मुंबई : भारताचा परकीय चलनाचा साठा मागच्या आठवड्यात ६०४ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. चार महिन्यांत प्रथमच परकीय चलनाचा साठा ६०० अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे. अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चलनविषयक पतधोरण जाहीर करताना दिली.
शक्तिकांत दास म्हणाले की, "१ डिसेंबर २०२३ रोजी भारताचा परकीय चलन साठा ६०४ अब्ज डॉलर एवढा आहे. हा परकीय चलनाचा साठा देशाची ताकद दर्शवतो. त्यामुळे आयात करताना आम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही. यापूर्वी २४ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा ५९७.९३ अब्ज डॉलर होता.
ऑक्टोबर २०२१ मध्ये देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याने ६४५ अब्ज डॉलर्सचा उच्चांक गाठला होता. पण विनिमय दरातील घसरण थांबवण्यासाठी आरबीआयने परकीय चलन साठ्यातील डॉलर्सची खुल्या बाजारात विक्री केली. त्यामुळे भारताचा परकीय चलन साठ्यात घट झाली होती. पण आता पुन्हा एकदा भारताचा परकीय चलन साठा ६०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे.