‘हायपरऑटोमेशन’ची भरारी...

    21-Feb-2023   
Total Views |
Indian companies are seen turning towards 'hyperautomation'

जसा बदल हा निसर्गाचा नियम आहे, तसेच हल्ली तंत्रज्ञानातील बदल हादेखील उद्योग-व्यवसायात टिकून राहण्यासाठी अपरिहार्यच. तेव्हा काळाची पावले वेळीच ओळखून भारतीय कंपन्या ‘हायपरऑटोमेशन’कडे वळताना दिसतात. त्याचबरोबर तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय ‘स्टार्टअप्स’ची भरारीही तितकीच आश्वासक म्हणावी लागेल. त्याविषयी...

यक्रोसॉफ्ट’ या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक आणि जगातील श्रीमंत माणसांमध्ये गणना होणारे बिल गेट्स म्हणतात की, “The advance of technology is based on making it fit in so that you don't really even notice it, so it's part of everyday life.” गेट्स यांचे हे विचार आजच्या युगात तंत्रज्ञान सामान्य जीवनाशी किती एकरुप झाले आहे, त्याचीच व्याप्ती दर्शविणारे. कारण, आज आयुष्याच्या प्रत्येक लहानमोठ्या पायरीवर तंत्रज्ञानाची साथ ही मोलाची. तेव्हा ज्याप्रमाणे माणसाचे वैयक्तिक आयुष्य तंत्रज्ञानकेंद्रित झाले, त्याचप्रमाणे उद्योग-व्यवसायांनाही या तंत्रज्ञानाशिवाय गत्यंतर नाहीच. मग ते शिक्षण क्षेत्र असो आरोग्य अथवा उत्पादन-सेवा क्षेत्र, तंत्रज्ञानाचे प्रतिबिंब सर्वत्र उमटलेले दिसते. त्यातच जे उद्योगधंदे तंत्रज्ञानाच्या या कालप्रवाहात स्वत:मध्ये वेळीच योग्य ते बदल करत नाही, त्यांची प्रगती खुंटते. परिणामी, व्यवसायात प्रारंभी साचलेपणा आणि नंतर गळती लागून उद्योग डबघाईला जातो. म्हणूनच आज लहानातल्या लहान उद्योगापासून ते मोठमोठ्या कंपन्यांपर्यंत त्या त्या क्षेत्रातील नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याची, क्षमता वाढविण्याची एकच चढाओढ लागलेली दिसते.

अशाप्रकारे उद्योग-व्यवसायातील विशिष्ट प्रक्रियेमध्ये होणारे तांत्रिक बदल यांना ‘ऑटोमेशन’ असे संबोधले जाते, पण जेव्हा हेच बदल संपूर्ण संस्थात्मक पातळीवर विविध तंत्रज्ञानाच्या साथीने वेगाने राबविले जातात, त्यावेळी त्याला ‘हायपरऑटोमेशन’ म्हणून ओळखले जाते. भारतातही अशाप्रकारे ‘हायपरऑटोमेशन’ करणार्‍या आणि ‘हायपरऑटोमेशन’ची सेवा देणार्‍या, अशा दोन्ही कंपन्यांची संख्या अलीकडच्या काळात वाढल्याची माहिती समोर आली आहे.पूर्वी ‘हायपरऑटोमेशन’ ही पाश्चात्त्य संकल्पना असून विकसित देशांपुरतीच मर्यादित असल्याचा एक समज प्रचलित होता. परंतु, भारतासह अनेक विकसनशील देशांत आज याच ‘हायपरऑटोमेशन’ची प्रक्रिया गतिमान झालेली दिसते. या ‘हायपरऑटोमेशन’मुळे केवळ उद्योग-सेवांची प्रक्रियाच वेगवान झालेली नाही, तर त्यामध्ये अधिक सुसूत्रता आणि प्रमाणबद्धता आली. अशा या ‘हायपरऑटोमेशन’च्या प्रक्रियेत संस्थेतील केवळ एकाच विभागाचे अथवा एकाच प्रक्रियेचे आधुनिकीकरण असा संकुचित विचार न करता, संपूर्ण संस्थेतील कारभाराच्या तांत्रिक विकासाचा समग्र विचार केला जातो. त्याचबरोबर ‘हायपरऑटोमेशन’ म्हणजे फक्त ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर असेही हे गणित मर्यादित नाही.

