मुंबई : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघातील भाजपच्या आमदारांच्या निधनानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या. पिंपरी चिंचवडचे आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांचे काही आठवड्यांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले होते. तसेच कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार स्व. मुक्ता टिळक यांचीही विधिमंडळ हिवाळी अधिवेशन काळात प्रदीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली होती. त्यामुळे या दोन मतदारसंघांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकांसाठी बराच खल झाल्यानंतर भाजपने आपले उमेदवार आज जाहीर केले आहेत.
पिंपरी चिंचवड जागेसाठी स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्याची सातत्याने चर्चा होत होती तसेच जगताप समर्थकांकडूनही अश्विनी जगताप यांनाच उमेदवारी देण्यात यावी यासाठी आग्रहाची भूमिका मांडण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर अश्विनी जगताप यांना केंद्रीय भाजप नेतृत्वाकडून आज सकाळी अधिकृतरीत्या उमेदवारी दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
भाजपने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महाविकास आघाडी आपलं उमेदवार कधी जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जागांवरील पोटनिवडणूक बिनविरोध करून मविआने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पालन करावे असा आवाहन यापूर्वी केलेले आहे.
मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या दोन्ही निवडणुका महाविकास आघाडी लढवेल असे जाहीर केले आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवरील निवडणुका बिनविरोध होतात की त्या ठिकाणी भाजप आणि मविआमध्ये लढत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच पुण्याच्या माजी महापौर आणि कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार स्व. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजप नेते हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर नक्की कोण उमेदवार असणार याबाबत तर्क वितर्क लढविण्यात येत होते.
मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि पुत्र कुणाल टिळक यांच्यापैकी कुणाला तरी टिळक परिवारातून उमेदवारी जाहीर केली जाईल अशी चर्चा सातत्याने केली जात होती. मात्र, या जागेसाठी भाजपकडून पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रासने पुणे भाजपच्या महत्त्वपूर्ण नेत्यांपैकी एक मानले जात असून स्थायी समितीचे सभापती म्हणूनही त्यांची कारकीर्द चर्चेत राहिली होती.