आग्रह मराठीचा ।।

    27-Feb-2023   
Total Views |
Marathi Bhasha Din
 
"माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ।। "



ही ओवी संत ज्ञानेश्वर माउलींनी सातशेहुन अधिक वर्षापूर्वी रचली आहे त्यांनंतर जे पसायदान माउलींनी विश्वात्मक देवाकडे मागितले ती प्रार्थना जेव्हा युनोच्या वार्षिक आमसभेत एकत्र म्हंटल्या जाईल तो मराठीचा सुवर्णदिन म्हणता येईल आणि तो दिवस खऱ्या अर्थाने मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा होईल. दरवर्षी आपण हा दिवस अतिशय उत्साहात साजरा करतो. परंतु भाषेच्या सर्वांगीण विकासाबाबत आपण कायमच उदासीन राहतो. जनता जनार्दनच मराठी भाषेची उपेक्षा करत आहे असे वाटत असतांना आता सोशल मीडियाच्या जमान्यात चित्र सकारात्मकता दर्शविणारे आहे. आज प्रत्येकाला मराठीचा अभिमानच नाही तर माज असायला हवा. अमृताशी पैजा जिंकणाऱ्या मराठीची काय स्थिती झाली आहे याचा प्रत्येकाने आजच्या दिवशी जरूर विचार करावा.

मराठी भाषेचा विचार करता प्रामुख्याने पाच मुद्द्यावर प्रकाश टाकतोय.

• मराठी साहित्य • मराठी बोली

• मराठी शाळा • प्रवाही भाषा

• भाषा आणि संस्कृती


मराठी साहित्य :- काळच्या सीमा ओलांडत कायम अजरामर ठरेल असे समृद्ध साहित्य मराठी भाषेत लिहिले गेले. असंख्य साहित्यिकांनी आपापल्या ताकदीनिशी जमेल तसे योगदान या मराठी भाषेला दिले. पण मग चूक कुठे झाली ? मराठी साहित्य आपण खरंच वाचतोय का ? आपल्या संग्रही मराठी पुस्तकं आहेत का ? आपण लोकांना भेट म्हणून मराठी पुस्तक देतो का ? आज मराठी पुस्तक विक्रेत्यांची काय अवस्था झाली आहे हे एकदा बघण्यासारखे आहे. जर आजच्या दिवशी आपण पुस्तक विक्रेत्याकडून एकतरी पुस्तक विकत घेतले तर त्याला भरपूर आनंद होईल आणि आपल्याकडूनही अक्षरवांग्मयाची अल्प सेवाही घडेल.


त्यानंतर मराठी- संवादाचे माध्यम: - आज मराठी बोलायला सर्वजण घाबरतात, प्रसंगी कमीपणाही वाटतो. हे कुठे तरी कमी व्हायला हवे. यापुढे दोन मराठी भाषिक एकत्र आले तर मराठीतच बोलण्याचा आग्रह धरूया, मग क्षेत्र कुठलंही असेल. आज तसा संकल्प करूया, मराठी बोलण्याचा. प्रसंगी इंग्रजी आणि इतर भाषा ही यायला हव्यातच आणि त्यांवरही मराठी भाषेइतकंच प्रभुत्व असावं पण निदान पारचितांकडे, मित्र परिवारात मराठी बोलण्याचा आग्रह धरुया.



मराठी शाळा :- आज निदान प्राथमिक शिक्षण तरी मराठी भाषेत असायला हवं. आजचं स्पर्धेचं युग बघता इंग्रजी भाषा महत्वाची आहेच पण संस्कृती आणि मातीशी नाळ जोडली जाण्यासाठी प्राथमिक शिक्षण मराठीतच व्हायला हवे असे वाटते आणि ते शक्य नसल्यास घरी पालकांनी, थोरल्या मोठ्यांनी तरी आपल्या घरीच तसे शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा.


प्रवाही भाषा :- कोणत्याही संवादाची मनातल्या भावनांसह परिपूर्ण अभिव्यक्ती ज्या माध्यमातून समोरच्याच्या मनावर प्रथम होते ती म्हणजे मराठी भाषा आहे. जागतिकीकरणाचा डोलारा आज पाश्चात्यांनी सावरल्याने त्यांच्या भाषा आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही. पण आपल्या लेखणीतून , आपल्या विचारातून मराठी जागी ठेवण्याची गरज आहे. म्हणून भाषा ही कायम प्रवाही असावी असं वाटतं.

भाषा आणि संस्कृती :- कोणतीही भाषा आत्मसात करताना ती तिच्यासोबत तिची संस्कृतीही थोड्याफार प्रमाणात घेऊन येत असते. त्यामुळे पाश्चात्य संस्कृती आपल्या अंगवळणी पडत असेल तर ते साहजिक म्हणावं लागेल. कारण जी संस्कृती शक्तिशाली आहे, विकसित आहे, आघाडीवर आहे तिचंच अनुकरण करणं हा मानवी स्वभाव आहे. पण त्यासोबत आपल्या भाषेतून आलेल्या संस्कृतीचा सारासार विचार करून स्वीकार करणे अथवा तिचा त्याग करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. ही मराठी शे-दोनशे नव्हे तर तब्बल अडीच हजार वर्षांपासून मानवाला व्यक्त होण्यासाठीचे समर्थ माध्यम बनली आहे. अनेक थोर संत, साहित्यिक,कवी, लेखक या मराठीसाठी आग्रही होते आणि आजही आहेत. मराठीचा गोडवा, तिचे वैचारिक अधिष्ठान आणि तिचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असायला हवे. हाच "मराठीचा आग्रह" मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दृढ करत मराठी भाषा दिग्विजयी करण्याचा प्रयत्न करणे अधिक उचित ठरेल. कारण सुरेश भट लिहितात,



आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सर्वेश फडणवीस

युवा लेखक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक, सुरुवातीला 'नागपूर तरुण भारत' येथे दोन वर्ष स्तंभ लेखन. दै. 'सोलापूर तरुण भारत'मध्ये 'गाभारा' ही मंदिरावर आधारित लेखमाला प्रकाशित. महाराष्ट्र टाइम्स, पुण्यनगरी या वृत्तपत्रांसाठी विविध विषयांवर लेखन. इंदूरहून निघणाऱ्या 'मराठी गौरव' या पाक्षिकासाठी लेखन. 'प्रज्ञालोक' या त्रैमासिकात लेखन तसेच 'प्रज्ञालोक अभ्यासक मंडळात संपादकीय मंडळात सक्रिय'. दै. 'मुंबई तरुण भारत'च्या 'कालजयी सावरकर' या नावाने प्रकाशित सावरकर विशेषांकात 'सावरकर आणि युद्धशास्त्र' या विषयावर लेखन. अनेक दिवाळी अंकांसाठीही लेखन. 'साप्ताहिक विवेक'मध्ये गेली दोन वर्षे झाले 'पद्मगौरव' स्तंभ सुरू. आकाशवाणी व इतरही माध्यमातून सतत लेखन.