यामध्ये ‘एआय’सोबतच मशीन लर्निंग, रोबोट ट्रेनिंग यांसारख्या अत्यानुधिक तंत्राचीही सांगड घातली जाते. हे सगळे करताना साहजिकच सायबर सुरक्षेचाही तितकाच सांगोपांग विचार ओघाने आलाच. कारण, बहुतांश कंपन्यांनी त्यांचा डेटा, डेटाची सुरक्षा यांचा फारसा खोलवर विचार केलेला नसतो. तेव्हा, ‘हायपरऑटोमेशन’मध्ये कंपनीच्या लहानात लहान डेटापासून ते अगदी संकेतस्थळापर्यंत प्रत्येक तांत्रिक बारकाव्याची पुरेपूर दखल घेऊन कंपनीच्या, व्यवसायाच्या गरजेनुरुप सायबर सुरक्षाकवच प्रदान केले जाते. कंपनीच्या विविध विभागांचा विखुरलेला डेटा, त्यांचे परस्पर संबंध यांचाही विचार करुन ‘डेटा इन्टिग्रेशन’च्या प्रक्रियेची आखणी होते. आता सगळेच तंत्रज्ञानावर ढकलले, तर मग कंपनीतील मनुष्यबळाचे काय? त्यांच्या रोजगाराचे काय? असे प्रश्न उपस्थित होणे साहजिकच. परंतु, ‘हायपरऑटोमेशन’मध्ये जे काम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करणे सहजशक्य आहे, त्यासाठी तशी व्यवस्था उभी केली जाते. पण, मग पूर्वी तेच काम ‘मॅन्युअली’ करणार्‍या व्यक्तीला त्या तांत्रिक जबाबदारीतून मुक्त करुन, ज्या कामांमध्ये अधिक मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता आहे, अशा जबाबदार्‍यांसाठी हेच मनुष्यबळ वापरले जाते.

म्हणजे जर एका संस्थेत ‘डेटाएन्ट्री’ हे काम, ‘एआय’च्या वापरातून नियमितपणे होऊ लागले, तर संबंधित काम करणार्‍या व्यक्तीला कदाचित डेटाचे विश्लेषण, निरीक्षणे नोंदवणे यांसारखी मानवी बुद्धिमत्तेला अनुकूल कामे वर्ग केली जाऊ शकतात. त्यामुळे साहजिकच मनुष्यबळ नसत्या तांत्रिक-दैनंदिन कामांत अडकून न राहता त्यांची उत्पादकातही वाढण्यातही याचा लाभ होतो. तेव्हा, आरोग्य, शिक्षण, इन्शुरन्स, बँकिंग अशा विविध क्षेत्रांत या ‘हायपरऑटोमेशन’ प्रक्रियेने वेग घेतला असून, यामुळे सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानकेंद्रित स्पर्धा आणि दर्जाला महत्त्व प्राप्त होणार आहे. तसेच ‘हायपरऑटोमेशन’ची सेवा पुरवठादार कंपन्यांमुळे ’आयटी’ क्षेत्रातही लाखोंनी रोजगार उपलब्ध होणार असून नवतंत्रज्ञानाचे नवकौशल्य अवगत असणार्‍यांना सुगीचे दिवस येतील, हे वेगळे सांगायला नको.

एकीकडे अशाप्रकारे ‘हायपरऑटोमेशन’ प्रक्रिया बाळसे धरत असताना, दुसरीकडे तंत्रज्ञान क्षेत्रातील आणखीन एक सुवार्ता कानी पडली. गेल्या वर्षी म्हणजे २०२२ साली एकट्या भारतात १३०० ’टेक-स्टार्टअप्स’ची भर पडली. तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय ’स्टार्टअप्स’ची संख्या ही २५-२७ हजारांच्या घरात पोहोचल्याचे ‘नासकॉम’च्या एका अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे या क्रमवारीत आता अमेरिका आणि चीननंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. त्याचबरोबर २०२२ साली भारतात २३ नवीन ‘युनिकॉर्न’ स्टार्टअपची भर पडल्याचेही ‘नासकॉम’चा अहवाल अधोरेखित करतो. म्हणजे एकूणच काय तर ‘हायपरऑटोमेशन’, ’युनिकॉर्न स्टार्टअप्स’ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘स्टार्टअप्स’भरारीमुळे, भारताची वाटचाल नेमक्या कोणत्या दिशेने सुरु आहे, याची प्रचिती यावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विविध ’डिजिटल’ क्रांतीशी संबंधित अभियानांचा, मोहिमांचा हा तंत्रज्ञान विकास एक परिपाक म्हणावा लागेल. म्हणूनच मोदींनी दिलेला ‘जय जवान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’चा नारा भारताची तंत्रसुसज्जता वृद्धिंगत करणारा ठरला आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची