शशिकांत वारिसे प्रकरण : सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यांचे वक्तव्य
28-Feb-2023
Total Views |
मुंबई : रत्नागिरीतील रिफायनरी प्रकरणी लेख लिहीणार्या पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी विधानसभेत उपस्थित झालेल्या मुद्द्यावर फडणवीस यांनी हे विधान केले आहे. वारिसे यांच्या अपघाती मृत्यू संदर्भात जे काही दावे केले जात आहेत ते चुकीचे असून सरकार या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.
कोकणातील रत्नागिरी ग्रीन रिफायनरीवरून सुरु झालेला राजकीय संघर्ष अद्याप शांत झालेला नाही. त्यातच रिफायनरीच्या विरोधात लेख लिहिणारे स्थानिक पत्रकार शशिकांत वारिसे यांचा अपघाती मृत्यू झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारिसे यांचा अपघाती मृत्यू हत्या असल्याच्या आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेशही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आले होते.
विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, ''पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणात सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून अतिशय गांभीर्याने कारवाई सुरू आहे. एकूण १६ सदस्यांचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. दुर्घटनेचे पुरावे पुरावे गोळा करण्यासाठी खाजगी संस्थेची सुद्धा मदत घेतली जात आहे. या प्रकरणात न्याय देताना पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्यात आले असून सरकार दोषींना पाठीशी घालणार नाही हे स्पष्ट आहे.''
''वारीसे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांच्या वतीने २५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून ही मदत जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचली आहे. मदतीचा हा निधी नेमका कुणाच्या नावे वर्ग करायचा याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने कुटुंबाला मदत मिळालेली नाही. याबाबत कुटुंबाकडून माहिती मिळताच २५ लाखांची मदत कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येईल,' असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.