न्यायमूर्तींच्या दृष्टिकोनातून साहित्य...

    01-Feb-2023   
Total Views |
Narendra Chapalgaonkar

उद्या दि. ३ फेब्रुवारीपासून ते दि. ५ फेब्रुवारीपर्यंत वर्ध्याच्या स्वावलंबी शाळेच्या पटांगणात ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संपन्न होईल. यंदा साहित्य संमेलनाला न्या. नरेंद्र चपळगावकर हे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. तेव्हा, साहित्य संमेलनाचे औचित्य साधून साहित्यनिर्मिती आणि एकूणच साहित्य क्षेत्राबाबत न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्याशी केलेली ही खास बातचित..

न्या. नरेंद्र चपळगावकर यांचा अल्प परिचय
नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. वैचारिक लेखन करणारे लेखक म्हणून त्यांना साहित्य विश्वात मान्यता मिळाली. ’साहित्य आणि स्वातंत्र्य’ या त्यांनी २०२२ साली प्रकाशित पुस्तकातून त्यांनी मराठी साहित्य आणि गेल्या काही दशकांतील साहित्याचा प्रवास याविषयी टिप्पणी केली. न्यायाधीश होण्यापूर्वी ते १९६१-६२ मध्ये लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते. २३ ऑक्टोबरपासून ते ‘गरवारे पॉलिएस्टर लिमिटेड’चे स्वतंत्र अकार्यकारी संचालक आहेत.चपळगावकर यांनी १९६२ ते १९७८ या काळात बीडमध्ये वकिली केली. त्यानंतर १९७९ ते १९८१ दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली आणि १९८१ पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे न्यायाधीश म्हणून काम केले. मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची दि. १९ जानेवारी, १९९० मध्ये नियुक्ती झाली. दि. १० एप्रिल, १९९९ रोजी ते सेवानिवृत्त झाले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखांच्या आसपासच साधारण विद्रोही साहित्य संमेलन, मुस्लीम साहित्य संमेलन अशी एक वेगळी चूल मांडलेली दिसते. तेव्हा, त्याविषयी आपण काय सांगाल?

अशाप्रकारे वेगवेगळी साहित्य संमेलने भरणे यात चुकीचे असे काहीच नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ आपल्याला अपुरे पडते आहे आणि आपण वेगळे संमेलन आयोजित करावे, असे कुणाला वाटणे अजिबात अयोग्य नाही. अशा वेगवेगळ्या गटांच्या किंवा प्रादेशिक विभागांच्या संमेलनात जर मराठी साहित्याच्या आजच्या स्वरूपाबद्दल गंभीर चर्चा झाली, तर त्यामुळे निश्चितच साहित्य चर्चेला मदतच होईल. यानिमित्ताने अनेक लेखकांनाही आपले म्हणणे मांडता येईल. यादृष्टीने अगदी जिल्हा पातळीवरची संमेलनेसुद्धा उपयुक्त होऊ शकतील. त्याचे कार्यक्रम ठरवताना मात्र ते वाचकांना आणि श्रोत्यांना त्यांची वाङ्मयाभिरुची वाढवणारे असावेत, याचा मात्र विचार केला पाहिजे.


विविध संस्कृतींतून आलेली विविध विचारसरणीच्या लेखकांची अनेक विषयांवरील पुस्तके प्रकाशित होत असतात. अशावेळी पुरस्कारासाठी एखादे पुस्तक निवडताना/त्यासाठीचे निकष ठरवताना आपण लेखकाच्या लेखन स्वातंत्र्याला न्याय देतो, असे आपल्याला वाटते का?

पुरस्कारासाठी पुस्तकांची अगर लेखकांची निवड कशी केली जावी, हे त्या त्या पुरस्काराचे प्रवर्तक ठरवतात. कधी कधी सोयीनुसार निकषही बदलतात. पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी आम्ही नेमलेल्या समित्यांच्या शिफारशी आमच्यावर बंधनकारक नाहीत, अशी सरकारची भूमिका आहे. तज्ज्ञांचा सल्ला हस्तक्षेप न करता मानणे ही सरकारसाठी योग्य गोष्ट असते, पण तसे नेहमीच घडत नाही. अशा पुरस्कारासाठी आपण ग्रंथ पाठवायचे की नाही, याबद्दल आपण निर्णय घ्यावयाचा असतो. निवडीची प्रक्रिया जेवढी निर्दोष, निःपक्षपाती आणि वाङ्मयबाह्य विचारांपासून मुक्त असेल, तेवढी निवडसुद्धा चांगली होते व पुरस्काराचे महत्त्वही वाढते. लेखनाची गुणवत्ता डावलून आपली वैयक्तिक किंवा राजकीय आवडनिवड लादली गेली म्हणजे पुरस्काराचे महत्त्व राहतच नाही.



