नववर्षात नवीन चित्रपटांची रसिकप्रेक्षकांना मेजवानी...

२०२३ हे वर्ष मावळायला आता उरले अवघे काही दिवस.

    08-Dec-2023
Total Views |
New Year Upcoming Movies
 
हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसारखी वैशिष्ट्यपूर्ण ठरले. विविध आशय, विषय, अभिनयातील वेगळ्या शैली असे वेगळे प्रयोग मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांनी केले. आता हे वर्ष संपत असताना, नव्या वर्षात प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. मराठी प्रेक्षकांना त्यांच्या आवडीनुसार आशयांची निवड या नव्या चित्रपटांतून करता येईल. तेव्हा, जाणून घेऊयात २०२४ मध्ये प्रदर्शित होणार्‍या काही मराठी चित्रपटांविषयी...

‘एक दोन तीन चार’

जिओ स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवीकोरी कथा असलेला ‘एक दोन तीन चार’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात दि. ५ जानेवारी, २०२४ रोजी आपल्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘मुरांबा‘ या बहुचर्चित चित्रपटानंतर वरूण नार्वेकर या दिग्दर्शकाचा हा पुढील चित्रपट. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी संयुक्तरित्या लिहिले आहेत. आजच्या तरुण पिढीच्या आयुष्यात डोकावत प्रेम, लग्न अशा गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो, हे विनोदाची अचूक पेरणी करत हलक्या फुलक्या पद्धतीने या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. चित्रपटातील मध्यवर्ती पात्र असलेल्या सायलीची भूमिका वैदेही परशुरामी हिने, तर समीरची भूमिका निपुण धर्माधिकारीने साकारली आहे. याव्यतिरिक्त मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर यांच्यादेखील मुख्य भूमिका या चित्रपटात पाहायला मिळतील.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला. याचा चित्रपटाचा पुढील भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रवीण तरडे लिखित-दिग्दर्शित आणि मंगेश देसाई निर्मित ‘धर्मवीर २... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला शनिवार, दि. ९ डिसेंबर रोजी सुरुवात होणार असून जानेवारीपर्यंत चित्रीकरण पूणर्र् करत एप्रिल-मे महिन्यात चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस असल्याचे निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितले. दरम्यान, ‘धर्मवीर २’मध्ये नेमकी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्या साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट उलगडणार, हे लवकरच समोर येणार असल्याचेही मंगेश देसाई यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना म्हटले आहे.

मैत्री, प्रेम, जिव्हाळा या सगळ्यांना अगदी घट्ट बांधून ठेवणारा ‘कन्नी’ हा चित्रपट पुढील वर्षी मार्चमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हवेत बेभान उडणारा पतंग त्याचा तोल मजबूत कन्नीमुळे सांभाळू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचा, स्वप्नांचा पतंग देखील मैत्री, प्रेम यांची मजबूत ‘कन्नी’ असली की अगदी दूरवर जाऊ शकतो. याच प्रेम आणि मैत्रीच्या ‘कन्नी’ची तरुण, ताजी, मस्तीखोर आणि तितकीच आपलीशी वाटेल अशी गोष्ट म्हणजे ‘कन्नी’ हा चित्रपट दि. ८ मार्च रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. या चित्रपटात हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

'मुसाफिरा’... स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रीत झालेला पहिला भारतीय चित्रपट. मैत्री आणि प्रेमाची नवीन परिभाषा सांगणारा ‘मुसाफिरा’ चित्रपट अभिनेता पुष्कर जोग याने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट दि. २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मैत्री हा प्रेक्षकांसाठी जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे असे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतात, असा पूर्वानुभव. ’मुसाफिरा’ ही देखील अशीच मैत्रीवर बेतलेल्या चित्रपटाची रंजककथा. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गुझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य निर्मित या चित्रपटात, पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

रसिका शिंदे-पॉल