मुंबई : कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात वार्तांकन करणारे पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. वारिसे यांच्या मृत्यूची चौकशीची मागणी होत असतानाच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एसआयटी अर्थात विशेष चौकशी पथकाची स्थापना करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणाची सरकारकडून गंभीर नोंद घेण्यात आली आहे. या प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई करण्यासाठी आणि वारिसेंना न्याय देण्यासाठी सरकारकडून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या एसआयटीमध्ये वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली सदरील प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत. गृहमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशामुळे विरोधकांच्या आरोपांमधील हवाच निघाली असून लवकरच या प्रकरणातील तथ्य बाहेर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.