मरावे परी अवयव कीर्तिरूपी उरावे..!

    28-Feb-2023
Total Views |
Sunil Deshpande
 
अवयवदानासाठी गेल्या काही वर्षांपासून नाशिकचे उद्योजक सुनील देशपांडे प्रबोधनाचे काम करीत आहेत. नाशिक ते आनंदवन जागृतीसाठी पदयात्रा करणार्‍या देशपांडे यांच्या कार्याचा हा धांडोळा...

 
काही माणसे खूप मुलखावेगळी असतात. अगदी झपाटल्यागत काम करणे, हाच त्यांचा स्वभावधर्म. स्वतःच्या वैयक्तिक सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊन ते हाती घेतलेले काम पूर्ण करतात. त्यातील एक म्हणजे सुनील देशपांडे.नाशिक परिसरात अवयवदान ही चळवळ डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी सुरू केली. सुनील देशपांडेही या चळवळीत सहभागी झाले. देशपांडे हे व्यवसायाने डॉक्टर नाहीत. पूर्वी ते ’प्रिंटिंग प्रेस’ चालवीत. आता एक हॉटेल चालवितात. वय ७०च्या पुढे. त्यांनी ठरविले की, अवयवदान क्षेत्रात काम करायचे. त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी अवयवदानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी पदयात्रा काढली. दि. २५ नोव्हेंबर, २०१६ ते १४ जानेवारी, २०१७ या सुमारे ५२ दिवसांच्या कालावधीत त्यांनी नाशिक ते नागपूर व नागपूरहून आनंदवन अशी पदयात्रा काढली. त्यांनी गावोगावी अवयवदानाविषयी लोकांचे प्रबोधन केले.


पदयात्रेला मिळालेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व उत्साह पाहून देशपांडे यांचा उत्साह अधिकच दुणावला. विशेषतः आनंदवनामध्ये डॉ. विकास आमटे यांनी या कार्याच्या केलेल्या कौतुकामुळे देशपांडे भारावून गेले. सुनील देशपांडे यांनी अवयवदानासंबंधी जनजागृती करण्यासाठी दुसरी पदयात्रादेखील काढली होती. दि. २३ फेब्रुवारी, २०१८ रोजी त्यांच्या पदयात्रेची सुरुवात मुंबईपासून झाली. साधारणतः पेणपर्यंत आली आणि दि. ५ मार्च रोजी देशपांडे यांच्या ८८ वर्षांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यावेळी देशपांडे पदयात्रा सोडून नाशिक शहरात आले. फक्त दोन दिवस देशपांडे नाशिकमध्ये थांबले. मातोश्रींचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर ते पुन्हा अलिबाग जिल्ह्यातील रोहा येथे पदयात्रेत सहभागी झाले. दशक्रिया किंवा तेरावे यांसारख्या कर्मकांडात न अडकता त्यांनी आपल्या कर्तव्याला महत्त्व दिले. अवयवदान हा लोकांच्या दृष्टीने नवा विषय असला, तरी लोकांना या विषयासंदर्भात खूप जाणून घ्यायचे आहे. पदयात्रेतून लोकांमध्ये जनजागृती करू शकलो, याचे समाधान ते व्यक्त करतात. पदयात्रेचे औचित्य साधून त्यांनी तयार केलेली प्रतिज्ञा सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाली. ती प्रतिज्ञा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांना ती फार आवडली. त्यानंतर लगेच त्यांच्या स्वीय साहाय्यकाचा फोन आला आणि ही प्रतिज्ञा पालकमंत्र्यांना खूप आवडली आहे. शासकीय स्तरावर त्याचे काही तरी करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे राज्य शासनाने अवयवदानाची प्रतिज्ञाच म्हणूनच मान्य केली असल्याचेही देशपांडे आवर्जून सांगतात.


आज भारतात विविध विकारांनी ग्रस्त लाखो रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत. देशात दरवर्षी साधारणपणे दोन लाख मूत्रपिंडांची गरज असते. परंतु, सहा हजारांपेक्षा अधिक किडनी उपलब्ध होऊ शकत नाही. तीन हजार यकृतांची गरज असते. परंतु, दीड हजार यकृतच उपलब्ध होतात. पाच हजार हृदयांची गरज आहे. परंतु, शंभरच उपलब्ध होतात. एक लाख डोळ्यांची गरज असताना २५ हजारांपेक्षा अधिक डोळे उपलब्ध होऊ शकत नाही. अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे अवयवांची निकड अधिकच भासते आहे. ‘मरावे परंतु अवयव रूपी उरावे’ या कल्पनेतून मी कामाला सुरुवात केली असल्याचेही देशपांडे सांगतात.
समाजात अवयवदानासंदर्भात सर्वप्रथम जागृती करणे गरजेचे आहे. त्याचे कारण म्हणजे गरजवंत रुग्णांची संख्या वाढती आहे. दुसरीकडे त्याला प्रतिसाद मिळण्याचे प्रमाण कमी आहे. नाशिकमध्ये तीन ‘स्कीन’ बँका आहेत. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना देखील आर्थिक भार सहन करावा लागतो. नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली, तर हा खर्च कमी होऊ शकतो, असेही देशपांडे सांगतात.


गेल्या काही वर्षांत अवयवदानासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अवयवदानच नव्हे, तर हृदय किंवा यकृतरोपण अशा बाबतीत उपचार शक्य आहे. सुरुवातीला अशाप्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी डॉक्टरही उपलब्ध नव्हते. विदेशातून कधी तरी डॉक्टर येणार आणि ते शस्त्रक्रिया करून परत जाणार, अशी व्यवस्था होती. परंतु, भारतात शस्त्रक्रिया होऊ लागल्या आणि खर्च कमी होत गेला. आता तो आठ ते दहापासून २० लाखांपर्यंत येतो. परंतु, तरीही तो कमी झाला पाहिजे. सध्या मुंबई, नाशिक, पुण्यासारख्याच शहरांमध्ये ही किडनी किंवा अन्य काही अवयवांच्या रोपणाची शस्त्रक्रिया केली जाते. ती अन्य शहरात झाली पाहिजे. किमान जिल्हा रुग्णालयात तरी अशी व्यवस्था असली पाहिजे. याशिवाय सध्या ‘ग्रीन कॉरिडोर’चा खर्च शासन करीत आहेतच, याशिवाय राज्य शासनाने अवयवदानासाठी प्रोत्साहनपर योजना राबविण्याची अपेक्षा देशपांडे व्यक्त करतात.


“अवयवदान हा समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय. त्यामुळे लोकसहभागही वाढताना दिसतो. विशेषतः अशिक्षित व्यक्ती अतिशय कुतूहलाने अवयवदान चळवळीकडे पाहतात. या चळवळीचे मर्म जाणून घेतात. शिकलेल्या माणसांच्या मनात अवयवदानाविषयी काही शंका आहेत. परंतु, त्यांना या चळवळीची संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांचेही गैरसमज दूर होतात आणि हेच आमच्या चळवळीचे यश आहे,” असे देशपांडे सांगतात. वैयक्तिक सुख-दुःख याची कोणतीही पर्वा न करता एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जनजागृती करणार्‍या सुनील देशपांडे यांच्या प्रयत्नांना दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या शुभेच्छा!


 
-अमित यादव