नवी दिल्ली : ब्रिटीश ब्रॉडकास्ट कॉर्पोरेशनने (बीबीसी) बनविलेल्या मोदीविरोधी माहितीपटामध्ये खोटी माहिती दाखविण्यात आली असून त्यामागे विशिष्ट प्रपोगंडा आहे, असा घरचा आहेर ब्रिटनच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी दिला आहे.
बीबीसीने गुजरात दंगलप्रकरणी खोट्या माहितीवर आधारित बनविलेल्या माहितीपटावरून बीबीसीला जगभरातून टिकेचा सामना करावा लागत आहे. ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांनीदेखील या माहितीपटाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे ब्रिटनमधील विविध क्षेत्रातील लोकांनीदेखील बीबीसीच्या माहितीपटावर टिका केली आहे.
ब्रिटनच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनीदेखील बीबीसीच्या माहितीपटास प्रपोगंडाचे साधन संबोधले आहे. ते म्हणाले, बीबीसीच्या माहितीपटातील तथ्ये पूर्णपणे अतिशयोक्तीपूर्ण आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 2002 च्या दंगलींबाबत नरेंद्र मोदींविरुद्धच्या दाव्यांचे परीक्षण केले आणि त्यांचा संबंध नसल्याचे सांगितले आहे. हा माहितीपट बीबीसीच्या देखरेखीखाली तयार करण्यात आल्याचे दिसते. हा माहितीपट आपण बघितला असून तो अतिशय संतापजनक आहे. ब्रिटीश सरकार भारताला एक मजबूत मित्र, सहयोगी मानते आणि दोन्ही देश व्यापार करारावर बोलणी करत आहेत. त्यामुळे भारत – ब्रिटन संबंधांवर परिणाम व्हावा, म्हणून असा प्रकार घडविण्यात आल्याची शंकादेखील ब्लॅकमॅन यांनी व्यक्त केली आहे.
भाजप आणि कॉन्झर्वेटिव्ह पक्ष एकमेकांचे सहकारी असल्याचे ब्लॅकमॅन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ब्रिटनमध्ये जसा कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष आहे, तसाच भारतात भाजप आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्याचे अद्भुत काम केले आहे. भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि जगातील आघाडीची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्याच्या अर्थव्यवस्थेला आर्थिक शक्तीकेंद्र बनवले आणि आता ते पंतप्रधान म्हणून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.