नाशिक: ‘इंडिगो’ची बुधवार, दि. १५ मार्चपासून सुरू होणारी नाशिक-नागपूर विमान सेवा ‘हॉपिंग’ असणार आहे. त्यामुळे आता नाशिककरांना हैदराबादशी आणखी एका विमानसेवेने जोडणी होणार आहे. सध्या ओझर विमानतळावरून ‘स्पाईस जेट’च्या दिल्ली आणि हैदराबाद या दोनच विमानसेवा सुरू आहेत. बुधवार, दि. १५ मार्चपासून ‘इंडिगो’ची विमानसेवा सुरू होत असल्याने नाशिककरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
गोवा, नागपूर, हैदराबाद आणि अहमदाबाद अशा चार शहरांसाठी विमानसेवेची ‘इंडिगो’ने घोषणा केली आहे. त्यानंतर १ फेब्रुवारीपासून बुकिंग घेण्यास प्रारंभ केला आहे. ‘इंडिगो’च्या बर्याच सेवा या कोलकाता, कानपूर, बंगळुरु, चंदिगढ़, चेन्नई, दिल्ली, इंदूर, जयपूर, लखनौ, मंगळूर, कोझीकडे, तिरूपती, विशाखापट्टणम अशा ‘कनेक्टेड’ आहेत. त्यामुळे प्रवाशांना अन्य ठिकाणीदेखील प्रवाशाची सुलभ सुविधा आहे.
आता कंपनीची नाशिक-नागपूर सेवा थेट नसेल, तर हैदराबादपर्यंत असेल. कंपनीला थेट स्लॉट न मिळाल्याने ‘हॉपिंग’ सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. सकाळी ७.३० वा. हैदराबाद येथून निघणारे विमान नागपूर येथे ९.३०ला पोहोचेल त्यानंतर तेथून निघालेले नागपूर येथील विमान सकाळी ११ वाजता नाशिकला पोहोचणार आहे.
नाशिकमधून नागपूरसाठी सायंकाळी ७.२० वाजता विमान निघेल आणि नंतर ९ वाजता ते नागपूरला पोहोचेल. तेथून ९.१५ वाजता निघून हैदराबादला ११ वाजता ते पोहोचेल अशी माहिती ‘निमा’च्या ‘एव्हीएशन कमिटी’चे मनीष रावळ यांनी दिली.