मित्र तीन अन् लक्ष्य एक

    26-Feb-2023   
Total Views |
south-africas-naval-drills-with-russia-china-tantamount-to-joining-war-against-ukraine


दक्षिण आफ्रिका, रशिया आणि चीनमध्ये हिंद महासागरात दक्षिण आफ्रिकेच्या समुद्र किनार्‍याजवळ नुकताच संयुक्त सैन्य युद्धाभ्यास झाला. दक्षिण आफ्रिकेच्या ‘नॅशनल डिफेन्स फोर्स’ने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये लष्कराचे ३५० जण आणि रशियाची एडमिरल गोर्शकोव युद्धनौकाही सहभागी झाली. ही युद्धनौका जिरकॉन हायपरसोनिक मिसाईल डागण्यासाठी सक्षम असून हे मिसाईल आवाजाच्या गतीपेक्षा नऊ पट अधिक वेगाने एक हजार किलोमीटरपर्यंत डागले जाऊ शकते. परंतु, हा युद्धाभ्यास वादात सापडला असून पश्चिमी देशांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. युद्धाभ्यासाचे टायमिंग सुद्धा चकीत करणारे आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर हा युद्धाभ्यास झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले असून युक्रेनमध्ये एवढा हाहाकार माजवल्यानंतरही रशिया युद्धाभ्यास का करत आहे, हादेखील प्रश्नच आहे.युद्धाभ्यासात दक्षिण आफ्रिकेच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून रशिया यातून काय साध्य करू पाहत आहे, असाही प्रश्न विचारला जात आहे.


आफ्रिका हा देश खंडाच्या दक्षिण दिशेला असून या देशाचा दक्षिणेचा भाग समुद्राने व्यापलेला आहे, जो हिंद महासागर आणि हिंद प्रशांत महासागराचा भाग मानला जातो. हा भाग भारतासह अमेरिकेसाठी महत्त्वपूर्ण आहे. रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांनी याच भागामध्ये संयुक्त सैन्य युद्धाभ्यास केला. अमेरिकेच्या तीव्र विरोधामुळे हा युद्धाभ्यास वादात सापडला असून रशिया एखाद्या दुसर्‍या योजनेवर काम करत असण्याची शक्यताही नाकारली जाऊ शकत नाही. दरम्यान, पश्चिमी देशांना आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न रशिया करू इच्छित आहे. जागतिक राजकीय पटलावर कोणते देश सोबत आहे हेदेखील दाखवण्याचा रशियाचा प्रयत्न आहे, ज्याला रशियाची उत्तम राजकीय कुटनिती मानली जात आहे. असा युद्धाभ्यास करणे गरजेचे आहेच, कारण, त्यातून काय साध्य करता येतं, हे व्लादिमीर पुतीन जाणून आहेत. तसेच, त्यांना याचीही कल्पना आहे की, सद्य:परिस्थितीत रशियाने एखाद्या देशासोबत युद्धाभ्यास केला तर त्यावर आक्षेप घेत पश्चिमी देश त्याविरोधात उभे राहतील. याद्वारे पुतीन जगाला हे सांगू शकतील की संपूर्ण जग नव्हे तर फक्त पश्चिमी देशच रशियाच्या विरोधात आहे. पश्चिमी देशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्नही या युद्धाभ्यासाद्वारे केला जात आहे. परंतु, दक्षिण आफ्रिका यात का सहभागी झाला, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
 
दक्षिण आफ्रिकेवर टीका झाल्यानंतर त्यांनी त्याला प्रत्युत्तर देत सांगितले की, २०११ पासून आम्ही अमेरिकेसोबत चारवेळा संयुक्त सैन्य युद्धाभ्यास केला आहे. त्याचसोबत फ्रान्स आणि जर्मनीसोबतही सैन्यअभ्यास केला आहे. त्यामुळे रशियासोबत युद्धाभ्यास केला तर त्यावर आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही. प्रत्येक देश मित्रदेशासोबत संयुक्त युद्धाभ्यास करत असतो. त्यामुळे आम्हाला युद्धाभ्यास करण्यापासून थांबवणे हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन ठरेल. त्यामुळे अनेक आक्षेपांनंतरही दक्षिण आफ्रिकेने युद्धाभ्यासात सहभाग घेतलाच. दक्षिण आफ्रिकन सैन्याला आर्थिक अडचणींमुळे युद्धाभ्यासासाठी रशिया आणि चीनची मदत घ्यावी लागत आहे. हिंद महासागरात सैन्य लुटारूंच्या समस्येने ग्रस्त दक्षिण आफ्रिकेकडे त्यावर ठोस उपाय नाही ना सुरक्षा व्यवस्था. यासाठी अन्य देशांसोबत मिळून दक्षिण आफ्रिका युद्धाभ्यासाच्या मदतीने आपल्या क्षमता विकसित करत आहे. त्याचबरोबर दक्षिण आफिक्रेचा सत्तारूढ पक्ष आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे रशियाशी चांगले संबंध आहे. असे म्हटले जाते की, हे संबंध तीन दशकांपूर्वीचे आहे.

१९९४ मध्ये नेल्सन मंडेला प्रथम राष्ट्रपती झाले, त्याआधीपासून या पक्षाचे रशियाशी उत्तम संबंध आहेत. नेल्सन मंडेलांसहित या पक्षाचे अन्य नेते लोकशाहीसाठी संघर्ष करत असताना रशियाने त्यांना मदत केली होती. रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा दक्षिण ऑफ्रिकेने रशियावर निर्बंध लादण्यास नकार देत संयुक्त राष्ट्र संघात रशियाविरोधात निंदा प्रस्तावावर मतदान केले नाही. ब्रिक्सच्या माध्यमातूनही दक्षिण आफ्रिका चीन आणि रशियाशी जोडला गेला आहे. अशा अनेक गोष्टी आहे, ज्या दक्षिण आफ्रिका, रशिया आणि चीन यांच्यातील संयुक्त युद्धाभ्यासाला कारणीभूत आहे. तिन्ही देशांचे लक्ष्य एकच म्हणजे अमेरिका तर नाही ना? असो या तिन्ही देशांच्या संयुक्त युद्धाभ्यासामुळे पुढे काय समीकरणे तयार होतात, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.