इजिप्तच्या महिला ममी नाहीत!

    08-Feb-2023   
Total Views |
Egyptian content creators arrested over comic prison visit video

एका युवतीचा प्रियकर -नियोजित वर तुरुंगात कैद असतो. ती त्याला भेटायला तुरुंगात जाते. त्यावेळी तो प्रियकर तिला तुरुंगातील त्याची परिस्थिती सांगतो. त्याच्यावर कशाप्रकारे अन्याय झाला, हेे देखील सांगतो. असा एक ‘द व्हिजिट’ नावाचा व्हिडिओ दि. १३ जानेवारी रोजी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. फेसबुकवर हा व्हिडिओ सात दशलक्ष वेळा पाहिला गेला आणि त्यावर तितक्याच प्रतिक्रियाही आल्या. मात्र, या व्हिडिओमध्ये अभिनय करणारे युवक-युवती, व्हिडिओमधील नाट्याचे लेखन करणारे आणि ते नाट्य दिग्दर्शित करणारे असे पाच जण सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावर देशविरोधात खोट्या बातम्या पसरवणे, देशविरोधी कामात फंड पुरवणे देशविरोधी कारवाई करणे, दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी होणे, देशद्रोही वगैरे गुन्हे दाखल झाले आहेत. ही घटना आहे इजिप्तमधली...

इजिप्त सरकारचे म्हणणे की, इजिप्तच्या तुरुंगाचे दृश्य दाखवून या सगळ्यांनी देशविरोधी कारवाई केली आहे. हे सगळे दहशतवादी आहेत. इजिप्तमध्ये हे काही नवीन नाही. गेल्या वर्षी हनीन होसम या युवतीला तीन वर्षांची सजा सुनावण्यात आली. तिच्यावर मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. का तर तिने इन्स्टाग्रामवर एक संदेश पोस्ट केला होता की, १८ वर्षांवरील युवती तिच्यासोबत काम करून सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवू शकतात. आता यात मानवी तस्करी कुठे आली? पण, इजिप्तमध्ये सोशल मीडियावर मत मांडणार्‍यांवर करडी नजर ठेवली जात आहे. समाजअभ्यासकांच्या मते, इजिप्तमध्ये प्रसारमाध्यमांवर व्यक्त झाले म्हणून ६० हजारांच्यावर लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. २०१८ साली इजिप्तमध्ये सोशल मीडिया आणि प्रसारणाबाबत कठोर कायदा बनवण्यात आला. याच अनुषंगातून पाहिले तर इजिप्त सरकार महिलांविषयक अत्याचाराबाबत उदासिनच भूमिका घेतलेली दिसते.

काही महिन्यांपूर्वीची इजिप्तमधील एक घटना. दकाहलिया नावाच्या प्रांतामध्ये हमादा अल अगौज़ नावाच्या इसमाने त्याच्या २६ वर्षीय पत्नीचे शिर कापले आणि तिच्या शिरविहीन धडासोबत त्याने फेसबुक लाईव्ह केले. फेसबुक लाईव्ह सुरू असताना लोकांनी पाहिले आणि पोलिसांना कळवले तेव्हा पोलीस अगौजच्या घरी गेले आणि त्याला अटक केली. पण, अगौजचे म्हणणे की, त्याची ही कौटुंबिक बाब आहे.

गेल्या वर्षीच्या अशाच दोन घटना घडल्या. इजिप्तची एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी नायरा अश्रफ. महाविद्यालयात तिच्यासोबत शिकणार्‍या मोहम्मद आदेल या तरुणाने तिचा भर बाजारात गळा चिरला. आदेलचे नायरावर एकतर्फी प्रेम होते. शेकडो लोक त्यावेळी तिथे होते. तिचा खून करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला. हे वाचूनच आपला जीव हळहळतो. पण, हा व्हिडिओ पाहून इजिप्तमधल्या ९५ टक्के लोकांची प्रतिक्रिया होती. व्हिडिओमध्ये दिसत होते की, नायराने डोक्यावर ‘हिजाब’ घातला नव्हता. ती परंपरा पाळत नसावी. अनेकांनी सोशल मीडियावरच्या तिच्या जुन्या पोस्ट शेअर केल्या. ज्यामध्ये तिने ‘हिजाब’ घातला नव्हता, मान किंवा दंड न झाकणारा पोशाख घातला होता. त्यावर लोकांनी पोस्ट केले होते.

रिवाज न पाळणार्‍या मुलींसोबत असेच घडायला हवे. तसेच, जवळ जवळ ९९ टक्के लोकांनी तिच्या खुन्याप्रती सहानुभूती दर्शविली होती. त्याचे समर्थन केले होते. मुलीने मुलाला नकार द्यायचा? इतकी हिंमत! हे सगळे पाहून मग नायराच्या खुन्याने इजिप्तच्या लोकांना आवाहन केले की, आपल्या परंपरा जपा. कुराण असो की बायबल, जुन्या प्रथा सोडू नका. त्याच्या या विधानानंतर तर काय तो इजिप्तमध्ये तो हिरोच झाला. पण, शेवटी त्याला फाशीची सजा सुनावण्यात आलीच. दुसरी घटना. इस्लाम मोहम्मद याने सलमा नावाच्या युवतीचा खून केला. कारण, सांगितले की त्यांचे प्रेम होते. मात्र, सलमा हात आणि गळा दिसणारे कपडे घालायची. कितीही सांगितले तरी ती ऐकायची नाही. उद्या लग्न झाले असते, तर माझ्या घरातल्यांना सलमाचे वागणे पटले नसते. त्यामुळे तिचा खून केला. काय म्हणावे? इजिप्तमध्ये ममी फेमस असतात. निर्जीव सजलेले पार्थिव. पण, इजिप्तच्या महिला काही ममी नाहीत! त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.