मोदी अंकल ऐकताय ना?

माझा ‘मेकओव्हर’ मी असा केला की, माझ्या केशरचनेची-दाढीची चर्चा लोक करतात. लोक म्हणतात की, इतकी मोठी यात्रा करून फक्त दाढीच वाढली? आहे की नाही माझ्या दाढीची चर्चा? आहेच मी तितका लोकप्रिय. मोदी अंकल ऐकताय ना?

    11-Feb-2023   
Total Views |

Rahul Gandhi



मम्मी ‘अदानी’वरून मी काय काय बोललो. ते शत्रुघ्न अंकल, अगं ते ‘थप्पड से डर नही लगता’ म्हणणार्‍या सोनाक्षीचे पप्पा, ते पण म्हणाले की, मी मोदी अंकलपेक्षा पण चांगले भाषण केले. ते रंजन अंकल, तर म्हणाले की, मीच त्यांना ‘पप्पू’ बनवले. ‘भारत जोडो’ यात्रा करून मला सगळं कळायला लागलं मम्मा.


हो मला आपले सगळे लोक पण मागे म्हणाले की, मी रामासारखी यात्रा करतो म्हणून. पण, लोकांना काही कळतच नाही. मी इतकं बोललो, इतकी यात्रा केली तरी लोक मोदी अंकलचं बरोबर बोलले म्हणतात. खर सांगू मला तर लोकांचं कौतुकच वाटत मॉम. मोदी काय बोलतात ते लोकांना कसं कळतं? मोदींना ‘अदानी’वरून उगीचच काहीकाही बोलायचे असं ठरवलं होतं, तसं मी बोललो. लोक घाबरली आहेत. देशात सेक्युलॅरिझम नाही, देश भांडवलदार चालवतात, हेचं बोलायचं हे आपलं ठरलेलं आहे. त्यामुळे मी सगळीकडे हेच बोलतो.



हं महागाई वाढली, बेकारी वाढली पण बोलायचे असते, ते पण बोललो. त्यानंतर मोदी अंकल एक तासांच्या वर बोलले. ते कठीण कठीण शब्द वापरत होते. मला कसं कळणार? मी त्यांच्या शब्दाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, तर लगेच त्यांचे दुसरे वाक्य ते बोलायचे. मी पहिले वाक्य सोडून दुसर्‍या वाक्याचा विचार करायचो, तर ते लगेच तिसरे वाक्य बोलायचे. असं कधी कुणी करत का मॉम? आपण इतकी वर्षं देशावर राज्य केलं. माझं आडनाव पण गांधी आहे, याचा बिलकूल त्यांनी विचार केला नाही, मॉम. पण, माझी आणि जनतेची नाळ किती जुळली आहे.



मला मोदी अंकल काय म्हणतात हे कळत नव्हते, हे सगळ्या भारतीयांना कळले, ते पण मी न सांगता? तुला विश्वास वाटत नसेल, तर फेसबुक बघ, इन्सटा बघ, ट्विटर बघ. सगळे जण काल म्हणत होते की, मोदी अंकल काय म्हणाले ते माझ्या डोक्यावरून गेले. मला काही कळलं नाही. हो, आणखी एक गुड न्यूज मॉम. मोदी अंकल त्यांच्या वाईट दाढीबद्दल ’फेमस’ होते. ते महाराष्ट्रात आपलं सरकार घालवून आलेले शिंदे पण त्यांच्या दाढीमुळे ‘फेमस’ आहेत. या दोघांनाही म्हणावं आता माझ्याकडे बघा. माझा ‘मेकओव्हर’ मी असा केला की, माझ्या केशरचनेची-दाढीची चर्चा लोक करतात. लोक म्हणतात की, इतकी मोठी यात्रा करून फक्त दाढीच वाढली? आहे की नाही माझ्या दाढीची चर्चा? आहेच मी तितका लोकप्रिय. मोदी अंकल ऐकताय ना?




दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ


मागे काय तर मुंबई मेट्रो, आता काय तर ‘वंदे भारत’ ट्रेन. ही सगळी कामं करून यांना महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की, हेच लोक काम करतात. आम्ही तर काय काम केलेच नाही, हेचं यांना दाखवायचं आहे. या विचारांनी साहेब स्वतःच दचकले. ‘ऑ’ काय आपण काही काम केले नाही?


सवईने त्यांनी आदेश सोडला - कोण आहे रे तिकडे? सांगा यांना आम्ही काय काम केले ते? साहेबांचा उजवा हात मानले गेलेले नेते आपल्या भुवयांच्या अप्रतिम हालचाली करत म्हणाले, “सगळ्या जगाला माहिती आहे आपण काय केले ते?” साहेब स्तुतीने खूश होत म्हणाले , “हं सांगा सांगा काय केले ते?” उजवा हात असलेले नेते विचारात पडले. आता आली का पंचाईत? काय सांगावं बरं, काय काम केले ते? सत्ता काळात तर सगळ्या विकासकामांना तर स्थगिती दिली होती.


मुंबईत तर शाळा म्हणू नका, मंदिर म्हणू नको, मुंबईची लाईफलाईन रेल्वे म्हणू नका, सगळं बंद होते. लोक कोरोनापेक्षा इतर कारणांनीच बेजार झाले होते. सांगायला तर हवेच. मग उजवा हात असलेला नेता म्हणतो, “साहेब, जागतिक आरोग्य संघटनेच्या लोकांना तुम्ही ‘कोविड’चे ज्ञान देण्याची क्षमता ठेवली होती. तुमची ताकद इतकी मोठी की, महाराष्ट्रात हाहाकर उडाला असताना, तुम्ही फेसबुक लाईव्ह केले.
 






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.