वर्धा : यंदा ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे झाल्याने येथील साहित्य परंपरेचा आणि लोकसेवेचा वारसा ज्यांनी घालून दिला, त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचे प्रयत्न परिसंवादातून करण्यात आले. गांधींनी आपली कर्मभूमी म्हणून वर्धा हे गाव निवडले. इथे सेवाग्राम आश्रम त्यांनी सुरू केला. सूतकताई करता करता प्रबोधन केले. गांधीजींच्या सांगण्यावरूनच विनोबाही इथेच आले. अहिंसेचा मार्ग जगाला दाखवत त्यांनी भूदान चळवळ केली. या दोन्ही महापुरुषांच्या आयुष्याचा आढावा ‘गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्षातून’ या परिसंवादातून घेण्यात आला. यावेळी, रमाकांत खलप, डॉ. प्रशांत धर्माधिकारी, भानू काळे, श्रीकांत देशमुख आणि देवेंद्र गावंडे यांचा सहभाग होता. परिसंवादाचे अध्यक्षपद डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी भूषविले.
नवोदित वाचकांसाठी विचारमंथन
दरवर्षी वाचनप्रेमी आणि साहित्यिकांचा मेळा महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात भरत असतो. त्यावेळी स्थानिक वाचक आणि लेखक मोठ्या संखेने संमेलनाला हजेरी लावतात. महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या फार मोठा असल्याने तसेच, संतमहंतांची फार मोठी साहित्यिक परंपरा लाभल्याने अनेकजण लिहिते झाले. विपुल साहित्य निर्मिती झाली. परंतु यात नेमके काय वाचावे? कुठे वाचावे? कोणाचे वाचावे? असे स्वाभाविक प्रश्न नवोदित वाचकांना पडतात. याच प्रश्नांवर विचारमंथन करण्यासाठी ‘वाचन पर्यायांच्या पसार्यात गोंधळलेला वाचक’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. विवेक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. पुष्कर कुलकर्णी, चांगदेव काळे, डॉ. अभिजित अणे आणि डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी प्रा. मनीषा रिठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. “सर्जनशीलतेचा महामार्ग विचारांच्या आणि पुस्तकांच्या गर्दीतूनच जातो. वाचक विवेकी असतोच पण, लेखकाने उत्तम साहित्य निर्माण करण्याची जबाबदारी घ्यावी. लेखकाने आपल्या लिखाणाची चिकित्सा केली, तर साहित्य पसारा होणार नाही. आज आशा बागे यांना पुरस्कार मिळाला पण इथले मान्यवर लेखकच इथे नाहीत. तेव्हा वाचक गोंधळलेले कसे? या सर्व लेखकांना त्यांचे वाचक भेटवले तर, लेखक-वाचक सुसंवाद घडेल आणि वाचकाचा गोंधळ कमी होईल,” असे एकमत या परिसंवादात दिसून आले.