वीर सावरकरांचा अपमान भारत खपवून घेणार नाही; भाजप नेत्याचा काँग्रेसला व उद्धव ठाकरेंना इशारा
08-Dec-2023
Total Views |
मुंबई: वीर सावरकरांचा अपमान करणारे काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने तीव्र जनाक्रोश आंदोलन केले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना उपस्थित होते. मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, अधिकारी आणि भाजयुमो कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला आणि काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
यावेळी तेजिंदरसिंग तिवाना म्हणाले की "देशाच्या स्वातंत्र्याचे सर्व श्रेय एका विशिष्ट कुटुंबाला देऊन आजवर काँग्रेस पक्षाने देशाची लूट केली आहे. परंतु हा नरेंद्र मोदींचा भारत आहे, हा नवा भारत आहे आणि येथे भारताच्या सुपुत्रांना व आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना योग्य तो सन्मान दिला जाईल. स्वातंत्रवीर सावरकर जी आम्हा भारतीयांचा सन्मान आहेत आणि गांधी नेहरू घराण्याचे तळवे चाटणाऱ्या काँग्रेसवाल्यांना त्यांच्या विरोधात काहीही बोलण्याचा अधिकार नाही".
"काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे आणि सत्तेच्या आनंदासाठी सावरकरविरोधी आणि हिंदुद्वेषी काँग्रेसशी हातमिळवणी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना याहूनही मोठी लाज वाटली पाहीजे पण वीर सावरकरांचा अपमान भारत खपवून घेणार नाही, हे सत्तेचे लोभी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी लक्षपूर्वक ऐकावे". असेही ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पूत्र प्रियांक खर्गे यांनी नुकतेच वीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. 'मी विधानसभेचा अध्यक्ष असतो, तर बेळगाव येथील विधानसभेतून सावरकरांचा फोटो काढून टाकला असता. असे वक्तव्य त्यांनी केले होते. शुक्रवार, दि. ८ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपाच्या वतीने आंदोलनही करण्यात आले होते.