स्वा.सावरकर यांचे योगदान काँग्रेसला काय कळणार ?

ठाण्यात खर्गे पुत्राविरोधात भाजपाचे आंदोलन

    08-Dec-2023
Total Views |
bjp protest against priyank kharge

ठाणे : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे मंत्रीपुत्र प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा कर्नाटक विधानसभेतून हटविण्याचे वक्तव्य केल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व ठाणे शहर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरज दळवी यांच्या नेतृत्वात प्रियांक खर्गे यांचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या पुतळ्याला चपला हाणुन लाथाडण्यात आले.यावेळी स्वा.सावरकरांचे योगदान काँग्रेसला लक्षात येणार नसल्याची टिका आंदोलकांनी केली.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज दळवी यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील कोर्टनाका येथे शुक्रवारी झालेल्या आंदोलनात जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदरे, सचिन पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील, नौपाडा महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली वाघुले-भोसले, घोडबंदर महिला मोर्चा अर्चना पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस गुरुप्रसाद (रिंकू) विश्वकर्मा, प्रशांत कळंबटे, सतीश केळशीकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या तीव्र निषेधाच्या घोषणा करण्यात आल्या. तसेच त्यांचा पुतळा कार्यकर्त्यांनी लाथाडला. प्रियांक खर्गे यांच्याबरोबर कॉंग्रेसचाही तीव्र निषेध करण्यात आला. कॉंग्रेस ही केवळ एका घराण्यापुरतीच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान कॉंग्रेसला कधीच लक्षात येणार नाही. कर्नाटक विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतल्यास भाजपातर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही संजय वाघुले यांनी दिला आहे.