चिंचवड मधून अश्विनी जगताप यांचा अर्ज दाखल!

    06-Feb-2023
Total Views |
bjp-candidate-ashwini-jagtap-filed-application-for-chinchwad-assembly

पिंपरी
: दिवंगत आ. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागेवर भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आज सोमवारी (दि. ६) रोजी पोटनिवडणुकीसाठी थेरगाव येथील निवडणूक कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्याबरोबरच माजी नगरसेवक शंकर जगताप यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. तो डमी अर्ज असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खा. बारणे, आ. महेश लांडगे, चिंचवड विधानसभेचे निवडणूक व प्रचारप्रमुख शंकर जगताप, पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
 
दरम्यान पिंपळे गुरव ते थेरगावपर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी मोठी गर्दी जमली होती. माध्यमांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आम्ही चिंचवड आणि कसबा येथील पोट निवडणूक बिनविरोध करावी यासाठी महाविकास आघाडीचे शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांना विनंती केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शरद पवार यांनी मध्यस्थी केली होती. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी देखील विनंती केली होती. त्या मागणीचा आम्ही विचार केला. आमच्या केंद्रीय पार्लमेंटकडे मागणी केली. त्यानंतर आम्ही ती निवडणूक बिनविरोध केली होती. आता महाविकास आघाडीने चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करावी.

अश्विनी जगताप म्हणाल्या, लोकांनी आम्हाला धीर दिला. आम्ही जसे भाऊंबरोबर होते तसेच आम्ही तुमच्या बरोबर देखील आहोत, अशी हमी दिली. मला त्यांचं मेट्रो सिटीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. शंकर जगताप म्हणाले, भाऊंनी कधीनाकधी अनेकांना मदत केली आहे. त्याची परतफेड म्हणून या मदतीच्या आशेवर सर्वांनी वहिनींना पाठींबा द्यावा. भाऊंना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध करावी. मी गेल्या ९२ पासून डमी अर्ज भरतोय. पक्षाचा अधिकृत एबी फ़ोर्म वहिनींच्या नावाने आहे. त्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत.