राम मंदिर शेजारील कब्रस्तान निर्मितीला हिंदूंचा कडाडून विरोध
आरे कॉलनीत एकवटला सकल हिंदू समाज
13-Feb-2023
Total Views |
मुंबई : ‘कब्रस्तान हटाओ, आरे कॉलनी बचाओ’, ‘नही बनेगा, नही बनेगा, मंदिर के बाजुमे कब्रस्तान नही बनेगा,’ अशा गगनभेदी घोषणांनी रविवारी, दि. 12 फेब्रुवारी आरे कॉलनीतील राम मंदिर परिसर दुमदुमला होता. सकल हिंदू समाजाच्यावतीने आयोजित हिंदू जनआक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने हिंदू बांधवांची उपस्थिती होती.
आरे कॉलनीतील श्रीराम मंदिर शेजारी प्रस्तावित मुस्लीम कब्रस्तानाला विरोध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने आरे कॉलनीत काढण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने हिंदूंनी सहभाग नोंदवला होता.
प्रस्तावित कब्रस्तानला विरोध करण्यासाठी काढण्यात आलेल्या या हिंदू जनआक्रोश मोर्चात सर्व उत्सव मंडळे, समित्या तसेच नागरिकांच्या आणि हिंदूंच्या हितासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
दरम्यान, या आधीही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ तसेच दररोजच्या कर्णकर्कश भोंग्यांच्या आवाजाने त्रासलेल्या मुंबईकरांनी या मोर्चात सहभागी होत आपला विरोध दर्शविला.
आरे कॉलनीत काढण्यात आलेल्या हा मोर्चा हा आरे कॉलनीतील पुरातन मंदिरांपैकी एक असलेल्या श्रीराम मंदिराच्या शेजारी होत असलेल्या मुस्लीम कब्रस्तानाला विरोध करण्यासाठी काढण्यात आला होता. नियमांचे चोख पालन करत शांततेत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन सकल हिंदू समाज, मुंबईद्वारे करण्यात आले होते.