मुंबई : जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक एलॉन मस्क यांची अंतराळ संशोधन संस्था स्पेसएक्स नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. स्पेसएक्स आज नवीन रॉकेट लाँच करणार असून त्यामधून चार वैज्ञानिकांना स्पेस स्टेशनमध्ये घेऊन जाणार आहे. स्पेसएक्स फॅलकॉन 9 रॉकेट लाँच करण्यात येणार आहे. हे रॉकेट अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाचे दोन अंतराळवीर, एक रशियन अंतराळवीर आणि संयुक्त अरब अमिरातीच्या एका अंतराळवीराला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार आहे.
स्पेसएक्स नवीन मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. स्पेस ड्रॅगन क्रू 6 (SpaceX Dragon Crew-6) हे स्पेसएक्सचं मिशन आज सुरु होईल. यासाठी स्पेसएक्स फॅलकॉन 9 रॉकेट (SpaceX Falcon 9) रॉकेट लाँच करण्यात येईल. फ्लोरिडा (Florida) येथील केनेडी स्पेस सेंटर (Kennedy Space Center) येथून दुपारी 1:45 वाजता (ET) हे रॉकेट लाँच करण्यात येईल. यासाठी हवामान परिस्थिती अनुकूल राहणं अपेक्षित आहे. क्रु ड्रॅगन कॅप्सूल (Dragon Crew Capsule) याला एंडेव्हर म्हणतात. सर्व काही नियोजित मोहिमेप्रमाणे पार पडलं तर, एंडेव्हर मंगळवारी पहाटे 2:38 वाजता (ET) ला ISS सह पोहोचेल. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
सहा महिने स्पेस स्टेशनवर राहणार अंतराळवीर!
हे अंतराळवीर अवकाशातील विविध विषयांवर संशोधन करणार आहेत. अंतराळवीरांची ही टीम सहा महिने स्पेस स्टेशनवर (ISS) राहणार आहे. यावेळी अंतराळातील वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करण्यात येईल. यावरुन आगामी काळात अंतराळातील रहस्य उलगडण्यासाठी मदत होईल.