नवी दिल्ली: संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) हवाईदलाने आयोजित केलेल्या 'डेझर्ट फ्लॅग' या दहा देशांच्या हवाई सरावामध्ये भारताचे लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) तेजस सहभागी होणार आहे. याद्वारे एलसीए तेजस प्रथमच आंतरराष्ट्रीय हवाई सरावामाध्ये सहभागी होत आहे. युएईमधील अल् धफ्रा या हवाईतळावर सोमवारपासून 'डेझर्ट फ्लॅग'च्या आठव्या आवृत्तीस प्रारंभ झाला असून हा सराव १७ मार्चपर्यंत चालणार आहे.
या बहुपक्षीय सरावामध्ये फ्रान्स, कुवेत, ऑस्ट्रेलिया, युके, बहरीन, मोरोक्को, स्पेन, कोरिया प्रजासत्ताक आणि अमेरिका या देशांचे हवाई दल सहभागी झाले आहेत. या सरावामध्ये भारतीय हवाईदलदेखील सहभागी झाले आहे. त्यासाठी भारतीय हवाईदलाची पाच एलसीए तेजस ही स्वदेशी लढाऊ विमाने आपले कसब दाखविणार आहेत. त्याचप्रमाणे दोन सी – १७ ग्लोबमास्टर विमानेही सरावामध्ये सहभागी होणार आहेत. त्यासाठी ११० हवाई योद्ध्यांचे पथक अल् धफ्रा या हवाईतळावर दाखल झाले आहेत.
हवाईदलांची व्यावसायिक उद्दिष्टे अधोरेखित करणे, सामरिक क्षमतेस धार देणे आणि हवाईदलांमधील आंतरकार्यक्षमता वाढविणे, हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये दहा देशांची पथके विविध परिस्थितींचा आढावा घेऊन त्यासाठी विशेष रणनिती आखण्यावर भर देणार आहेत.
‘कोब्रा वॉरियर’मध्येही दिसणार भारताची शक्ती
युनायटेड किंग्डममधील वॅडिन्ग्टन येथील रॉयल एयर फोर्सच्या हवाई तळावर होमाऱ्या कोब्रा वॉरियर या युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या १४५ हवाई योद्ध्यांची रवाना झाली आहे. हा सराव ६ ते २४ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे.
युद्धसरावामध्ये भारतीय हवाईदलाचीपाच मिराज – २००० ही लढाऊ विमाने, दोन सी – १७ ग्लोबमास्टर आणि आयएल – ७८ हे हवेत इंधन भरणारे विमान सहभागी होणार आहे. हवाई युद्धामधील विविध प्रकारच्या परिस्थितीमध्ये सहभागी होणे आणि विविध हवाई दलांच्या सर्वोत्तम पद्धती शिकणे हा या युद्धसरावाचा उद्देश आहे. यामध्ये फिनलंड, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि सिंगापूर हवाई दलाच्या तुकड्या देखील रॉयल एयर फोर्स आणि भारतीय हवाई दलासोबत सहभागी होणार आहेत.