Narendra Chapalgaonkar

न्या. चपळगावकर यांची साहित्यसंपदा
‘अनंत भालेराव: काळ आणि कर्तृत्व’, ‘आठवणीतले दिवस’, ‘कर्मयोगी संन्यासी’ (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र) ‘कायदा आणि माणूस’, ‘कहाणी हैदराबाद लढ्याची’, ‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’, ‘तुमच्या माझ्या मनातलं’ (ललित), ‘त्यांना समजून घेताना’ (ललित), ‘दीपमाळ’ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा), ‘नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज’, ‘नामदार गोखल्यांचं शहाणपण’, ‘न्यायमूर्ती केशवराव कोरटकर’, ‘न्यायाच्या गोष्टी’ (न्यायविषयक कथा), ‘मनातली माणसं’(व्यक्तिचित्रणे), ‘महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना’, ‘राज्यघटनेचे अर्धशतक’, ‘विधिमंडळे आणि न्यायसंस्था: संघर्षाचे सहजीवन’, ‘संघर्ष आणि शहाणपण’, ‘समाज आणि संस्कृती’, ‘संस्थानी माणसं’ (व्यक्तिचित्रणे), ‘सावलीचा शोध’ (सामाजिक), ‘हरलेले स्नेहबंध’

आजकाल ललित गद्य संस्कृतीत वैचारिक वाङ्मय तेवढेसे निर्माण होत नाही, असे एकंदर दर दिवशी प्रकाशित होणार्‍या पुस्तकांतून दिसते. त्याविषयी आपण काय सांगाल?

आज वैचारिक वाङ्मय इतके कमी प्रसिद्ध का होत आहे, याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. यानिमित्ताने इथे एकच गोष्ट सांगता येईल, ती म्हणजे समाजाचे ऐक्य आणि समाजातली उदारता आणि सहिष्णुता जेवढी अधिक असेल, तेवढे जास्त वैचारिक साहित्य लिहिले जाईल.

इतिहासाचे साहित्यात रूपांतर करताना काही प्रमाणात लेखकाचं अंतरंग लेखनात उतरतं. याला आपण ‘इतिहासाची मोडतोड’ म्हणू शकतो का? आणि अशाप्रकारे ऐतिहासिक विषयांवर साहित्यनिर्मिती करताना लेखकाने नेमकी काय काळजी घ्यायला हवी?

इतिहासाकडे तटस्थदृष्टीने पाहण्याची दृष्टी आपल्याकडे अजून पक्की झालेली नाही. इतिहास हा घडून गेलेला असतो. तो कसा घडला पाहिजे होता, हे आपल्याला आता ठरवता येत नाही. इतिहासात सगळेच चांगलेच घडलेले नसते. काही आपल्याला न आवडणारेही घडलेले असते, पण ते बदलून नवेच निर्माण करता येत नसते.


आजची तरुणाई पुस्तकं लिहिण्यापेक्षा समाजमाध्यमांवरूनच अभिव्यक्त होताना दिसते. अशा या चार ओळींच्या पोस्ट्स, कॅप्शन्स किंवा ऑडिओ व्हिज्युअल साहित्य आगामी काळात साहित्य संमेलनात अंतर्भूत करण्यायोग्य ठरु शकते का?

आज समाजमाध्यमांवरून कधी कधी अतिशय चांगले लेखनही वाचावयास मिळते. समाजमाध्यमांचे आजचे स्वरूप दोन व्यक्तींमधील खासगी संवादासारखे आहे. वाङ्मय हे सर्व वाचकांसाठी खुले म्हणून जन्माला येते. जेव्हा हे स्वरूप बदलून लेखक विस्तृतपणे आपले लेखन या माध्यमाचा उपयोग करून करतील आणि ते केवळ निंदा-स्तुतीचे साधन राहणार नाही, तेव्हा हे माध्यमसुद्धा वाङ्मयाचे एक व्यासपीठ होईल. त्याला अर्थातच अजून बराच काळ लागेल.


एक लेखक म्हणून आणि साहित्याचे वाचक म्हणून तुम्हाला कोणत्या प्रकारचे लेखन/साहित्य अधिक भावते? साहित्यातली तुमची अभिरुची काय?

मला माणसे समजून घेण्यात रस आहे, त्यामुळे मी काही जवळची आणि पाहिलेली, तर काही अर्वाचीन इतिहासातून अभ्यासलेली माणसे मला भावली. त्यांची मी व्यक्तिचित्रे लिहिली. हे लेखन करताना ही माणसे मला पुन्हा एकदा समजून घेता आली. मला ललित लेखन आवडते. या लेखनात लिहिणारा अधिक स्पष्टपणे व्यक्त होतो, त्याची बहुश्रुतता, सांस्कृतिक आकलन, त्याच्या अंगाचे गुणदोष हे सगळे ललित लेखनात प्रगट होतात. इरावती कर्वेंपासून शांताबाई शेळक्यांपर्यंत अनेकांचे ललित लेखन मला आवडते.


आजच्या तरुणपिढीला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तुम्ही काय आवाहन कराल?

तरुणांनी अधिकाधिक वाचावे, स्वतः वाचून मत बनवावे, दुसर्‍याच्या तयार मतावर विसंबून राहू नये. अधिक वाचनाने आपण अधिक सुसंस्कृतच नव्हे, तर समृद्ध बनतो, हे त्यांनी स्मरणात ठेवावे एवढेच मला वाटते.


Narendra Chapalgaonkar


न्या. चपळगावकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चा ‘दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ (२०२२)
- पुण्यात २१-२२ जानेवारी, २०१२ रोजी झालेल्या १३व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- २००३ मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या माजलगाव शाखेने मसापच्या विभागीय मराठवाडा साहित्य संमेलनाच्या (शिवार साहित्य संमेलनाचे) आयोजन केले होते. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
- २६वे मराठवाडा साहित्य संमेलन २००४ साली माजलगाव येथे नवविकास मंडळ शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आले. या संमेलनाचेही अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर होते.
- ’तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’ या पुस्तकासाठी ‘भैरुरतन दमाणी पुरस्कार’ (२०११)
- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान (२०१८)
- संभाजीनगर येथे १३-१४ मार्च २०१४ या तारखांना झालेल्या नवव्या जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.