1 ट्रिलियन ‘इकोनॉमी’साठी राज्य सरकार सज्ज

    14-Feb-2023
Total Views |
 
1 trillion economy
 
मुंबई : ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमधून देश जागतिक पातळीवर आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. देशाने जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान जागतिक पातळीवर मजबूत केले आहे. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी महाराष्ट्रदेखील आपले योगदान देण्यासाठी सज्ज होत असून महाराष्ट्राची इकोनॉमी एक ट्रिलियन करण्याच्या दृष्टीने सरकार सज्ज आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. राज्य सरकारच्या आर्थिक सल्लागार समितीची पहिली बैठक सोमवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी झाली त्यानंतर ’सह्याद्री’ या शासकीय अतिथीगृहावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
 
यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘टाटा सन्स’चे प्रमुख आणि आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्यासह सल्लागार समितीतील 18 सदस्य उपस्थित होते.
 
सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या सूचना आणि सुधारणांचे सरकारकडून स्वागत करण्यात आले असून राज्याचा समतोल आणि सर्वांगीण विकास कशाप्रकारे साधता येईल यावर मंथन करण्यात आले. राज्याची वाटचाल कशी सुधारता येईल तसेच जनतेचे दरडोई उत्पन्न कशाप्रकारे वाढवता येईल, जेणेकरून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक सुबकता पोहचू शकेल यासाठी सरकारच्या वतीने योग्य ती पाऊले उचलण्यात येतील,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिली.