कसबापेठेत थेट, चिंचवडमध्ये तिरंगी लढत

पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट

    11-Feb-2023
Total Views |
maharashtra-pune-bypoll-election


पुणे
: महिनाअखेरीस होऊ घातलेल्या चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभेच्या पोट निवडणुकीत शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट झाले.कसबा पेठेत थेट काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांत थेट लढत होणार आहे आणि चिंचवडमध्ये मात्र अपक्ष राहुल कलाटे यांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे तिरंगी लढत होत आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि अपक्ष अशी लढत होईल.

कसबा पेठेत उबाठा गटाचे मित्रपक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होत आहे. धंगेकर हे मनसेकडून २००९ ची निवडणूक या मतदार संघातून लढले आहेत.

काँग्रेसने ४० वर्षांपासून काँग्रेसमध्ये असलेले बाळासाहेब दाभेकर यांना डावलून त्यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते व मतदारात नाराजी आहे. येथे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दुसरीकडे चिंचवडमधून सांगूनही माघार न घेतलेले कलाटे २०१४ मध्ये शिवसेनेकडून लढले होते, तर २०१९ मध्ये ते अपक्ष लढले होते, लोकांची आपणांस साथ असल्याचे सांगणारे राहुल कलाटे यांनी मविआचे ‘टेन्शन’ वाढविले आहे, येथे तिरंगी लढतीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना काटे यांना डोकेदुखी ठरतील, असे राजकीय जाणकार सांगतात.

विशेष म्हणजे, त्यांनी उद्धव ठाकरे, अजित पवार, सचिन अहिर यांनी ‘माघार घ्या’ असे सांगून देखील ऐकले नाही. येथे भाजपच्या अश्विनी जगताप यांच्यासाठी ही लढत काटे-कलाटे यांच्यामुळे आणखी सोपी झाली असेही राजकीय विश्लेषकांना वाटते.