मुंबई : 'गेल्या पंचवीस वर्षात कंत्राटदार सांगेल तीच कामे, आणि कंत्राटदार सांगेल तेच बजेट बनविले जात होते ही वस्तुस्थिती आहे. मात्र, २५ वर्ष कायम असलेले हे आता नुकत्याच जाहीर झालेल्या बजेटमुळे बदलले आहे. मुंबई महापालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे मुंबईकरांच्या मागण्या आणि अपेक्षा याचा विचार करून त्यानुसारच तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हे बजेट कट कमिशन अन कंत्राटदारांचे नसुन मुंबईकरांचेच आहे,' या शब्दांत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.
शनिवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प महापालिकेचे आयुक्त आणि प्रभारी इकबालसिंह चहल यांनी मांडला. पालिकेच्या या अर्थसंकल्पावर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शेलार म्हणाले की, 'मुंबईतील हवा प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून गेले आहे त्यामुळे याबाबत तातडीने उपाय योजना करा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही केली होती. आम्ही केलेल्या विनंतीला फडणवीसांनी मान देत तातडीने महापालिका आयुक्तांना सुचना केल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी तब्बल १५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचे दिसून आले आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही ,मनापासून स्वागत करत आहोत,' असे त्यांनी म्हटले आहे.
'नवे संकल्प केलेले नाहीत त्यामुळे काही अपेक्षा आमच्या अजूनच्या होत्या. पण करवाढ मुंबईकरांवर लादली नाही. रस्ते, आरोग्य, कोस्टलरोड, मलजल नित्सारण,अशा पायाभूत सेवा सुविधांना केलेली तरतूद ही जमेची बाजू आहे. मुंबईकरांना चालण्यासाठी फुटपाथ देणे ही पालिकेची जबाबदारी मान्य करुन ९ मिटर पेक्षा मोठ्या प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ देण्याची भूमिका पालिकेने घेतली त्याचे मुंबईकरांच्या वतीने मी स्वागत करतो. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तृतीय पंथीय यांचा संवेदनशीलपणे अर्थसंकल्पात विचार केला गेला आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे कंत्राटदारांच्या मर्जीतला हा अर्थसंकल्प नसून मुंबईकरांच्या मागणीतला अर्थसंकल्प आहे.' अशी भावना आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.