दुरस्थ मतदान यंत्राचा तूर्तास वापर नाही – केंद्राची माहिती

    03-Feb-2023
Total Views |
Kiren Rijiju
नवी दिल्ली : देशात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये दुरस्थ मतदान यंत्राचा (आरएमव्ही) वापर करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली आहे.
आपापल्या मतदारसंघात जाऊन मतदान न करू शकणाऱ्या मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दुरस्थ मतदान यंत्राची निर्मिती केली आहे. देशातील आगामी निवडणुकांमध्ये त्याचा वापर करण्यात येणार आहे का, असा प्रश्न केंद्र सरकारला विचारण्यात आला होता. त्यास केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत लेखी उत्तर दिले आहे.

केंद्रीय मंत्री रिजिजू म्हणाले, या वर्षी अनेक विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि लोकसभेची निवडणुका २०२४ साली होणार आहेत. मात्र, एनआरआय मतदारांच्या वापरासाठी आरव्हीएम प्रस्तावित नसल्याची माहितीही निवडणूक आयोगाने दिली आहे. इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (ईसीआयएल) निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञ समिती आणि मतदान पॅनेलच्या मार्गदर्शनाखाली 'मल्टी कॉन्स्टिट्यून्सी रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन'चा नमुना तयार केला आहे. निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय आणि राज्य राजकीय पक्षांना नोटीस पाठवून दूरस्थ मतदानाद्वारे मतदानात स्थलांतरितांचा सहभाग सुधारण्यास सांगितले आहे, असेही केंद्र सरकारने सांगितले आहे.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गेल्या महिन्यात दुरस्थ मतदान यंत्राबाबत निवडणूक आयोगाच्या प्रस्तावावरील प्रगतीची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी याप्रकरणी सर्व भागधारकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते.