परदेशातून भारतविरोधी ‘सोरोस षड्यंत्र’

    25-Feb-2023   
Total Views |
George Soros
 
भारताने ‘एफसीआरए’ नियमांची मजबुती केल्यामुळे जॉर्ज सोरोसचे हिंदू आणि भारतविरोधी प्रचारासाठी फंडिंग बंद झाले, ज्यामुळे त्यांचा राग अनावर झालेला दिसतो. जॉर्ज सोरोसच्या इच्छेप्रमाणे २०२४च्या निवडणुकीत सरकार बदल, भारतीय हितसंबंधांना हानी पोहोचविण्यासाठी एक अब्ज डॉलर्स खर्च करण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी म्युनिक येथील सुरक्षा परिषदेच्या भाषणात गौतम अदानी यांचा मुद्दाम विषय काढला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणी उत्तर द्यावंच लागेल, असंही त्यांनी म्हटलं. ९२ वर्षीय जॉर्ज सोरोस यांनी ‘अदानी’ समूहाला बसलेल्या धक्क्यांमुळे भारतामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कमकुवत होईल, असे विधान एका कार्यक्रमात केलं. मुस्लीम समाजाविरोधात चिथावणी देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकिर्दीचा एक भाग आहे.

‘रायसिया अ‍ॅट सिडनी डायलॉग’ या कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अब्जाधीश अराजकतावादी जॉर्ज सोरोस आणि त्याच्या ‘इकोसिस्टीम’वर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, “सोरोस हे न्यूयॉर्कस्थित वृद्ध, श्रीमंत, हटवादी आणि धोकादायक व्यक्ती आहेत. त्यांना अद्याप असेच वाटते की संपूर्ण जग कसे चालते, हे तेच ठरवतात. त्यांना वाटते जगाने त्यांच्या हिशोबाने चालावे, आम्ही त्या देशांपैकी नाही. असे लोक त्यांना हवे ते घडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. त्यांना हवा तो व्यक्ती निवडून आल्यास त्यांच्यासाठी निवडणूक योग्य असते. मात्र, निवडणुकीत वेगळा निकाल लागला, तर ते लोकशाहीस दोष देतात. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार ते मुक्त समाजाची वकिली करण्याच्या नावाखाली करतात.”

मुक्त समाजाच्या नावाखाली भयनिर्मिती

सोरोस हे मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवतात. भारत हा लोकशाहीवादी देश असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नसल्याचे त्यांचे अजब मत आहे. यापूर्वीदेखील त्यांनी भारतावर देशातील लाखो मुस्लिमांचे नागरिकत्व काढून घेतल्याचा हास्यास्पद आरोप केला होता. जागतिकीकरण आणि मुक्त समाजाच्या नावाखाली अशा प्रकारे भय निर्माण करणे, हा दूषित मनोविकृतीचा प्रकार आहे.

मागील काही वर्षांपासून सोरोस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकाकर राहिले आहेत. आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. “ज्याने ‘बँक ऑफ इंग्लंड’ला संपवले आणि ज्याच्यावर ‘आर्थिक गुन्हेगार’ म्हणून ठपका लागला आहे, त्याने आता भारतीय लोकशाही मोडण्याचा विडा उचलला आहे.” याआधीही आम्ही परदेशी शक्तींचा पराभव केला आहे. देशाविरुद्धचे कोणतेही षड्यंत्र खपवून घेतले जाणार नाही,’ आमचे सरकार जनतेसाठी असल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या.

फायद्यासाठी राजकीय फंडिंग
 

जॉर्ज सोरोस हे ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ या संस्थेचे संस्थापक आहेत. नरेंद्र मोदी यांना पदच्युत करण्याच्या पडद्यामागच्या खेळीमागे सोरोस हे सूत्रधार असल्याचा आरोप आहे. ‘ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्स’मध्ये, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते २५४व्या क्रमांकावर आहेत. ते सध्या काही मोठ्या गुंतवणूकदारांसाठी २८ अब्ज निधीचे व्यवस्थापन करतात. त्यांची वैयक्तिक संपत्ती ८.५ अब्ज आहे. रुपयात त्यांची संपत्ती ५० हजार कोटींहून अधिक आहे. त्यांच्या मते, लोकशाहीवादी, पारदर्शक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करणार्‍या गटांना ते निधी पुरवतात.आपल्या ’ओपन सोसायटी फाऊंडेशन’द्वारे ’समतेचं राज्य’ यावं यासाठी विविध देशातली सार्वभौम सरकारंसुद्धा उलथवायची, ही त्यांची कार्यपद्धती आहे.

 
एखादा देश हेरला की, तिथल्या विरोधकांना पैसे पुरवायचे, तिथल्याच आंदोलकांना एकत्र करून सरकारविरोधात रस्त्यावर आणायचं, त्या देशाचा चक्का जाम करायचा, नंतर आंदोलनं हिंसक करायची, त्यावर सरकारने हिंसेने प्रत्युत्तर दिलं की तिथल्या जनतेला चिथावून सरकार विरोधात उठाव घडवून आणायचा, सरकार पाडायचं, आपलं सोयीचे सरकार तिथे सत्तास्थानी बसवून तो देश लुटायचा, हाच या मंडळीचा अजेंडा!

‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ व अनेक अवैध व्यवसाय


जॉर्ज सोरोस यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ‘बँक ऑफ इंग्लंड’चे मोठे नुकसान केले. त्यांनी १९९० मध्ये पौंड विरुद्ध सट्टेबाजी करत भरपूर नफा कमावला. यानंतर ते श्रीमंतांच्या यादीत पोहोचले. यामुळे ब्रिटनमधील तज्ज्ञ सोरोस यांच्यावर टीका करतात. यामुळे त्यांना ब्रिटिश पौंड तोडणारा व्यक्ती म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्यांवर चलन बाजारात सट्टा लावून अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा आरोप आहे. ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ इतर देशांच्या राजकारणात हस्तक्षेप करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करते, अराजकता माजवते. मोदी, रशियाचे अध्यक्ष पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक जॉर्ज सोरोस यांच्यावर व्यवसाय आणि समाजसेवेच्या नावाखाली जगातील विविध देशांतील राजकारणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. या आरोपावरुन काही अरब देशांनी त्यांच्या संस्थांवर बंदी घातली आहे.

संपत्ती त्यांनी अवैध व्यवसायातून जमा केली आहे. २००२ मध्ये फ्रेंच न्यायालयाने सोरोसला अवैध व्यवसायासाठी दोषी ठरवले होते आणि त्यासाठी फ्रेंच न्यायालयाने सोरोस यांना २.३ दशलक्ष दंड ठोठावला होता. सर्वोच्चन्यायालयात अपील करूनही त्यांचा दंड कायम ठेवण्यात आला.अमेरिकेतही बेसबॉल सामन्यांमध्ये पैसे गुंतवून बेकायदेशीरपणे पैसे कमावल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्याचवेळी सोरोस हे इटलीच्या फुटबॉल संघ ‘एएस रोमा’च्या संदर्भात वादात सापडले होते. जॉर्ज सोरोस, तथा कथित मानवी हक्कांचे समर्थक आहेत. त्यांनी ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ चळवळीला निधी दिल्याचा आरोप केला आहे. विविध आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी ते निधी पुरवत असल्याचाही त्यांच्यांवर आरोप आहे.
 
भारतावर अनेकदा हल्ला


सोरोस यांनी भारतातील नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे ‘सीएडी’ काश्मीरातून ‘कलम ३७०’ हटवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावरही तिखट टीका केली होती.‘सीएएनआरसी’ विरोधातलं शाहीनबाग आंदोलन, शेतकरी कायद्यांच्या विरोधातलं किसान आंदोलन, ‘अग्निवीर योजने’च्या विरोधातला आंदोलन, ही तीनही आंदोलनं अचानक हिंसक झाली.आमच्या लोकशाहीत जनता हिरिरीने भाग घेते. ही अभूतपूर्व गोष्ट आहे. आमचे निवडणूक निकाल एका निष्कर्षापर्यंत पोहोचतात. निवडणुकीच्या प्रक्रियेवर कुणीही सवाल उपस्थित करत नाही. निवडणुकीनंतर न्यायालयात मध्यस्थी केली जाते, त्या देशांत आमचा समावेश होत नाही.

‘हिंडेनबर्ग’ अहवाल हा भारतावरील हल्ला आणि देशाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे. परदेशी शक्तीने घोषित केले आहे की, ते भारताच्या लोकशाही संरचनेवर हल्ला करतील.त्यामुळे सरकारमध्ये कोणी राहायचे आणि कोणी बाहेर पडायचे, हे भारतातील जनता ठरवेल. एका ९२ वर्षांच्या व्यक्तीच्या विधानाने पडेल इतके सरकार कमकुवत नाही. सोरोस यांचे वक्तव्य हे केवळ पंतप्रधान मोदींवरच नव्हे, तर भारतावरही एकप्रकारचा हल्ला आहे. सोरोस यांना भारतात त्यांच्या आवडीचे सरकार स्थापन करून पैसे कमवायचे आहेत, जे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली शक्य नाही. भारत सरकारने ठोस आणि जलद प्रतिसाद जारी केला आहे. भारताने सोरोसला धडा शिकवण्याची वेळ आली आहे का?

 
‘स्टॉप सोरोस’ हा कायदा हंगेरीद्वारा पारित केला गेला आहे. जो त्यांचा जन्मदेश आहे. कारण, सोरोस त्यांना त्यांच्या देशातही नको आहे. सोरोस सध्या अमेरिकेत स्थायिक आहे. २०१४ मध्ये त्यांनी भारतात भारतीय सरकाराविरोधी एक विशेष कार्यक्रमदेखील सुरू केला होता.भारताने ‘एफसीआरए’ नियमांची मजबुती केल्यामुळे जॉर्ज सोरोसचे हिंदू आणि भारतविरोधी प्रचारासाठी फंडिंग बंद झाले, ज्यामुळे त्यांचा राग अनावर झालेला दिसतो. जॉर्ज सोरोसच्या इच्छेप्रमाणे २०२४च्या निवडणुकीत सरकार बदल, भारतीय हितसंबंधांना हानी पोहोचविण्यासाठी एक अब्ज डॉलर्स खर्च करण्याची घोषणा केली आहे. २०२४च्या निवडणुकीत जॉर्ज सोरोस यांना हवे असलेले सरकार निवडून आणण्यासाठी ‘बीबीसी’च्या माहितीपटानंतर परकीयांचा हात असल्याचे स्पष्ट होते.
 
युद्ध भारतात सगळ्यांना मिळूनच लढायचंय आहे

आता २०२३-२४च्या निवडणुकाही जवळ आल्या आहेत. आता अशाचप्रकारे मोदी सरकारवर देशविदेशातून उघड हल्ले केले जातील. भारताची जागतिक प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होईल. शेअर मार्केट्स गडगडवली जातील. पुन्हा कुठल्या ना कुठल्या आरक्षणाचं आंदोलन सुरू केलं जाईल. देशभरात जागोजागी येणार्‍या नव्या इन्व्हेस्टमेंट/उद्योगांच्या विरोधात रण माजवलं जाईल. थोडक्यात, वेगवेगळ्या मार्गाने देशात हिंसा केली जाईल, स्थैर्य तोडता येईल, ते सगळे प्रयत्न सोरोस आणि त्यांच्या अनुयायांकडून पुढचे वर्षभर होतील. या लढाईत देशप्रेमी नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण सावध राहाण्याची गरज आहे.देशाविरोधात सुरू असणारी सगळी कारस्थानं उघडी पाडून त्यातलं सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. देशविघातक कृत्यांविरोधातलं युद्ध भारतात सगळ्यांना मिळूनच लढायचं आहे!


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.