माझा अभिमन्यू करण्याचा ‘त्यांचा’ प्रयत्न होता

पहाटेचा शपथविधीवर फडणवीस यांचे विधान

    16-Feb-2023
Total Views |
 
Devendra Fadnavis
 
पुणे : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यात बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटाबाबत देखील विधान केले.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी एवढेच सांगेन की, मी बोललो ते सत्य बोललो त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही काढले. शांत ऐका त्याची कडी तुम्हाला जोडता येईल. दुसर्‍या पुराव्याची गरज पडणार नाही. मी अर्ध बोललो आहे, उरलेले वेळ आल्यावर बोलेन.”
“तेव्हा मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून प्रयत्न झाले. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला असून तो चक्रव्यूह कसा तोडायचा, हे आम्ही केले आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सरकार स्थापन केले आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात गिरीश बापट यांचीदेखील भेट घेतली.
 
‘शरद पवारांच्या राजकारणात गद्दारी’
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. “शरद पवारांचे राजकारण गद्दारीशिवाय आणि पाठीत खंजीर खुपसल्याशिवाय पूर्ण होत नाही,” अशी टीका पडळकर यांनी केली. ते धुळे येथे कोळी समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पवारांवर हल्लाबोल केला.
 
देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “शरद पवारांचा चेहरा आधीच गद्दारीने काळवंडला होता. आता फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर ते निरुत्तरित आहेत. ते या विषयात काहीच बोलू शकत नाहीत, असेही पडळकर म्हणाले.
 
‘शरद पवारांच्या संमतीशिवाय पहाटेचा शपथविधी अशक्यच’
 
अजित पवारांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एकत्र येत 23 नोव्हेंबर 2019 च्या पहाटे घेतलेला शपथविधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या संमतीशिवाय होणे शक्यच नाही, असा दावा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
 
राष्ट्रवादीने आता कितीही नाकारले तरी हा शपथविधी पवार साहेबांच्या संमतीशिवाय होणे शक्यच नव्हते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात केलेला दावा योग्यच असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.