नाशिकमध्ये साकारतेय शिवरायांचे आरमार!

शिवजयंतीनिमित्त दुर्गाडी किल्ल्यासह शस्त्रागारांचा उलगडणार इतिहास

    18-Feb-2023
Total Views |
armor-is-being-made-on-occasion-of-shivaji-maharaj-birth-anniversary-nashik

नाशिक
: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त हिरावाडीतील कमलनगर चौक येथे शिवकालीन आरमाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत आहे. याठिकाणी साकारलेल्या जहाजातअंतर्गत शस्त्रागारदेखील शिवप्रेमींना पाहायला मिळणार असल्याचे स्वागताध्यक्ष दिगंबर मोगरे यांनी सांगितले.

हिरावाडी येथे गेल्या दोन वर्षांपासून पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रेरणेने, माजी नगरसेवक अजय बोरस्ते व पूनम मोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजन्मोत्सव यात्रेचे आयोजन केले जाते. यंदाच्या देखाव्याचे विशेष म्हणजे, राज्य सरकार भिवंडी येथे या आरमाराचे संग्रहालय साकारणार आहे. हे संग्रहालय उभारण्याआधीच या आरमाराचा देखावा नाशिककरांना पाहायला मिळणार आहे. भिवंडी येथील दुर्गाडी किल्ला परिसरात 1657 साली स्वराज्याचे प्रथम आरमार उभारले. याठिकाणी सागवान जातीची झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने, शिवाजी महाराजांनी जहाज बांधणीसाठी या किल्ल्याची निवड केली होती. हा सर्व इतिहास आजच्या पिढीला समजावा या हेतूने हा देखावा राजा (भैय्या) पिरजादेे यांच्या संकल्पनेतून याठिकाणी साकारला जात असल्याचे दिगंबर मोगरे यांनी सांगितले.
 
देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथे येणार्‍या प्रत्येक शिवप्रेमींना हा देखावा पायी फिरून जवळून बघायला मिळणार आहे. प्रथम तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे दर्शन झाल्यानंतर जहाजावर जाता येणार आहे. याठिकाणी संबंधित इतिहासाची सविस्तर लिखित माहिती प्रदर्शित केली जाणार असल्याचे यावेळी दिगंबर मोगरे यांनी सांगितले.

शनिवारी महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी भगवान शंकर यांची लग्न वरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात नंदी, गण यांसह इतर देवदेवतांचा जीवंतपणा यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. भगवान शंकराची बर्फाची शिवपिंड उभारण्यात जाणार आहे.आरमार देखावा यासह याठिकाणी 14 फूट उंच अश्वारूढ शिवाजी महाराज यांचा पुतळा याठिकाणी उभारण्यात येणार आहे. येथील स्व. दत्ताजी मोगरे क्रीडा संकुलात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
3 महिन्यांपासून देखाव्याची तयारी

पारंपरिक किल्ला देखावा व शिवजयंती साजरी न करता आगळावेगळा देखावा याठिकाणी साकारण्यात येत आहे. हा देखावा उभारणीचे काम मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे. भिवंडी येथील 50 कारागीर यासाठी मेहनत घेत आहेत. देखावा शिवजयंती नंतरचे पाच ते सहा दिवस सर्व शिवप्रेमींना पाहायला मिळणार आहे.- दिगंबर मोगरे, स्वागताध्यक्ष, शिवजन्मोत्सव समिती