रेपो रेट जैसे थे! आरबीआयने दिला सर्वसामान्यांना दिलासा

    08-Dec-2023
Total Views |
 NPIC
 
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने आपल्या पतधोरणात रेपो दरामध्ये कोणताही बदल केला नाही. यापुढे आरबीआयचा रेपो दर ६.५ टक्क्यांवर राहिल. चलनविषयक धोरण समिती (एमपीसी)च्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची घोषणा करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही घोषणा केली.
 
आरबीआयने ६ ते ८ डिसेंबर दरम्यान झालेल्या या बैठकीत रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सलग पाचव्यांदा व्याजदरात कोणताही बदल झाला नाही. याशिवाय, बँक दरामध्ये देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बँक दर ६.७५ टक्के आहे.
 
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना, जीडीपी विकासदराच्या अंदाजात वाढ करण्यात आल्याचे सांगितले. ते म्हणाले की, "चालू आर्थिक वर्षातील जीडीपी वाढीचा अंदाज आधीच्या ६.५ टक्क्यांवरून ७ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय चालू आर्थिक वर्षासाठी ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ महागाई ५.४ टक्के राहण्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे.