म... मातृभाषेचा !

    20-Feb-2023   
Total Views |
International Mother Language Day

आज दि. २१ फेब्रुवारी. हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. ‘युनेस्को’ने दि. १७ नोव्हेंबर, १९९९ पासून मातृभाषांच्या रक्षणासाठी आणि सन्मानासाठी ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ साजरा करण्याचे ठरवले. त्याअनुषंगाने भाषा आणि मातृभाषा यांच्याविषयी जाणून घेऊया...

भाषा ही मानवी जीवनातील अत्यंत आवश्यक बाब. कारण, माणूस हा समूहप्रिय प्राणी आहे. सर्वच व्यवहार करण्यासाठी माणूस भाषेचा वापर करतो. असा हा ‘भाषा’ शब्द ‘भाष्’ या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. भाष् म्हणजे बोलणे. पण, बोलणे म्हणजे केवळ वाणीने बोलणे एवढेच नाही. देह-हावभाव आणि वाणी याद्वारे आपण भाषिक संवाद साधू शकतो. आता भाषांचा उदय कधी झाला, हा प्रश्न जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच कशाकरिता झाला, हाही प्रश्नही महत्त्वाचा आहे. भाषा हा मानव-समाजाच्या अस्तित्वाचा, सांस्कृतिक जीवनाचा, सातत्याने विकसित होत असणारा मोलाचा गाभा आहे, हे नाकारता येणार नाही. किंबहुना, भाषेच्या अस्तित्वाखेरीज मनुष्य हा आदिम अवस्थेतच राहिला असता किंवा त्याला कोणतीही भौतिक प्रगती साध्य करता आली नसती, असेही म्हणता येऊ शकते.

भाषेचा उदय कसा झाला असावा व त्याच्या प्रगतीचे टप्पे काय असावेत, याबाबत सतराव्या शतकापासून अगदी आतापर्यंत भाषाविद चर्चा करु लागले होते. जगात आज सात हजारांहून अधिक भाषा आहेत. काही भाषा मृत झाल्या असून काही मृत होण्याच्या मार्गावर आहेत. ‘मृत’ म्हणजे नष्ट किंवा व्यवहारबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. जोवर एखादी भाषा बोलणारा मानवी समुदाय पूर्ण नष्ट होत नाही, तोवर अन्य भाषांचे कितीही आक्रमण झाले, तरी मूळ भाषेचा गाभा त्या भाषेचे अनुयायी जपून ठेवतात, हेही एक वास्तव आहे. भाषा ही मानवी मनाची मूलभूत गरज आहे, असे मत सिग्मंड फ्रॉईड याने स्पष्ट नोंदवून ठेवले आहे आणि त्यात अमान्य करण्यासारखे काही नाही.

आता भाषा कशी निर्माण झाली, तर भाषा देवांनी निर्माण केली व मानवाला शिकवली असे धर्मवादी पुरातन काळापासून सांगत आलेले आहेत. अगदी बायबल-जेनेसिसमध्ये जगातील पहिले संभाषण आदम आणि इव्हमध्ये झाले, असे मानले आहे. (११.१-९)भाषेच्या निर्मितीबाबत जगातील सर्वच देशांमध्ये काहीना काही मिथककथा आहेतच, त्यावरुन माणसाला स्वत:लाच आपल्यातील भाषाकौशल्याबद्दल अनावर कुतूहल व ती दैवी देणगीच असल्याचा ठाम विश्वास दिसून येतो.
 
भाषेचा उगम व विकास हा क्रमश: होत गेलेला असून भाषेचा उदय एकाएकी झाला, असे मानता येत नाही, असे ‘क्रमविकासवादी’चे समर्थक मानत होते. स्टिव्हन पिंकर हा या मताचा खंदा पुरस्कर्ता होता. त्याच्या मते, जसा मानवी प्राण्याचा क्रमविकास झाला, तशीच भाषाही क्रमश: विकसित होत गेली. या सिद्धांताशी सहमत पण विभिन्न मते असणार्‍यांपैकी एका गटाचे मत होते की, भाषेचा उगम हा इतरांशी संवाद साधण्याच्या गरजेतून निर्माण झालेला नसून आदिम स्व-अभिव्यक्तीच्या गरजेतून निर्माण होत विकसित होत गेली. असे असले तरी अभिव्यक्तीची अथवा संवादाची निकड मानवातच का, याचे समाधानकारक उत्तर या सिद्धांतांनी मिळत नाही, असे आक्षेपकांचे म्हणणे आहे.

अगदी या क्रमविकास सिद्धांतालाही छेद देणारा पुढचा सिद्धांत आला तो म्हणजे क्रमखंडवादी सिद्धांत. या सिद्धांतवाद्यांच्या मते, अन्य कोणत्याही प्राण्यांत न आढळणार्‍या एकमेवाद्वितीय अशा भाषानिर्मितीचे गुण मानवातच आढळत असल्याने ती बहुदा एकाएकी मानवी उत्क्रांतीच्या क्रमात कोणत्यातरी टप्प्यावर अचानकपणे अवतरली असावी, असे या सिद्धांतवाद्यांचे मत आहे.नोआम चोम्स्की हा क्रमखंडवादी सिद्धांताचा प्रमुख प्रसारक. परंतु, त्याच्या सिद्धांताला फारसे समर्थक लाभले नसले, तरी एक लक्ष वर्षांच्या मानवी क्रमविकासात अचानक, बहुदा अपघाताने, भाषिक गुणांचा अचानक विस्फोट होत भाषा अवतरली असावी, असे त्याचे मुख्य मत होते. या मतामागे प्रामुख्याने मानवी गुणसुत्रांत होणारे काही अचानक बदल त्याने गृहित धरले होते. मानवीशरीरातील, विशेषत: मेंदूतील जैवरसायनी बदलांमुळे भाषेचा उगम झाला, अशा या सिद्धांताचा साधरण अर्थ आहे.

अजून एक विचारप्रवाह आहे तो म्हणजे, भाषा हा मानवी मनातील मूलभूत गुणधर्म असून गुणसूत्रांनीच त्याची नैसर्गिक बांधणी मानवी मनात केली आहे व त्यामुळेच भाषांचा जन्म झाला आहे. हे मत फारसे मान्य केले गेले नाही. कारण, हा सिद्धांत नवीन काहीच संशोधित करत नव्हता.भाषेचा क्रमविकास हा कालौघात होत जातो, या मताशी आपण सर्वच सहमत असू. हा क्रमविकास मान्य करत असताना मुळात भाषाच का निर्माण होते, याचे उत्तर मिळत नाही. मग विविध अंदाज मांडलेले दिसतात- एकतर संवाद साधण्यासाठी तरी भाषेची निर्मिती होते अथवा अभिव्यक्त होण्यासाठी.
 
तसेच आपण सर्व जाणतो की, पृथ्वीतलावर पसरलेल्या सर्व मानवांना भाषा असली तरी त्यांत असे साम्य नाही. एका अर्थाने प्रत्येक भाषा प्रादेशिक आहे. म्हणजे भाषेचा क्रमविकासही प्रादेशिक आहे, असे म्हणता येईल. प्रादेशिक क्रमविकासात पुराऐतिहासिक कालात एखाद्या प्रदेशातील मानवी वस्त्या प्राकृतिक उत्पात, संसर्गजन्य आजार तसेच विनाशक लढायांमुळेही नष्ट झाल्या असण्याचे संकेत मिळतात. असे असेल तर अशा नष्ट होणार्‍या समुदायांच्या भाषेचे भवितव्य काय, हाही प्रश्न निर्माण होतो. माणसाबरोबर भाषाही नष्ट होते, असे नसून सांस्कृतिक अथवा जीवनशैलीतील बदलांमुळेही जुन्या संस्कृतीतील अनेक शब्द नष्ट तरी होतात अथवा त्यांनाच नवा अर्थ दिला जातो. उदाहरणार्थ, आपल्या जीवनातून बैलगाडी निघून गेली तर बैलगाडीशी निगडित शब्दही नष्ट होतात.

प्रादेशिक अनुषंगाने विचार करत असताना जागतिकीकरणामुळे आता एकभाषिक असा कोणताच देश राहिलेला नाही. त्यामुळे बहुभाषिकता स्वीकारताना भाषांची सरमिसळ झालेली दिसते. त्यातून आपल्याकडे ‘हिंग्लिश’, ‘मिंग्लिश’ अशा प्रकारच्या भाषा निर्माण होतात. यामध्ये भाषा जीवंत राहते, पण तिचे प्रवाह बदलतात.मातृभाषा या शब्दाविषयी जगभरात बहुतांश लोक संभ्रमातच आहेत. आपण ज्या परिसरात राहतो, वाढतो आणि कडोनिकडीच्या क्षणी ज्या भाषेत आपण उच्चार करतो ती खरी आपली मातृभाषा. आपण जिच्याआधारे वाढतो, जी आपल्याला पटकन समजते, घरातील सर्व व्यवहार ज्या भाषेत आपुलकीने होतात ती मातृभाषा. ‘मातृ’ या शब्दानेच जी आईप्रमाणे ममता, प्रेमळ वाटते, ती मातृभाषा होय. मातृभाषा हा शब्द इंग्रजीतील ‘मदरटंग’चे शब्दश: भाषांतर आहे. इंग्रजी राजवटीतील प्रबोधनयुगाचे मूळ वंगभूमीतच आहे.

