सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?

चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

    08-Dec-2023
Total Views |
Chandrasekhar Bawankule on Uddhav Thackeray

मुंबई : विरोधकांच्या इंडी आघाडीत काँग्रेससह सामील असणारे उद्धव ठाकरे आणखी किती वेळा गप्प बसणार. त्यांना स्वातंत्र्यवीराचा वारंवार होणारा अपमान मान्य आहे का? असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मंत्री तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी केलेल्या सावरकरांच्या अवमानाच्या विरोधात नागपूर येथे भाजपातर्फे झालेल्या आंदोलनावेळी बावनकुळे माध्यमांशी संवाद साधत होते.

काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान केला जात आहे असे सांगून श्री बावनकुळे म्हणाले की, भाजपा व महाराष्ट्रातील जनता सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही. प्रियांक खर्गे यांनी त्वरित आपले विधान मागे घ्यावे व जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. उद्धव ठाकरे हे स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात. मात्र हिंदुत्वाचा हा अपमान होत असताना त्यांनी आपली भूमिका महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडावी. अशावेळी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण होत आहे असेही ते म्हणाले.
 
प्रियांक खर्गे यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रियांक खर्गे यांचा पुतळा जाळून आपला संताप व्यक्त केला. नागपूर सोबतच मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयासमोर, दादर स्थानका बाहेर, बोरीवली येथील सावरकर उद्यान, ठाणे ,पुणे , सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर , नाशिक, धुळे, अशा अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करत खर्गे यांचा तीव्र निषेध केला. काही ठिकाणी प्रियांक खर्गे यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळा दहन करण्यात आला.