शिक्षणासाठीचा ‘अक्षय’ प्रवास

    21-Feb-2023   
Total Views |
Akshay Educational Institute


विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाबरोबर रोजगाराभिमुख बनवण्याचा प्रयत्न करणारे अक्षय ढमाळ यांच्या ’अक्षय एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’च्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...

जिंकणारा कधीचं वेगळं काम करत नाही, तर तो प्रत्येक काम इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने करतो, असे म्हणतात. शिक्षण क्षेत्रात असेच वेगळे काम करण्याचा निर्धार केलेले अक्षय अप्पाजी ढमाळ.अक्षय ढमाळ यांचा जन्म खंडाळा येथील अंबरवाडी या छोट्याशा गावात झाला. अक्षय हे मध्यमवर्गीय कुटुंबातील. त्यांचे वडील रेल्वेत माथाडी कामगार म्हणून काम करायचे. ढमाळ यांचे प्राथमिक शिक्षण पराग विद्यालय, भांडुप येथे झाले. त्यानंतर त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे आपले माध्यमिक शिक्षण राजेंद्र विद्यालय, खंडाळा येथून पूर्ण करावे लागले. त्यानंतर ते पुन्हा मुंबईत आले आणि पराग विद्यालयातून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

मग आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे, असे ठरवून त्यांनी एस. एम. शेट्टी महाविद्यालयातून ’बीएमएस’ ही पदवी मिळवली. तसेच त्यांनी ‘कोहिनूर बिझनेस स्कूल’मधून ’एमबीए’चे शिक्षण पूर्ण केले. खरंतर एखाद्या कंपनीत मोठे पद मिळवायचे असेल, तर ‘एमबीए’ करायला हवे. म्हणूनच ‘एमबीए’ केल्याचे ढमाळ सांगतात.२०१६ पासून ढमाळ यांनी व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य विकास, यशाचा मूलमंत्र यांसारख्या विषयांवर महाविद्यालयात जाऊन प्रेरणादायी व्याख्याने द्यायला सुरुवात केली. त्यादरम्यान शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची गोडी ढमाळ यांच्यात निर्माण झाली.त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन अक्षय ढमाळ यांनी २०२० साली ’अक्षय एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’ची सुरुवात मुंबईतील प्रभादेवी येथे केली.


Akshay Educational Institute


’अक्षय एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’ हे MBA - CAT / CET / ATMA / CMAT / MAT / त्याचबरोबर एसबीआय, बीपीएस, आयबीपीएस, एलआयसी, एसएससी, आरआरबी अशा प्रवेश परीक्षांसाठी कमीतकमी किमतीत गुणवत्तापूर्ण शिक्षण सुविधा उपलब्ध करून देते. आज प्रभादेवी, भांडुप, डोंबिवली येथे ‘अक्षय एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’च्या शाखा कार्यरत आहेत. त्याचबरोबर भविष्यात पुणे, नाशिक, सातारा या ठिकाणी ‘अक्षय एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’च्या शाखा सुरु करण्याचा ढमाळ यांचा मानस आहे. सध्या त्यांच्या मुंबई आणि मुंबई उपनगरातील शाखेत ३०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

 
Akshay Dhamal


ढमाळ यांना उच्च शिक्षण घेतल्यानंतर परदेशात जाऊन काम करण्याची संधी होती. परंतु, मायदेशी राहून शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्धार त्यांनी केला. लहानपणी ढमाळ यांना शिक्षण घेण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. त्यामुळे शिक्षणासाठी संघर्ष करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्याचे काम ढमाळ करतात.अक्षय ढमाळ नेहमी असा दावा करतात की, “माझ्याकडे एखादा विद्यार्थी आला तर त्याला मी श्रीमंत बनवेन. परंतु, मी त्याला पैसे देणार नाही, तर त्याला चांगलं शिक्षण देऊन एखाद्या उच्च पदावर तो विद्यार्थी कसा काम करेल, यासाठी प्रयत्नरत राहीन,” असे ढमाळ सांगतात. त्यामुळे गरिबी ही फक्त शिक्षणानेच दूर होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे.
 
‘अक्षय एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’ हे शिक्षण अधिकाधिक रोजगाराभिमुख कसे करता येईल आणि देशासाठी उत्तम नागरिक कसे घडविता येतील, यासाठी कार्यरत आहे. ढमाळ यांच्याकडे येणारे विद्यार्थी हे बहुतांशी मध्यमवर्गीय कुटुंबातील असतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, याकडे ढमाळ यांच्या शिक्षण संस्थेचा विशेष कल दिसून येतो. भविष्यात ’एमबीए’चे शिक्षण देणारे महाविद्यालय सुरू करण्याचा ढमाळ यांचा मानस आहे.
 
“पैसा, ताकद आणि समजूतदारपणा हा आजच्या विद्यार्थ्यांमध्ये असायला हवा आणि या तीन गोष्टी जर विद्यार्थ्यांमध्ये असतील तर समाजात बेरोजगारी राहणार नाही,” असे ढमाळ यांना वाटते. त्यामुळे तरुणांना जागृत करण्याचे अक्षय ढमाळ यांचे काम अविरत सुरू आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा.


 
-सुप्रिम मस्कर
(अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६९४०२८६०)


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.