औषधनिर्मितीच्या क्षेत्रातील अभ्यासपूर्ण संशोधनाचा प्रवास

    04-Feb-2023   
Total Views |
बाजारात येणार्‍या किंवा येऊ घातलेल्या नवीन औषधांच्या प्राण्यांवर आणि प्रत्यक्ष मनुष्यावरही चाचण्या केल्या जातात. अशा प्रकारच्या चाचण्यांमध्ये साहजिकच काही धोके असतात. हे धोके टाळण्यासाठी थेट कोणत्याही सजीवांवर चाचण्या करण्याऐवजी कृत्रिम पेशींचा वापर करूनही चाचण्या करता येऊ शकतात. या विषयावरच सखोल संशोधन करणार्‍या डॉ. प्राजक्ता दांडेकर यांना नुकताच ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ जाहीर झाला. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत...


सर्वप्रथम तुम्हाला ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. तेव्हा, हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय होती?

‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार मला मिळाला याचा आनंद आहे. याआधी हा पुरस्कार मिळवणार्‍या मान्यवरांच्या पंक्तीत बसण्याचा मान मला मिळतोय, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनकल्याण समितीची मी मनःपूर्वक आभारी आहे. यापूर्वीही मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पण, ते वैज्ञानिक स्वरुपातील होते. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या ठिकाणी आमच्या कामाची नोंद घेतली जातेय, ही खूपच उल्लेखनीय आणि प्रोत्साहनपर गोष्ट आहे. या पुरस्कारामुळे आम्ही करतोय ते काम अधिक जोमाने करत राहण्याची स्फूर्ती मिळत आहे. 


dr prajakta dandekar



या महत्त्वपूर्ण संशोधनाची प्रक्रिया नेमकी कशी सुरु झाली? तुमचा हा संशोधनाचा प्रवास कसा होता?

मी बारावीनंतर ‘बी.फार्म’ केलं. त्यामध्ये ‘औषधशास्त्र’ हा माझ्या अभ्यासाचा विषय होता. हे करत असताना हळदीतल्या अतिसूक्ष्म कणांवर आम्ही संशोधन केले होते. याचा उपयोग पुढे ‘मलेरिया’च्या औषधांसाठी होणार होता. त्यानंतर दोन वर्षे जर्मनीत राहून ‘मॅरिकुरी युरोपियन रेस्पीरेटरी सोसायटी कोकन्झ्युमर फेलोशीप’मध्ये फुप्पुसांच्या संसर्गजन्य रोगांवरील उपचारांसाठी एका पद्धतीवर काम करताना पुन्हा अतिसूक्ष्म कणांच्या आधारावर काम करता आले. त्यानंतर स्वतंत्र मुख्य अन्वेषक म्हणून भारतात परत आल्यानंतर कृत्रिम मानवी अवयवांवर औषधांच्या चाचण्या कशा करता येतील, यादृष्टीने प्रयत्न सुरू केले.
जगभरातील शास्त्रज्ञांचा अभ्यास आणि निरीक्षणातून असे आढळून येते की, प्राण्यांवर केलेल्या चाचण्यांच्या परिणामांपेक्षा माणसांवरील चाचण्यांचे परिणाम वेगळे असतात. कारण, प्राण्यांच्या पेशी मानवी पेशांपेक्षा बर्‍याच प्रमाणात वेगळ्या असतात. त्यामुळे औषधांचा शोध लावण्यासाठी बरेच पैसे आणि वेळ खर्च करूनही 90 टक्क्यांपेक्षाही जास्त औषधे ‘क्लिनिकल ट्रायल्स’ म्हणजेच औषधांच्या चाचण्यांमधून पुढे जाऊच शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या औषधी चाचण्यांसाठी प्राण्यांना पर्याय शोधले गेले, तर उत्तमप्रतीची आणि परिणामकारक औषधे लवकरात लवकर आणि योग्य दरात कसे उपलब्ध करता येतील, यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले.

याविषयी तुमच्या शोधनिबंधातून नेमके काय निष्पन्न झाले? कोणती नवीन माहिती मिळाली?

सध्या प्रयोगशाळेत औषधांच्या चाचण्यासांठी वेगवेगळ्या प्राण्यांऐवजी पर्यायी पद्धतींवर प्रयोग सुरू आहेत. जगभरात प्राण्यांना पर्याय म्हणून या औषध चाचण्या करण्यासाठी वैज्ञानिक प्राणी किंवा कृत्रिम मानवी अवयवांची निर्मिती यावरही संशोधन प्रगतीपथावर आहे. मात्र, हे प्रयत्न ‘टु डी’ पद्धतीने सुरू आहेत. मानवी अवयवांमधील पेशींची रचना ‘टु डी’ पद्धतीची नसते. त्यामुळे प्राण्यांच्या पेशींमध्ये औषधे आणि पोषणद्रव्ये समान प्रमाणात पसरतात. त्यामुळे प्राण्यांच्या पेशींची तुलना मानवी पेशींशी होऊ शकत नाही किंवा त्या तपासामधील परिणाम हे तितकेसे अचूकही ठरू शकत नाही. म्हणूनच आम्ही या पेशी ‘थ्रीडी’ पद्धतीने वाढवतो. या ‘थ्रीडी’ पेशींची तुलना कृत्रिम अवयवांशी केली जाऊ शकते आणि आपल्या शरीरातील पेशींचा संबंध हा रक्तप्रवाह बाह्य पेशींशी येतो. आम्ही आमच्या प्रयोगशाळेत हे वातावरण नैसर्गिक पोलीमर्सचे सांगाडे तयार करून निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या पेशींचा प्रतिसाद हा शरीरातील पेशींच्या प्रतिसादाशी अगदी मिळताजुळता असतो. तसेच, आम्ही ‘ऑर्गनॉनशीप टेक्नोलॉजी’ या पद्धतीनेही संशोधन करत आहोत. या पद्धतीमध्ये रक्तपेशीशी मिळते जुळते वातावरण ‘मायक्रोस्कोप’च्या स्लाईड एवढ्या छोट्या उपकरणात निर्माण करतो. तसेच सध्या मानवी कातडी, रसायने, फुप्फुसे या कृत्रिम अवयवांवर देखील काम करत आहोत.
प्राण्यांमधील चाचण्यांचे परिणाम हे खूप वेगळे असतात, हे वास्तव आता ‘युएसएफडीए’ (णडऋऊअ)ने ही मान्य केले आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी ‘एफडीए मॉडर्नायझेशन कायदा 2.0’ची स्थापना केली. या कायद्यानुसार, प्राण्यांच्या चाचण्या कमी करण्याची सूचनाही दिली आहे.

तुमच्या या एकूणच संशोधनाचा भविष्यात या क्षेत्राला कसा लाभ होईल?

अशा चाचण्यांमधून प्राण्यांची जीवितहानी टाळण्याबरोबरच औषधनिर्मिती कमी कालावधीत आणि स्वस्तात व्हावी, यासाठी या सर्व प्राण्यांना पर्यायी पद्धतींचा उपयोग होऊ शकतो आणि त्यासाठी अमेरिकेमध्ये गेल्या दहा वर्षांपासून संशोधन सुरू आहे. आमच्या प्रयोगशाळेत होणार्‍या संशोधनातील प्रयोगांच्या प्राथमिक चाचण्यांना यश मिळत आहे. पण, हे संशोधन बाजापेठेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांशी संलग्न होऊन काम करावे लागेल, जेणेकरून हे तंत्रज्ञान आम्हाला समाजापर्यंत पोहोचविता येईल आणि औषध कंपन्यांना हे तंत्रज्ञान सहजपणे वापरता येतील.

ही संपूर्ण संशोधन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारण किती कालावधी लागला? आणि यासाठी आपल्याला कुणाचे मार्गदर्शन लाभले?

माझ्याबरोबर प्रयोगशाळेत पदव्युत्तर आणि ‘पीएच.डी’करणारे विद्यार्थी काम करतात. तसेच, माझे पती डॉ. रत्नेश यांचे सहकार्य आणि इतर जवळपास 40 संशोधक, पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी अशी आमची मोठी टीम कार्यरत आहे. याव्यतिरिक्त इतर काही तत्सम संस्था आणि तज्ज्ञांबरोबर समन्वयाने ही आम्ही काम करतो.
या अतिशय महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी संशोधनाव्यतिरिक्तही आपण केलेल्या इतर संशोधन प्रकल्पांविषयी काय सांगाल?
‘पीएच.डी’ करत असताना हळदीतल्या ‘कुर्क्युमीन’ या प्रमुख घटकाचे अतिसूक्ष्म कण (छरपे रिीींळलश्रशी) तयार केले होते. ‘कुर्क्युमीन’ हे एक चांगले अ‍ॅॅण्टी ऑक्सिडंट आहे. त्यामुळे या ‘नॅनोपार्टिकल्स’चा उपयोग कर्करोग आणि मलेरियाच्या औषधांसाठी केला जातो. ‘कुर्क्युमीन’ हे पाण्यात विरघळू न शकल्यामुळे त्याची ‘बायोअवेलेबेलिटी’ खूप कमी आहे. त्यामुळे ‘नॅनोपार्टिकल्स’चा उपयोग करून हे ‘बायोअवेलेबेलिटी’ वाढवण्याचे आमचे प्रयत्न सुरू होते. ‘नॅनोपार्टिकल्स’चा उपयोग केल्यामुळे औषधे जास्त काळ पेशींमध्ये राहून त्याचा योग्य प्रभाव दिसू शकतो. ‘मॅरिकुरी युरोपियन रेस्पीरेटरी सोसायटी कोकन्झ्युमर’ ही फेलोशीप मिळवणारी मी पहिली भारतीय महिला संशोधिका होते.

भविष्यात या क्षेत्रातील अशाच मूलभूत संशोधनासाठीचा विचार अथवा नियोजन आहे का?

सध्यास चालू संशोधनाच्या कामाच्या अजून प्राथमिक चाचण्या आणि प्रगत प्रमाणिकीकरण झालेले आहे. मात्र, ते अद्याप व्यावसायिक पातळीवर पोहोचलेले नाही. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. इंजिनिअर्स आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे साहाय्य घेऊन हे काम करायचे आहे. त्यामुळे या संशोधन कार्याचा अजून प्रवास सुरू आहे. माझे पती, लहान मुलगी आणि आई-वडील या सगळ्या कुटुंबीयांचा सतत मिळणारा आधार हा खूप मोलाचा आहे. तसेच, शिक्षकांचे आणि गुरूजनांचे नेहमी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मला लाभले. या सगळ्या प्रवासात अनेक मान्यवर मंडळींचा पाठिंबा आणि मदत मिळत गेली. यासाठी मी सर्वांचीच खूप आभारी आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.