नागपूर: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात झाली आहे. या अधिवेशन कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडील खात्यांची जबाबदारी मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांकडे दिली आहे.
सध्या राज्यातील मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह २९ मंत्री आहेत. त्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अतिरिक्त खात्यांचा कारभार आहे. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी शिंदे यांनी आपल्याकडील खात्यांचा कार्यभार आपल्या पक्षातील मंत्र्यांकडे सोपवला आहे. स्वतःकडील विभागांचा कार्यभार सांभाळून हे मंत्री अतिरिक्त खात्यांचा कारभार पाहतील.
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे सामान्य प्रशासन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्याके परिवहन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सामाजिक न्याय, विशेष सहाय्य आणि दिव्यांग कल्याण विभाग, मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे माहिती आणि जनसंपर्क, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण आणि वातावरणीय बदल, तर अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्याके खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.