प्रदूषण रोखावे, निरोगी जगावे!

    27-Feb-2023   
Total Views |
The consequences of pollution on health


विकासाच्या मागे घिसाडघाईने लागलेल्या खासकरुन युरोपीय आणि पाश्चात्य देशांतील मानवाला, वाढत्या लोकसंख्येबरोबच वाढत्या प्रदूषणाचाही गंभीर धोका भेडसावताना दिसतो. यामध्ये जलप्रदूषण, वायूप्रदूषण, जमिनीचे प्रदूषण, ध्वनिप्रदूषणाचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. वायूप्रदूषणाचा विचार करता, कार्बन, लीड, नायट्रोजन ऑक्साईड्स, सल्फर ऑक्साईड्स अशी काही मुख्य वायू प्रदूषके. कार्बन आणि नायट्रोजन उत्सर्जन व अन्य मोठ्या प्रमाणात वाढणार्‍या वायू प्रदूषकांमुळे हाडांचे विकार, श्वसनाचे त्रास, फुप्फुसाचा कर्करोग हे आणि असे अनेक आजार जडतात.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक अहवालानुसार, अमेरिकेतील वाढत्या वायूप्रदूषणाचे मानवी शरीरावर अनेक गंभीर परिणाम होत आहेत. या अहवालानुसार, हाडांवर परिणाम होऊन हाडांची झीज होणे, हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील अभ्यासाच्या परिणामांमध्ये स्पष्ट झाल्याप्रमाणे प्रदूषकांमुळे हाडांवरील ठिसुळतेवर, हाडे कमजोर होण्याचा धोका, फ्रॅक्चर झाले असल्यास त्यावरही परिणाम आढळून आले आहेत. यात प्रामुख्याने ‘लंबर स्पाईन’ म्हणजेच पाठीच्या कण्याचे त्रास होणार्‍यांच्या रुग्णसंख्येत ही लक्षणीय वाढ दिसून आली आहे. तसेच, दहा दशलक्ष एकूण संख्येपैकी आठ दशलक्ष महिलांमध्ये ८० टक्के (विशेषतः रजोनिवृत्ती आलेल्या महिलांवर) पुरुषांपेक्षा अधिक परिणाम आढळून आले आहेत.

 
विकसित देशांचा आणि प्रामुख्याने युरोपीय देशांचा विचार केल्यास, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अधोरेखित केलेल्या एका तथ्याची आवर्जून आठवण होते. त्यात त्यांनी युरोपियन देश आणि इतर देशांच्या अडचणी कशा वेगळ्या आहेत आणि त्यांची तुलना का होऊ शकत नाही, यावर अतिशय सूचक भाष्य केले होते. युरोपीय देशांकडे त्यांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक जमिनीची उपल्ब्धता आहे. यामुळे मोठी घरे, मोठ्या गाड्या आणि म्हणूनच भरपूर इंधनाचा वापर, असे हे चक्र. विकासाच्या मागे लागलेल्या युरोपमध्ये झपाट्याने झालेल्या औद्योगिकीकरणामुळे युरोपची आर्थिक स्थिती बदलली. युरोपातील अति प्रमाणात वाढलेल्या (कमी एव्हरेज देणार्‍या) गाड्यांच्या वापरामुळे कार्बन आणि इतर वायू प्रदूषकांचे प्रमाण वाढले आहे. जर्मनी, इटली, पोलंड इत्यादी युरोपातील देश सर्वाधिक कार्बन उत्सर्जित करणार्‍या देशांच्या यादीत अग्रस्थानी आहेत. कॅनेडियन पर्यावरणवादी सेव्हर्न सुझुकी यांच्या जगप्रसिद्ध भाषणांतही येणार्‍या पिढ्यांचे आयुष्य किती धोक्यात आहे, हे लक्षात यावे.

जागतिक हवामानाची स्थिती लक्षात घेता, मानवी हस्तक्षेपामुळे, औद्योगिकीकरणामुळे आणि इतर चुकांमुळे हवामानाची स्थिती किती बदलली आहे, हे लक्षात यावे. शिवाय, पाणी, हवा यांच्या प्रदूषणामुळे मानवाला अनेक आजारांशी झुंज द्यावी लागत आहे. युरोप आणि इतरही राष्ट्रांनी हा विचार लक्षात घेऊन कार्बन आणि इतर वायू प्रदूषकांचे परिणाम नियंत्रित करण्याची नितांत गरज आहे. विकासकामे/प्रकल्प उभारताना त्याला शाश्वत पर्यायांची जोड देता येईल का, याचाही विचार करायला हवा. कमी इंधनात जास्त चालणार्‍या गाड्या, कारखान्यांकडून होणार्‍या प्रदूषणाला आळा बसण्यासाठी, तसेच कमीत कमी कार्बन उत्सर्जन करणारे प्रकल्प यांची संख्या आणि गतीही वाढवावी लागेल. वायूप्रदूषणामध्ये वाहनांमुळे होणार्‍या प्रदूषणाचा वाटा मोठा आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांचा पर्याय उपलब्ध आहेच.

मात्र, इलेक्ट्रिक गाड्यांमधील बॅटरी बनवण्यासाठी पुन्हा औष्णिक ऊर्जा वापरली जाते आणि हीच औष्णिक ऊर्जानिर्मिती कोळसा जाळून केली जाते. याचाच अर्थ इंधनाची गाडी चालवून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी इलेक्ट्रिक गाडी बनवली. मात्र, तिची बॅटरी बनवताना प्रदूषण झालेच. मग त्यादृष्टीनेही शून्य प्रदूषण, शून्य उत्सर्जन याचाही विचार करायला हवा. याशिवाय वृक्षारोपणासारख्या प्रदूषणाला रोखण्यासाठीच्या पारंपरिक उपायांबरोबरच यासंबंधीच्या नवनवीन संशोधनालाही सरकारने चालना आणि प्रोत्साहन द्यायला हवे. विशेषकरुन आजची तरुणाई आणि स्टार्टअप्सही यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावताना दिसतात, त्यांचाही सहभाग या हरित अभियानात वाढल्यास निश्चितच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, हे वेगळे सांगायची गरज नाही.
 
 


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.