मुंबई : कोयना धरणामुळे पुनर्वसन झालेल्या उचाट गावाने जिल्ह्यातील एक आदर्श गाव म्हणून लौकिक मिळवला आहे. त्यासाठी यशवंत मोरे यांचे अथक परिश्रम आणि गावात समविचारी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन शिक्षण संस्था स्थापन करुन ती प्रगतिपथावर नेली. त्यांचे योगदान समाजापुढे दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे गौरवो्गार मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरु डॉ. अरुण सावंत यांनी काढले.
कोयना क्षत्रिय मराठा समाजसेवा संघाकडून यशवंत गोपाळ मोरे यांना शिक्षणमहर्षी पुरस्काराने सन्मानित केल्याप्रित्यर्थ मोरे यांचा अभिनंदन सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सावंत बोलत होते. डॉ. सावंत यांनी शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकार, स्पर्धेच्या युगातील आव्हाने आणि शिक्षण क्रांती कशी झाली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर हे होते. त्यांनी यशवंत मोरे हे दूरदृष्टी असलेले ध्येयवादी आणि शिक्षणक्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमादरम्यान मोरे यांचा जीवनपट उलगडणारी चित्रफीत दाखवण्यात आली. तर शाळेचे कला शिक्षक विजय जोगमार्गे यांच्या शैक्षणिक कार्यासाठी अविश्रांत श्रमणारा धेयासक्त जीवनप्रवास यशवंत या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजकांतर्फे सत्कारमूर्ती मोरे यांचा पहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर या कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्रीय बालविज्ञान प्रदर्शनात दियान गायकर व शुभम पाटील यांनी सुवर्णपदक पटकावले, त्यांचा डॉ. सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सत्कारमूर्तींनी आपल्या भावपूर्ण मनोगतात आपल्या पुरस्काराचे श्रेय सर्व सहकारी, शिक्षक कर्मचारी, ग्रामस्थांना दिले आणि आपल्या पुढील शैक्षणिक वाटचालीची दिशा त्यांनी स्पष्ट केली. आयोजकांच्या या अभिनंदन आणि आनंद सोहळ्यास कोयना पुनर्वसाहत सेवासंघाचे माजी अध्यक्ष बळीराम शिंदे, समाजसेवक रामूकाका, कुडूस विभाग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाटील, कुडूसचे उपसरपंच डॉ. गिरीश चौधरी, वाडा पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पाटील, माजी मुख्याध्यापक बराटे, के. एल. पाटील, देशमुख, उचाटचे सरपंच, उपसरपंच, संस्थेचे सर्व पदाधिकारी व शिक्षकवृंद, परिसरातील निमंत्रित मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे निवेदन शिक्षक एन. जे. पाटील यांनी केले.