भारतीयांनी इंग्रजी भाषाही आत्मसात करावी, हा विचार महत्त्वाचा होता. याच वेळी इंग्रजी ही ज्ञानभाषा असावी. परंतु, सर्वसामान्यांना त्यांच्याच भाषेत अर्वाचीन शिक्षण मिळावे, हा मुद्दा पुढे आला. तेव्हाच ‘मदरटंग’साठी ‘मातृभाषा’ हा प्रतिशब्द आला. मुळात हा शब्द बंगाली आहे आणि त्याचा अर्थही बंगालपुरताच मर्यादित होता. सर्वसामान्यांना मातृभाषेत अर्थात बंगालीत अर्वाचीन शिक्षण मिळावे, अशी तेव्हाच्या समाजसुधारकांची इच्छा होती. आधुनिक मदरशांची सुरुवातही बंगालमधूनच झाल्याचे मानले जाते.मातृभाषा या शब्दाचे प्राचीनत्व सांगताना ‘मातृभाषा, मातृसंस्कृती आणि मातृभूमी या तीन सुखदायिनी देवी आमच्या हृदयासनावर विराजमान होवोत’ या ऋग्वेदकालीन सुभाषिताचा दाखला दिला जातो. वेदात याचे मूळ शोधले असता ‘इला सरस्वती मही तिस्त्रो देवीर्मयोभुव:’ हे सूक्त सापडते. यामध्ये ‘मातृभाषा’ हा शब्द न वापरता ‘स्वभाषे’चा आदर करावा, असा उल्लेख आहे.

‘इला’ आणि ‘मही’ या शब्दांचा अनुवाद अनुक्रमे ‘संस्कृती’ आणि ‘मातृभूमी’ असा करण्यात आला असून ‘मातृभाषा’साठी मात्र ‘सरस्वती’ हा शब्द वापरण्यात आला आहे. मातृभाषेविषयीची वैश्विक भावना पाहता हे बरोबर असले, तरी मातृभाषेचे नाते स्थूलरूपात जन्मदात्या आईशी जोडण्याचा आग्रह धरणारे ‘सरस्वती’ या शब्दाचा अर्थ ‘मातृभाषा’ कसा काय होऊ शकतो, हे सिद्ध करू शकणार नाहीत. इथे ‘सरस्वती’ या शब्दाचा संबंध फक्त वाक्शक्ती अर्थात भाषेशी आहे. ‘मातृभाषा’तील ‘मातृ’ शब्दाचा संबंध आपल्या बालपणापासून कुटुंबासह परिसरात बोलल्या जाणार्‍या भाषेशी आहे. वैदिक काळात प्राकृतच संपर्कभाषा म्हणून प्रचलित होती. अर्थात, वेगवेगळ्या समूहांची मातृभाषाही प्राकृतच होती, हे उघड आहे.
 
आता राष्ट्रभाषा का मातृभाषा अधिक व्यापक ? तर तांत्रिकदृष्ट्या ‘राष्ट्रभाषा’ हाच शब्द व्यापक आहे. परंतु, इथेही आपला दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. मध्ययुगात युरोपमध्ये ‘लिंगुआ फ्रँका’ हा संपर्कभाषा अथवा सामान्य भाषा या अर्थाचा शब्द भलताच जोरात होता. मातृभाषा, राष्ट्रभाषा यांसारखी विशेषणे आपण कागदोपत्री वापरण्यासाठी राखून ठेवायला हवीत. मातृभाषा व्यक्तिसापेक्ष आहे. घटनासंमत तथ्य असल्याने राष्ट्रभाषा पसंती-नापसंतीच्या कक्षेत येत नाही. हिंदीच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करतानाच, इंग्रजी ही संपर्कभाषा म्हणून विकसित होत असल्याचे म्हटले जाते. पण, हिंदी हीच या देशाची नि:संशय ‘लिंगुआ फ्रँका’ अर्थात संपर्कभाषा आहे. मागील जनगणनेत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील जवळपास ६० हजार लोकांनी आपली मातृभाषा अरबी नोंदवली. हे सर्व लोक मदरसे चालणार्‍या अतिमागास भागातील असल्याचे कळले. या लोकांच्या आईची भाषा भोजपुरी अथवा अवधी असूनही त्यांनी मातृभाषा अरबी सांगितली होती.
 
जेव्हा आईची भाषा ही ‘मातृभाषा’ असे म्हटले जाते, तेव्हा अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. जसे की, मग सांस्कृतिक मिसळ झालेल्या मुलाची मातृभाषा कोणती? मूक मुलाची मातृभाषा कोणती? जन्मत:च आई नसणार्‍या मुलाची मातृभाषा कोणती? त्यामुळे ‘मातृभाषा’ या शब्दाचा संकुचित अर्थ न घेता तिला आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग, असे सन्मानाने मानले पाहिजे, तिचा व्यावहारिक उपयोग करून प्रवाही ठेवले पाहिजे.भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग होते. तसेच पश्चिम बांगलादेशमध्ये उर्दू आणि बंगाली लोकांचे प्रमाण लक्षणीय होते. पाकिस्तानने उर्दूला अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आणि भाषा धोरण लागू केले. या धोरणाच्या विरोधात ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. दि. २१ फेब्रुवारी, १९५२ रोजी या विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. त्यात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या हिंसाचाराच्या स्मरणार्थ जगभराता बहुभाषिकांमध्ये शांतता राहावी, सर्व भाषांचे संरक्षण व्हावे, सर्वांना सन्मान मिळावा, यासाठी ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ साजरा करण्यात येतो. सर्वच भाषांचा आदर करताना आपल्या ‘सरस्वती’ म्हणजेच मातृभाषेचाही काकणभर अधिक आदर करूया, हेच या दिनाचे फलित ठरेल.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत ८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.