बंधुत्वाचे दुसरे नाव शरद चव्हाण!

    27-Feb-2023   
Total Views |
Sharad Chavan

‘हे विश्वची माझे घर’ अशी मंगलकामना करणारे आणि जगणारे शरद चव्हाण. त्यांच्या आयुष्याचा, कार्याचा आणि विचारांचा परिचय करुन देणारा हा लेख...

देशभरात कोणत्याही शहरात जा, तिथे शरद चव्हाण यांची ओळख निघणार नाही, त्यांचे मित्र-स्नेही सापडणार नाही, असे होणे शक्यच नाही. मुंबईच नव्हे, तर देशभरातील विद्यार्थ्यांना किवा सामाजिक कार्यकर्त्यांना, संशोधकांना त्यांच्या राहत्या शहरातून दुसर्‍या राज्यात जायचे असेल आणि दुसर्‍या राज्यात व्यवस्था होत नसेल, कामासंदर्भात ओळख निघत नसेल, तर त्यांचा हक्काचा माणूस म्हणजे शरद चव्हाण. पार आसेतूहिमालय ते अगदी गुजरात ते प. बंगाल, सर्वत्र शरद चव्हाण यांना आपले मानणारे आणि त्यांच्या शब्दाखातर काम करणारी सज्जन कार्यशक्ती आहे. मराठमोळ्या माणसाची ही लोकप्रियता थक्क करते. लोकप्रियता सिनेमातील नटाला, राजकीय नेत्यालाही असते किंवा तत्सम कलाकारालाही असते, पण शरद यापैकी काहीही नाहीत. तरीसुद्धा त्यांच्या वाट्याला भारतभर भारून राहिलेला इतका स्नेह, गोतावळा कसा काय बरं? तर याबाबत शरद म्हणतात, “ही किमया अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची. ही किमया वनवासी कल्याण आश्रमाची.” अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले शरद यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अनेक मुख्य जबाबदार्‍यांच्या पदावर कार्य केले आहे. अगदी सुरुवातीला अभाविप दक्षिण मुंबई सदस्यापासून कार्य करणार्‍या शरद यांनी केंद्रीय पद स्तरावरही जबाबदारी भूषवली. आज ते वनवासी कल्याण आश्रमाचे केंद्रीय स्तरावरचे प्रशासकीय संपर्क प्रमुख आहेत. तसेच जनजाती सुरक्षा मंच, अखिल भारतीय मीडिया संयोजक आहेत.

असे वाटू शकते की, शरद यांच्या घरी रा. स्व. संघाशी संबंधित वातावरण होते का? तर शरद यांचे पिता कमलाकर हे नोकरीच्या संदर्भातून कम्युनिस्ट पक्षाशी जोडलेले. शरद यांचे मामा हे काँग्रेस पक्षाचे नेते. शरद हे किशोरवयात शिवसेनेचे कार्यकर्ते होते. मात्र, पुढे काही घटना घडल्या आणि शरद हे अभाविपचे कार्यकर्ते बनले. कोकणातील जयगड बंदरातील रेळे गावचे मूळ चव्हाण कुटुंब. कामानिमित्त चव्हाण कुटुंब खेतवाडी- मुंबईत आले. कमलाकर अतिशय रसिक. कलाशास्त्र, राजकारण, खेळ, नाटक सगळ्याच कलांमध्ये त्यांना रस. आपल्या मुलांनी नुसतेच शिक्षित नव्हे, तर सुसंस्कारी रसिक बनावे, असे त्यांना वाटे. त्यामुळे शरद यांना ते नाटक-चित्रपट बघायला नेत. इतकेच काय तर राजकीय सभा ऐकण्यासाठीही ते शरद यांना घेऊन जात. घरची आर्थिक गरिबी होती. मात्र, संस्कारांची सुबत्ता होती. चव्हाण कुटुंबीयांच्या समोर एक वृद्ध राहायचे, ते एकटेच होते. विषारी दारू पिऊन त्यांचे डोळे गेले. त्याला अन्न कोण बनवून देणार? जयश्रीबाईंनी त्या वृद्ध माणसाला त्याच्या मृत्यूपर्यंत दररोज दोनवेळचे अन्न दिले. पुढे त्या अंध वृद्धाची शेवटपर्यंत सेवा करणार्‍या जयश्रीबाई खरंच अन्नपूर्णा लक्ष्मीच! हे सगळे पाहून शरद घडत होते.

