ, तप:साधना, योगक्रिया इत्यादी प्रकार आज कालबाह्य झाले असले, तरी त्यातील दान-उपवास तसेच तीर्थयात्रा योगासने या क्रिया थोड्या फार प्रमाणात टिकून आहेत. या सर्व क्रियांत ओंकाराला महत्त्वाचे स्थान आहे. ‘ॐ’ हे अक्षर एकप्रकारे भगवंताचे नाम आहे. वेदांच्या सुरुवातीला ‘ॐ’ आहे. ते निर्गुण, निराकाराचे, विश्वात्म्याचे दृश्य स्वरुप मानले आहे. वरील सर्व क्रियांतून मन:शांती, मनाची एकाग्रता, भगवंताची निष्ठा, समाधान इत्यादी गोष्टी फलस्वरुप प्राप्त होणार असल्या तरी नामस्मरणातून त्या सहज प्राप्त होणार, असा संतांचा अनुभव आहे. खर्‍या नामसाधनेने वृत्तीतील अहंकार, गर्व, ताठा हे नाहीसे होतात, तीच अहंकारविरहित स्थिती इतर पारमार्थिक साधनांतून साधता येते म्हणून समर्थ सांगतात, “सर्व आध्यात्मिक क्रियांचे नाम हेच सार आहे. या नामाची तुलना करायची, तर ती दुसर्‍या कशाशीही करता येत नाही.” समर्थ श्लोकांच्या शेवटच्या ओळीत म्हणतात, ‘दुजी तूळणा तूळितां ही न साहे’ हे सत्य आहे.

भगवंताच्या नामाचे श्रेष्ठत्व स्वामींनी प्रतिपादन केल्यावर भगवंताची अनेक नामे मनात येतात. या नामांतून नेमके नाम कसे निवडायचे, असाही प्रश्न आपल्या मनात निर्माण होणे साहजिक आहे. कुणी सांगितले म्हणून यासाठी माणसे वेगवेगळ्या नामांचा प्रयोग करीत असतात. माणसाच्या या धरसोड वृत्तीतून नामाची निश्चितता होत नाही. विचलित मन एका नावावर स्थिर होत नाही. अशावेळी समर्थांसारख्या अधिकारी व्यक्तीचे मत मार्गदर्शक ठरते. समर्थांच्या मते, बहुनामात मन विचलित होणे, मनाची धरसोड वृत्ती तशीच चालू ठेवणे, हे योग्य नाही. या नामाचीं रामनामाबरोबर तुलना होऊ शकत नाही. रामनामात रामांच्या गुणांचा वास असल्याने नाम घेणार्‍यांच्या अंगी ते थोडे तरी उतरतात. त्या अल्प गुणसंपर्काने माणूस उद्धरुन जातो. रामाच्या ठिकाणी कुठेही गर्व-अहंकार-ताठा याचा लवलेश नाही. रामाने अफाट पराक्रम, अद्भुत कार्य करुनही तो त्यापासून अलिप्त आहे. पण, आपल्यासारख्या भाग्यहीन माणसांना रामाचे, रामनामाचे महत्त्व समजत नाही, हे दुर्दैव आहे. अशा अभाग्याला समर्थ ‘पामर’ म्हणजे अत्यंत क्षुद्र म्हणून संबोधतात. तो पुढील श्लोकाचा विषय असल्याने नंतर सविस्तरपणे पाहता येईल. (क्रमश:)




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..