काशी हे भारतातील अत्यंत प्राचीन शहरांपैकी एक शहर. ज्ञानाची नगरी म्हणूनही काशीची ओळख. काशीचा इतिहास म्हणजे हिंदू धर्माचाच इतिहास, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आर्यांच्या संस्कृतीचे, विद्यांचे आणि तत्त्वज्ञानाचे माहेरघर म्हणून या शहराची ख्याती असून, अद्याप ती थोड्या फार फरकाने तशीच कायम आहे. वैदिक धर्म आणि बौद्ध धर्म या ठिकाणाहून सर्व भरतखंडात विस्तार पावले आणि सर्व भारतात हे शहर अत्यंत पवित्र असे यात्रेचे ठिकाण मानले गेले. नुकतेच या काशी शहरात सलग दुसर्यांदा भेट देण्याचा योग आला. त्या अंतर्बाह्य अनुभवसंपन्न करणार्या काशीयात्रेचे हे शब्दचित्रण...
२०१९च्या प्रयागराज कुंभमेळाच्या वेळी पहिल्यांदा काशीला भेट दिली आणि आता नुकताच देवदिवाळी निमित्ताने पवित्र अशा काशीमधील गंगा घाटावरील देवदुर्लभ अशी दिवाळी अनुभवली. त्यावेळी काशीचे स्वरूप आणि आताचे बदलेले काशी बघून आनंद वाटला. देवदिवाळीचा खरंतर हा अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यावा, असं मनापासून वाटतं. कारण, या पर्वकाळात काशी शहरच नाही, तर गंगेचे सगळे घाट दिव्यांनी प्रकाशित झाले असतात.
या शहराला ‘काशी’ नावाच्या प्राचीन वेदकालीन राष्ट्रावरून हे नाव पडले, असावे असे दिसते. या काशी राजाला ‘काशीराज’ असे म्हणत असत व या काशीराजासंबंधी पुष्कळ दंतकथा या प्रांतांत प्रचलित आहेत. काशी याचा धातू (काश्) अर्थात चकाकणे, असा आहे. यावरूनच ‘ज्ञानाच्या प्रकाशाने उजळणारी भूमी म्हणजे काशी’ असेही असावे. पण, काशी शहराला ‘काशी’ हे नाव पडण्यापूर्वी ‘वाराणशी’ हे नाव असावे असे दिसते. ‘वरणा’ व ‘असि’ या दोन नद्यांमधील प्रदेशांत हे शहर वसले असल्याने या शहराला ‘वाराणसी’ हे नाव पडले असावे, अशीही समजूत आहे.
काशीमधील सर्व देवळांचे यथार्थ वर्णन करावयाचे म्हणजे एक मोठा ग्रंथच होईल. कारण, इथं पाऊल पडेल, तिथे मंदिरं बघायला मिळतात. ‘मंदिरांचे शहर’ म्हणूनही काशीचे आपले ऐतिहासिक महत्त्व आहे. या काशीतील सर्वांत प्रमुख मंदिर म्हणजे काशी विश्वनाथाचे मंदिर होय. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे मंदिर म्हणजे या शहराचे वैशिष्ट्य जपणारे आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आज हेच मंदिर दिमाखात उभे आहे. हे संपूर्ण मंदिर सोन्याने मढविलेले मंदिर आहे. विश्वेश्वररूपी शिवाची मूर्ती या देवळात असून, ही मूर्ती सर्व शहरांचे संरक्षण करते, असे मानण्यात येते. लिंगात्मक असलेल्या विश्वनाथांच्या या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनार्थ भाविक काशीत कायम येत असतात. परदेशी पाहुण्यांनीसुद्धा हे शहर गजबजलेले दिसते.
प्रयागराज येथील त्रिवेणी संगमानंतर काशी विश्वनाथाचे चरण स्पर्श करण्यासाठी, गंगा इथे जरा वाट बदलते. इथे गंगेचे वेगळे रूप बघायला मिळते. हिमालयातून उगम पावणारी गंगा हरिद्वारला जशी खळखळ वाहते, तशी काशीला हीच गंगा शांत आणि आल्हाददायक वाटते. इथल्या घाटावर बसून गंगेकडे बघितलं, तरी मनःशांती लाभते आणि या गंगेच्या कुशीत तासन्तास बसूनसुद्धा विलक्षण ओढ लावण्याचे सामर्थ्य या गंगा किनारी लागते. काशीविश्वेश्वर हा काशी शहराचा राजा आहे, असे तेथील लोक समजतात. हे स्थान फार पवित्र मानले जाते. काशी विश्वेश्वराच्या खालोखाल भैरवनाथाचे मंदिर महत्त्वाचे मानले जाते. भैरवनाथ याला शहराचा कोतवाल समजतात. ‘काशी कोतवाल’ म्हणूनच तो तसा प्रसिद्ध आहे. राक्षस अथवा दुष्ट लोकांपासून हा शहराचे रक्षण करतो, अशी येथील लोकांची समजूत आहे.
