प्राचीन वैभवाला नवसंजीवनी

    13-Feb-2023   
Total Views |
Hindu Temple in Goa

गोव्यामधील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार प्राचीन, ऐतिहासिक वैभवाला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्नरत आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातही भरीव तरतूद करण्यात आली होती. सावंत सरकार पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या प्राचीन मंदिरांचे सर्वेक्षण व तपासणी करत असून त्यानंतर मंदिरांचा जीर्णोद्धार केला जात आहे. अशाच एका ३५० वर्षं जुन्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर सावंत सरकारने नुकतेच पुनर्बांधणी केलेल्या या मंदिराचे उद्घाटन करून ते लोकांसाठी खुले केले. मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आ. शिवेंद्रराजे भोसले हेही उपस्थित होते. मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ मध्येच सुरू करण्यात आला होता. यानंतर तत्कालीन पुरातत्वमंत्री विजय सरदेसाई यांनी जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागाकडे सोपवले होते. ऐतिहासिक श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही गोवा सरकारचे अभिनंदन केले असून यामुळे तरुणाईचा अध्यात्मिक परंपरांशी संबंध दृढ होईल आणि राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असे ते म्हणाले. पणजीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या नरवे गावात बांधलेले हे भगवान शिवाचे सप्तकोटेश्वर मंदिर १२व्या शतकात कदंब वंशाच्या राजाने त्याच्या शिवभक्त पत्नीसाठी बांधले होते. या मंदिरावर आतापर्यंत अनेकदा हल्ले झाले, तोडफोड झाली. पहिला हल्ला इस्लामिक आक्रमक अलाउद्दीन हसन गंगू याने १३५२ साली केला. यावेळी सप्तकोटेश्वर मंदिरासह अनेक हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली. यानंतर १३६७ मध्ये, विजयनगरचा राजा हरिहररायाने गोव्यात हसन गंगूचा पराभव करत सप्तकोटेश्वर मंदिरासह इतर अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. माधव मंत्री यांनी हे मंदिर १४व्या शतकाच्या उत्तरार्धात पुन्हा बांधले. १५६० मध्ये या मंदिरावर पोर्तुगीजांनी हल्ला करत शिवलिंग विहिरीत फेकून मंदिराचे प्रचंड नुकसान केले. तसेच, या मंदिराच्या ठिकाणी ख्रिश्चनांचे प्रार्थनास्थळही बांधले होते. मात्र, त्यानंतर हिंदूंनी शिवलिंग बिचोलीमला नेले. जिथे नवीन मंदिरात त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर १६६८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केला. हिंदू आणि हिंदू अस्मितेवर हल्ला झाल्यानंतर विलुप्त झालेल्या ऐतिहासिक ठेव्यांना पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याच्या या प्रयत्नांसाठी गोवा सरकार अभिनंदनास पात्र आहे.

काँग्रेसचा फुगा फुटणार?


पुण्यात सध्या विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी महायुती आणि महाविकास आघाडी आमनेसामने आहेत. सर्वप्रथम भाजपने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले खरे, परंतु, त्याला यश मिळाले नाही. अखेर कसबा मतदारसंघातून भाजपच्या हेमंत रासने यांच्याविरोधात काँग्रेसने मविआतर्फे रवींद्र धंगेकर यांना तिकीट दिले. धंगेकरांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यात भलताच प्रकार पाहायला मिळाला. या मेळाव्यादरम्यान महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो शेकडो फुग्यांना लावून तो हवेत उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काळ्या रंगाचे हे फुगे निषेध नोंदविण्यासाठी उडवण्याचा विचार आयोजकांचा होता. परंतु, पोलिसांनी वेळीच हा प्रकार हाणून पाडला. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसह महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी फुगे उडवण्यास अजित पवारांनी हात जोडून नकार दिला. परंतु, एरव्ही या ना त्या कारणावरून कार्यकर्त्यांना खडेबोल आणि अनमोल ज्ञान पाजळणार्‍या अजितदादांनी यावेळी त्या व्यक्तीला झापले नाही. पटोलेंवर सध्या पक्षांतर्गतच शुक्लकाष्ठ सुरू असल्याने त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणेही चुकीचेच म्हणा. कारण, मतांच्या गणितात उगाच बिघाड नको. मुळात राज्यपालांविषयी काही मतभेद असतील किंवा त्यांचे सगळेच मुद्दे मान्य असावेत असेही नाही. परंतु, व्यक्तीपेक्षा राज्यपाल या पदाला मान आहे. त्यामुळे असा जाहीररित्या राज्यपाल या पदाचा अपमान करतानाही मविआने दहावेळा विचार करायला हवा होता. कोणत्या गोष्टीचा वापर कोणत्या ठिकाणी करायला हवा, याचा नव्याने धडा देण्याची गरज आता वाटू लागली आहे. एक ज्येष्ठ विधानसभा सदस्य म्हणून अजित पवार, नाना पटोले यांनी असे कृत्य करणार्‍या आणि अशी योजना आखणार्‍या पदाधिकार्‍यांना जागेवरच खडसावणे आवश्यक होते. अशा प्रकारांना खुली मुभा दिली, तर यापुढे प्रत्येक नेत्याचे असे फुगे आकाशात सोडण्याचा धडाका सुरू होईल. आधी शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा प्रवास करणार्‍या धंगेकरांनी तरी यातून धडा घेतला तरी खूप झाले. एकूणच फुगा उडवण्याच्या नादात काँग्रेसचाच फुगा फुटू नये म्हणजे झालं!




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.