"तुम्हारा G20, मेरा T20"; नामांतरावरुन इम्तियाज जलील यांचा तिळपापड!

    27-Feb-2023
Total Views |
 
Imtiaz Jalil on chhatrapati sambhajinagar
 
मुंबई : केंद्राने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याची ३५वर्षांपासून केली जाणारी मागणी मंजुर केली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला एमआयएमचे नेते,औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. तर G-20 परिषदेच्या बैठकीदरम्यान आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता.
 
मात्र आता त्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे प्रशासन अलर्ट झाले आहे. "तुम्हारा G20, मेरा T20...जर भाजप खेळ खेळू शकते, तर ते मी पण करु शकतो..." असं ट्वीट जलील यांनी केले आहे. विशेष म्हणजे शहरात वेगवेगळ्या देशातील पाहुणे G-20 परिषदेच्या निमित्ताने असल्याने त्यांच्यासमोर कोणतेही आंदोलन होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
 
 
 
दरम्यान, जलील यांनी ट्वीट करताच पोलिसांनी याची दखल घेतली आहे. तर जलील यांच्यासह शहरातील एमआयएमचे महत्वाच्या नेत्यांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. तसेच G-20 पाहुण्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी एमआयएमकडून अचानक आंदोलन केले जाणार नाही याची दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे.
 
 
 
काय म्हणाले इम्तियाज जलील?
 
शहराचे नाव बदलताच यावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, "फडणवीस साहेब हा जिल्हा माझा असून, कोणाच्या बापाचा नाही. कोणीही माझ्या शहरात येईल आणि हे नाव द्यायचं, ते नाव द्यायचं हा धंदे सुरु आहे का?" अशी टीका जलील यांनी केली. G-20 परिषदेची औरंगाबादमध्ये होणाऱ्या बैठकीच्या दिवशी मी जर विरोध केला तर काय करणार? मी जगाला दाखवेल की हे घाणेरडे राजकारण करत आहेत. आता फडणवीस गृहमंत्री आहेत ना आता त्यांना सांगतो, मी मोठं आंदोलन उभं करणार आहे. " असा इशारा त्यांनी दिला आहे.