पुढे ‘प्रिटिंग टेक्नोलॉजी’ शिकत असतानाच शरद यांचा संपर्क अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आला. त्यावेळी अतुल काळसेकर, पराग वेदक, सुनील शिंदे, अभय बापट, रत्नाकर पाटील, श्रीरंग कुलकर्णी यांच्या मैत्रीसोबतच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आत्मियतेने जोडले गेले. अभाविपचे काम करताना कार्यालयात काम करून त्यांनी नोकरीही केली. अभाविपचे काम त्यांच्या आयुष्याचा श्वासच झाला. एकवेळ अशी आली की, कमलाकर यांनी शरद यांना म्हटले की, “तू घर तरी सोड नाही, तर अभाविप तरी.” त्यावेळी महिनाभरासाठी शरद यांनी घर सोडले, पण अभाविप सोडले नाही. पुढे कमलाकर यांनाही कळून चुकले की, आपला लेक त्याला जे वाटते तेच करणार. त्यामुळे त्यांनी शरद यांना पुढे कधीही अडवले नाही. अभाविपचे बाळासाहेब आपटे आणि त्यांच्या पत्नी निर्मला यांची आठवण सांगताना शरद म्हणतात की, ”आईच्या मायेने या दोघांनी काळजी घेतली. केवळ त्यांनीच नव्हे, तर संजय पाचपोर, गीता गुंडे, सुनील आंबेकर, अगदी दत्तात्रेय होसबाळे या सगळ्यांच्या विचारांनी आणि कार्यशैलीतून मी घडत गेलो आणि शिकलो!”

या सगळ्यांबरोबरच शरद यांच्यावर कारसेवेचाही खूप प्रभाव पडला. अयोध्येतील बाबरी ढाँचा पडला. शरद चव्हाण आणि त्यांच्यासोबत लाखो रामभक्तांनी ते याची देही याची डोळा पाहिले. त्या दिवशी जी रोषणाई, जो आनंद त्यांनी सर्वत्र पाहिला, त्यापुढे त्यानंतर त्यांना कोणतीही रोषणाई फिकीच वाटते. तसेच शरद हे त्यावेळी अभाविपतर्फे कारसेवा दक्षिण मुंबईचे प्रमुख होते. त्यामुळे त्यावेळी गर्भगृहात रामलल्लांची मूर्ती ठेवताना उपस्थित राहण्याचे भाग्यही त्यांना लाभले. पुढे श्रीरामजन्मभूमीचा निर्णय लागल्यानंतर ते पुन्हा अयोध्येला गेले होते, तेव्हा तिथे रामलल्लांचे दर्शन घेताना त्यांना वाटले की, खरंच मी भाग्यवान की, जीवंतपणी धर्मस्वप्न पूर्ण होताना पाहिले!

अभाविप आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आणि सहकार्‍यांच्या साथीने शरद यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केली. राज्यभरात नैसर्गिक आपत्ती असू दे वा मानवनिर्मित त्रास असू दे, शरद या सगळ्यांमध्ये संघटनेच्या माध्यमातून सेवेसाठी हजर राहिले. कोरोना काळात तर वनवासी कल्याण आश्रमाच्या केंद्रस्तरीय मदतकेंद्राचे काम त्यांनी पाहिले. वनवासी समाजातील बांधवांसाठी सातत्याने लढा उभारून त्यांना कायदेशीररित्या हक्क मिळवून देणारे शरद. ‘तू-मैं एक रक्त’च नव्हे, तर ‘हे विश्वची माझे घर’ म्हणत देशभरात बंधुभावाची छाप सोडणारे शरद चव्हाण एक आदर्श प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वच म्हणायला हवे!




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.