खरंतर गंगा म्हणजे गंगाच आहे. तिचे मंत्रमय, काव्यमय वर्णन करणे तसे सोपे नाही. अशी ही गंगा स्वच्छ, निर्मळ, अविरल वाहते. प्रत्येकाला तिच्या भेटीची ओढ विलक्षण अशीच. आताही गंगामैय्याने बोलावले आणि देवदिवाळी निमित्ताने तिचे दर्शन झाले. खरंतर वैज्ञानिक दृष्टीनेही पाहून झाले, गंगेचे साठविलेले पाणी बिघडत नाही. गंगा म्हणजे पावित्र्याचा प्रेमळ प्रवाह. प्रत्यक्ष भगवान विष्णूच्या चरणकमलातून निघालेले पावित्र्य, शंकराच्या मस्तकावर अवतरले तेथून सेवेची दीक्षा घेऊन, प्रवाह रुपात पृथ्वीवर वाहू लागले. असे म्हणतात की, ज्ञानाचा परिपाक म्हणजे सेवा आणि सेवेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे गंगा. गंगेचा हा उसळता प्रेमप्रवाह पाहून गंगेच्या अवतीभवती असणार्या प्रत्येकाच्या ओठावर सहज शब्द येतात की, ’गंगा मैय्या की जय!’
मला कायम वाटतं, गंगा प्रत्येक भारतीयांचं श्रद्धास्थान आहे. भारतीयाच्या अंगात धमन्यातून रक्त वाहतं, तर मनात गंगेच्या धारा या वाहत असतात. ‘काशीस जावे नित्य वदावे’ असं आपल्याकडे म्हटलं जातं; पण त्या काशीत गेल्यावर आणि दर्शनानेसुद्धा आपले मन प्रसन्न होते. येथील दशाश्वमेध घाटावरील गंगा आरती बघण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. घाटावर बांधलेल्या चौथर्यावर उभे राहून, गुरुजी अतिशय शिस्तबद्ध रितीने गंगेची आरती करत होते. गंगेची आरती झाली. शंखध्वनी घुमला आणि भक्तांनी केलेल्या गंगेच्या जयजयकाराने वातावरण भारावून जाते. खरंच अनुपम्य सुखसोहळा याची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे ही गंगा आरती. आज अनेक परदेशी पाहुणेसुद्धा या गंगा आरतीच्या भक्तीत आकंठ बुडालेले बघून अभिमान वाटला. सनातन आणि नित्यनूतन अशी आपली संस्कृती वर्धिष्णू होते आहे, हीच भावना मनात निर्माण झाली.
आज काशी विश्वनाथाचे स्वरूप बघून क्षणभर अचंबित व्हायला होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला तो भव्य असा कॉरिडोर, त्याच्या मागे साक्षात् श्रीविश्वनाथ, त्याच्या काही अंतरावर काळ्या पाषाणातील भारतमाता, अहिल्याबाई, जगद्गुरू शंकराचार्य यांचे पूर्णाकृती पुतळे, गंगेचा सुंदर आणि स्वच्छ असा किनारा, श्रीतुलसीदास महाराजांनी जिथे बसून ‘मानस’ लिहिलं, तो अश्वत्थवृक्ष खरंच किती आणि काय-काय लिहावं... कबिरांची नगरी, झाशीच्या राणीचं जन्मगाव, मदनमोहन मालवीय यांच्या विचारातून साकारलेलं, काशी जगाचं ज्ञानकेंद्र असण्याची आजही आठवण करून देणारं बनारस हिंदू विद्यापीठ, बनारसी शालू विणून देणार्या विणकरांचं गाव, असं हे काशी पाहता क्षणीच आपलंसं करून जातं आणि पुनःपुन्हा यावंसं वाटतं काशीला.
निवडून दिलेल्या नेतृत्वाची इच्छाशक्ती असेल, तर एखाद्या नगरीचा कायापालट कसा होऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण ठरलेली नगरी म्हणजे ’काशीनगरी.’ या काशीबद्दल कितीही लिहिलं तरी शब्द थिटे होतील, इतकं काशीमाहात्म्य आनंददायी आहे. काशी नगरीतील खाण्याच्या पदार्थांबद्दल लिहायचं म्हटलं, तरी किती वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती या भागात बघायला मिळते, हे इथे गेल्यावरच समजतं. काशीनगरीची खासियत म्हणजे पान आणि ‘खैके पान बनारसवाला’ हे विसरून कसं चालेल? खरंच, इथल्या विड्यासारखाच या नगरीच्या प्रेमाचा लालिमाही आपल्याला वेढून टाकतो.
आज काशी हे विद्यमान पंतप्रधान अर्थात विकासपुरूष नरेंद्र मोदी यांच्या संसदीय क्षेत्रात येत असल्याने जे बदल होत आहेत, ते अभिनंदनीय आणि आनंददायी आहेत. एका शहराचे कायापालट कशापद्धतीने होऊ शकतो, यासाठी काशीदर्शन करायलाच हवे.
सर्वेश फडणवीस
८६६८५४११८१