रस्ता चुकला की चुकवला...?

    05-Feb-2023   
Total Views |
 
China R-22
 
अमेरिका आणि चीनमध्ये पुन्हा संघर्षाची ठिणगी पडली आहे. नुकताच अमेरिकेने आकाशात उडणारा चीनचा एक संशयित हेरगिरी करणाऱा फुगा नष्ट केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सूचनेनंतर ‘ऋ-22’ लढाऊ विमानातून क्षेपणास्र डागून कॅरोलिना किनार्‍याजवळ हा फुगा खाली पाडण्यात आला. विशेष म्हणजे, आधीच चीन-अमेरिकेचा छत्तीसचा आकडा असताना त्यात आता या हेरगिरी करणार्‍या फुग्यामुळे अमेरिका आणि चीनमधील संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत.
 
अमेरिकेच्या वायूसेनेने सदरील कारवाई करण्याआधी शनिवारी ‘युएस फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ने जवळपासच्या परिसरातील तीन विमानतळांवर विमानांच्या आगमन आणि निर्गमनावर बंदी घातली होती. राष्ट्रीय सुरक्षेच्या अंतर्गत उचललेल्या पावलांचा एक भाग म्हणून हवाई क्षेत्र रिकामे ठेवण्यात आले होते. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष बायडन यांना पाच दिवसांआधीच या हेरगिरी करणार्‍या फुग्याला नष्ट करायचे होते. परंतु, फुगा जेव्हा पाण्याच्या वर येईल तेव्हा तो नष्ट करणे अधिक योग्य ठरेल, असा सल्ला अधिकार्‍यांनी दिला होता. त्यामुळे फुगा पाण्याच्यावर येण्याची वाट पाहिली गेली. हा फुगा पाण्याच्या वर आल्यानंतर लष्करी कारवाई करत तो खाली पाडण्यात आला. यावेळी फुग्याचा सर्व ढिगारा समुद्राच्या पाण्यात पसरला, जो नंतर एकत्र करण्यात आला. हा फुगा चीनचा असून तो हेरगिरी करण्यासाठी पाठवण्यात आल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
 
या फुग्यामध्ये सोलर पॅनल, दळणवळणाची उपकरणे, सेन्सर आदी गोष्टी बसविण्यात आल्याचे आढळून आले. हा फुगा अमेरिकेच्या अनेक लष्करी तळांवरून गेल्याचेही समोर आले. चीन अमेरिकन लष्कराची ठिकाणे आणि सैन्याची माहिती मिळवण्यासाठी फुग्यांचा वापर करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. अमेरिकेने हा फुगा नष्ट केल्यानंतर चीनने रविवारी तीव्र आक्षेप घेत उलटपक्षी अमेरिकेलाच खडेबोल सुनावले. ही कृती अमेरिकेचे अनावश्यक प्रत्युत्तर असून, ज्याने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही सांगितले की, चीन संबंधित कंपनीच्या कायदेशीर हक्क आणि हितांचे दृढपणे समर्थन करेल आणि त्याच वेळी उत्तर म्हणून पुढील कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवेल. अमेरिकेच्या हद्दीत सापडलेला फुगा केवळ चीनचाच असल्याचे चीनने स्पष्ट केले आहे. तसेच, फुग्याचा वापर हवामानविषयक माहिती मिळवण्यासाठी केला जातो. फुगा आपला रस्ता चुकला असावा,” असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या हवाई हद्दीत फुग्याच्या प्रवेशाबद्दल चीनने खेद व्यक्त केला असून, हे जाणूनबुजून केले नसल्याचेही म्हटले आहे.
 
बुधवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या मोंटाना प्रदेशात हा हेरगिरी करणारा फुगा दिसून आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, अमेरिकेचा हा परिसर अतिशय संवेदनशील आहे. याठिकाणी अमेरिकन हवाई दलाचा तळ असून त्यासोबतच याठिकाणी आण्विक क्षेपणास्त्रेही ठेवण्यात आली आहेत. अमेरिकेतील विरोधी पक्षनेते जेम्स कॉमर यांनी या फुग्यात बायोवेपन अर्थात जैविक शस्त्रे असण्याचीही भीती व्यक्त केली होती. त्यांनी बायडेन सरकारलाही धारेवर धरले. अमेरिकेच्या डोळ्यांदेखत हा फुगा अमेरिकेच्या इतक्या आत घुसण्यात यशस्वी झाला. याबाबत खुलासा करण्याची मागणीही त्यांनी केली. या फुग्याचा आकार जवळपास तीन बस एवढा होता, जो तब्बल 60 हजार फूट उंचीवर उडत होता. या फुग्याच्या तपासणीसाठी लढाऊ विमानांनाही पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून तो नष्ट करण्यात आला. या फुग्यामुळे अमेरिकेला मात्र चांगलाच घाम फुटला आहे. फुग्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी त्यांचा नियोजित चीन दौराही रद्द केला आला आहे.
 
केवळ एका फुग्यामुळे दोन्ही देशांमध्ये खळबळ उडाली असून चीनच्या या चालीमुळे अमेरिकेचीही झोप उडाली. रशिया-युक्रेन युद्धानंतर अमेरिका जागतिक स्तरावरही कमजोर पडला. त्यातच रशियाने दाखवलेल्या इंग्याने तर अमेरिका आणखी शांत झाला. अर्थव्यवस्था गंटागळ्या खात असताना आता चीनच्या या चालीमुळे पुन्हा अमेरिकेत गोंधळ उडाला आहे. परंतु, मुद्दा हा आहे की, गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत कलहाने ग्रासलेल्या चीनने पुन्हा एकदा आपले अस्तित्व जागतिक पटलावर दाखवून देण्यासाठी या फुग्याचा रस्ता चुकवला तर नसेल ना, हाही एक प्रश्नच आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.