पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक स्तरावर एकमत होत नसतानाच, भारतात मात्र उत्तर प्रदेश आणि तेलंगण या दोन राज्यांनी संपूर्ण जगाला मागे टाकत अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत कचर्याची कमीत कमी निर्मिती आणि पुनर्वापर यासाठी एकत्रितपणे परस्पर सामंजस्याने उपक्रम राबविण्याचे या दोन राज्यांनी निश्चित केले आहे. त्यासाठी ‘कोका-कोला’ या आंतरराष्ट्रीय कंपनीने पुढाकार घेत ‘रिप्लानेट्स’ या आशयाचे चर्चासत्र नुकतेच आयोजित केले होते. यामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाययोजनांवर केवळ चर्चाच नाही, तर प्रत्यक्ष कृती करण्यावर एकमत झाले.येत्या दोन वर्षांत कचर्याचा १०० टक्के पुनर्वापर करण्याचा संकल्प तेलंगण या राज्याने केला आहे. उत्तर प्रदेशातही त्यादृष्टीने अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकदाच वापर होणार्या प्लास्टिकच्या विल्हेवाटीचा प्रश्न सोडविणे. या समस्येला प्राधान्य देण्यात येणार आहे.एकंदरीतच आजघडीला जागतिक स्तरावर ‘पर्यावरण साक्षरता’ हा ज्वलंत विषय असून त्याकडे अनेक देशांचे अपेक्षित लक्ष नसल्याचे दिसते. त्यादृष्टीने भारतातील दोन राज्ये एकत्रितपणे एखादा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेत असतील तर ते नक्कीच कौतुकास्पद आहे.देशातील अनेक शहरांत आजघडीला ‘झिरो वेस्ट’ अर्थात ‘शून्य कचरा’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ‘स्वच्छ भारत मोहीम’ परिणामकारक ठरताना दिसते. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शासकीय पातळीवर पर्यावरण संवर्धनासाठी कितीही उपाययोजना करण्यात आल्या, तरी नागरिकांमध्ये पर्यावरणसाक्षरता असणे गरजेचे आहे. जर तीच नसेल, तर शासकीय प्रयत्न तोकडे पडतील, हे वेगळे सांगायला नको. प्रगत देशांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती असून तेथे कचर्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. सजग नागरिक इकडेतिकडे कचरा फेकत नाहीत. त्या तुलनेत आपल्याकडे काही लोक अस्वच्छता वाढविण्याचेच काम करतात. अशा मंडळींचे प्रबोधन आणि प्रसंगी असे प्रकार टाळण्यासाठी कठोर कायदे करुन त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यातूनच खर्या अर्थाने पर्यावरण संवर्धन शक्य आहे.
अश्म उलगडेल रहस्य!
चिकित्सा, कुतूहल आणि संशोधन हा मानवी स्वभाव. त्यातूनच मानवाने आज सर्वदूर संशोधन करुन अंतराळासह पृथ्वीच्या अंतरंगात काय दडलंय, याचे संशोधन सुरूच ठेवले आहे. त्यातूनच नव्याने उजेडात आलेली माहिती मानवी मनाचे कुतूहल वाढविणारी आहे.तेलंगण या राज्यात हैदराबादपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या चित्रल येथे सापडलेल्या अतिप्राचीन अश्मात ‘झिरकॉन’ या खनिजाचे अंश आढळले आहेत. ‘झिरकॉन’ आणि पृथ्वीच्या उत्पत्तीचे रहस्य यांचा अत्यंत जवळचा संबंध असल्यामुळे त्यावर अधिक संशोधन सुरू असल्याची माहिती कोलकाता विद्यापीठातील संशोधकांनी दिली आहे. या संशोधकांच्या मदतीला जपानमधील हिरोशिमा आणि राष्ट्रीय भूविज्ञानचे शास्त्रज्ञही सरसावले आहेत. रसायनशास्त्रात ‘झिरकॉन’ या खनिजाला विशेष महत्त्व आहे. ज्यावेळी पृथ्वीची उत्पत्ती झाली, त्यावेळी सुरुवातीला ‘झिरकॉन’चीच निर्मिती झाल्याचे संशोधन आहे. त्यामुळे भारतीय उपखंडातील भूगर्भात पृथ्वीच्या उत्पत्तीची आणखी रहस्ये दडली असण्याची आजवरची शक्यता खरी ठरत आहे.तेलंगणमध्ये सापडलेल्या अश्माचे वयोमान तब्बल ४.१ अब्ज वर्षे आहे. लवचिकता गुणधर्म असलेल्या ‘झिरकॉन’पासून स्फटिकांची निर्मिती झाली आहे. भारतात ‘झिरकॉन’ खनिज सापडणे, हे सुचिन्ह असून पृथ्वीच्या जडणघडणीचा तो साक्षीदार आहे. पृथ्वीवर जलनिर्मिती कशी झाली, याचेही रहस्य येत्या काळात उलगडेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे. ही प्रक्रिया शेकडो वर्षे सुरूच होती. त्यामुळे त्यावर लगेच निष्कर्ष काढता येणार नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. ओडिशा राज्यात २०१८ मध्येही अशाच प्रकारची काही अश्म सापडली होती. त्यांचे वयोमान ४.२ अब्ज वर्षे आहेत. केरळातदेखील मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे भूगर्भशास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत.एकंदरीतच पृथ्वीच्या निर्मितीपासून तिच्या अंतरंगात नेमके काय दडले आहे, याच्या संशोधनाचे केंद्र भारतभूमीच असेल, असे म्हटले तर वावगे ठरु नये.
-मदन बडगुजर