आता ‘क्षमा’ नाही...!

    23-Feb-2023   
Total Views |
kshama sawant


जाता जात नाही ती म्हणजे जात. जातीभेद ही समाजव्यवस्थेला लागलेली कीड असून ती नष्ट करण्यात आजही म्हणावे तितके यश आलेले नाही. जातीव्यवस्थेला लागलेली ही कीड भारतातच नव्हे, तर अगदी सातासमुद्रापार स्वतःला आर्थिक महासत्ता म्हणवणार्‍या अमेरिकेतही पाहायला मिळते.परंतु, एका पुणेकर महिलेने अमेरिकेतील सिएटल शहरात जातीभेदावर प्रतिबंध घालण्यासाठी आवाज उठवला. क्षमा सावंत असे या महिलेचे नाव असून त्या सिएटल सिटी काऊंसिलच्या सदस्या आहेत. त्यांनी सिएटल शहरात जातीभेदावर बंदी घालण्याची मागणी करत एक विधेयक आणले. ‘सहा विरूद्ध एक’ अशा फरकाने हे विधेयक मंजूरही झाले. त्यामुळे जातीभेदावर बंदी घालणारे सिएटल हे अमेरिकेतील पहिलेच शहर ठरले आहे.

अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेल्या सिएटलमध्ये ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘अ‍ॅमेझॉन’, ‘स्टारबक्स’ यांसारख्या मोठमोठ्या जागतिक ब्रॅण्ड्सची मुख्यालये असून याठिकाणी मोठ्या संख्येने भारतीय वास्तव्यास आहेत. वर्णभेदासह जातीभेदही सिएटलमध्ये दिसून येत असल्याचे सावंत यांचे म्हणणे. ‘अमेरिकन कम्युनिटी सर्व्हे’च्या २०१८च्या आकडेवारीनुसार अमेरिकेत भारतीय वंशाचे जवळपास ४२ लाख लोक राहतात. अमेरिकेत मूलभूत हक्कांसाठी लढणार्‍या ‘इक्वॅलिटी लॅब्स’ या संघटनेच्या मते, अमेरिकेतील शाळांसह कामाच्या ठिकाणी जातीभेद होतो. परंतु, त्यावर फार बोललं जात नाही, तर अनेकजण व्हिसासंदर्भातील कायदेशीर मर्यादांमुळे यावर बोलणे टाळतात.
 
भारतीय वंशाच्या क्षमा सावंत यांचा जन्म पुण्यातील एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांची आई सेवानिवृत्त प्राध्यापिका आणि वडील ‘सिव्हिल इंजिनिअर.’ एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या मुलीने अमेरिकेच्या राजकारणात आपले पाय कसे रोवले, हे यानिमित्ताने जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे ठरावे.जन्म पुण्यातील असला तरीही क्षमा यांचे संपूर्ण शिक्षण मुंबईत झाले. वयाच्या १३व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून ‘बीएससी कम्प्युटर सायन्स’ची पदवी घेतली. लग्नानंतर त्या पतीसोबत अमेरिकेत स्थायिक झाल्या. ‘प्रोग्रामर’ म्हणून जवळपास दीड वर्षं काम केल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्राकडे आपला मोर्चा वळवला आणि अर्थशास्त्रामध्ये ‘पीएच.डी’ मिळवली. ‘पीचए.डी’ मिळवल्यानंतर त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. २०१२ साली ‘वॉशिंग्टन हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्ह’च्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. परंतु, त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि त्याचे फळही त्यांना लवकरच मिळाले. २०१३ मध्ये सिएटल सिटी काऊंसिलच्या निवडणुकीत त्या निवडून आल्या. 

विशेष म्हणजे, सिएटल सिटीत निवडणूक जिंकणार्‍या त्या पहिल्या समाजवादी तसेच पहिल्या भारतीय वंशाच्या महिला ठरल्या. अमेरिकेत दलितांविरूद्ध होणारा भेदभाव हा दक्षिण आशियाप्रमाणेच सर्वत्र दिसत नसला तरीही अमेरिकेत भेदभाव होतो, हे वास्तव आहेच. हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे, अशा शब्दांत क्षमा यांनी विरोधकांना उत्तर दिले. जातीव्यवस्था उच्च जातींना अनेक विशेषाधिकार देते. मात्र, खालच्या जातीतील लोकांना अधिकार मिळत नाही. त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागतो, असे म्हणत क्षमा सिएटल शहरात जातीभेदावर बंदी घालण्यात यशस्वी ठरल्या.दरम्यान, गेल्या तीन वर्षांत अमेरिकेत दहा हिंदू मंदिरे आणि महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह पाच पुतळ्यांवर हल्ला झाला. परंतु, यावर कुणी आवाज उठवल्याचे ऐकिवात नाही. आता सिएटलमध्ये हे विधेयक आल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणावर विरोधही झाला. अनेकांनी हे विधेयक रद्द करण्यासाठी आंदोलने केली. भारतीय वंशाच्या लोकांना लक्ष्य करण्याचा हा डाव असल्याचे म्हटले जात आहे.

‘कोएलिशन ऑफ हिंदूस ऑफ नॉर्थ अमेरिका’ यांच्या मते, या विधेयकामुळे अमेरिकेत राहणारे हिंदू लोक जातीभेद करतात, यावर शिक्कामोर्तब होईल. भारतात १९४८ सालीच जातीभेदावर कायदा आणून त्यावर बंदी घालण्यात आली. परंतु, तरीही जातीभेद पूर्णतः गेला नाही. विशेषतः अमेरिकन राज्यघटनेत कोणत्याही भेदभावावर कायदा अस्तित्वात आहेच, त्यामुळे या नव्या कायद्याची काहीएक गरज नाही. तसेच, हिंदू धर्मीयांना घाबरवण्याचा हा एक प्रयत्न असल्याचाही एक मतप्रवाह दिसून येतो. जातीभेद हटवणे गरजेचेच. परंतु, त्याआडून कुणी आपले वेगळेच इप्सित साध्य करणार नाही ना, याची मात्र दक्षता घेणेही तितकेचे आवश्यक!





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.