दामोदर : एक शतकोत्तरी नाट्यचळवळ

    08-Dec-2023   
Total Views |
Article on Damodar Theatre Situation

ना. म. जोशी विद्या संकुल आणि दामोदर हॉल या दोन्ही वस्तूंचे नूतनीकरण करण्याचा निर्णय झाल्यानंतर सुरुवातीला नाट्यगृह पाडण्यात आले. परंतु, नवी वस्तू केव्हा व कुठे उभारणार याविषयी निर्णयात पारदर्शकता नसल्याने कलाकारांनी आणि रसिकांनी आंदोलन पुकारले. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर यांनीही या आंदोलनाला बळ दिल्यानंतर ही चळवळ तीव्र झाली, परंतु त्यामागची कारणे, इतिहास आणि गिरणी कामगारांची नाट्य चळवळ समजून घेण्याचा प्रयत्न या लेखातून घेतला आहे.
 
दामोदर नाट्यगृहाचा विषय तसा जुनाच. चावून चावून चोथा झालेला. पावसाळ्यात पाणी सचून राहणारे, फारशी प्रेक्षक पसंती नसलेले किंवा आर्थिक लाभ फार मिळवू न शकणार्‍या दामोदर नाट्यगृहाविषयी दै. ‘मुंबई तरुण भारत’ आग्रही भूमिका का घेत आहे किंवा कलाकार त्यासाठी आंदोलन का करत आहेत हे मांडणे महत्त्वाचे वाटते. म्हणून.. स्वातंत्र्य मिळवल्यानंतरची आजची तिसरी पिढी. पण स्वातंत्र्य चळवळीसारख्या अनेक चळवळी समांतर कालखंडात होत राहिल्या आहेत. सामाजिक, आर्थिक अभिसरणे आणि कलाविश्वात झपाट्याने होत आलेली, तंत्रज्ञानाचा हात धरून झपाट्याने आपलीमुळे भारतीय समाजव्यवस्थेत पसरवणारीकलाक्रांती स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपली पावले भारतीय भूमीवर उठवत होती. अभिनय, संगीत तसे हिंदूंना नवे नाही. नाचत येणारा वासुदेव असो की गावोगावी रात्री पाटलाच्या वाड्यावर ओट्यावर बसून झालेली कीर्तन आणि निरुपणे, दशावतार यातून आपल्यावर नाट्यसंस्कार होतच असतात. या अभिव्यक्तींना व्यासपीठ देणारे मुंबईतील एक उल्लेखनीय वास्तू म्हणजे दामोदर हॉल.
 
एखाद्या न सुटणार्‍या कोड्यास जसे अनेक आयाम असतात, तसेच या नाट्यगृहाचे आहे. कलाकारांचे या वास्तूशी असलेले नाते. १०० पेक्षा अधिक वर्षांचा इतिहास आणि वारसा, ज्या भावनेतून हे नाट्यगृह उभे राहिले, त्या काळातली सामाजिक परिस्थिती आणि गिरणी कामगारांची नाट्यचळवळ. असं कितीतरी. मुंबई हे ब्रिटिशांनी वसवलेले शहर. तेव्हा पोटासाठी घरदार सोडून मुंबईत स्थायिक झालेल्या गिरणी कामगारांची नाट्यचळवळ सुरू झाली ती याच दामोदर हॉलपासून. ब्रिटिश सरकारच्या सहकार्याने ना. म जोशींनी सामाजिक कार्याचा भाग म्हणून १९११ मध्ये हे नाट्यगृह उभारले. काही ठरावीक जागा समाजकार्यासाठी ब्रिटिशांनी राखून ठेवल्या होत्या. त्यातली ही मोक्याची जागा.

तेव्हा गिरणी कामगार वस्तीच मोठ्या प्रमाणावर या भागात होती. या परिसरात एखाद्या व्यक्तीच व्यक्तिमत्व सर्वतोपरी घडावं असं बरंच काही होतं. शाळा होत्या, महिलांनाही औद्योगिक शाळा होत्या, ग्रंथालय होतं, या सर्वासाठी आरक्षित केलेल्या काही जागांपैकी ही एक. आता गिरणी कामगारांचं आयुष्य ते काय, संध्याकाळचा ६ चा भोंगा झाला की घरी जाऊन जेवणाव्यतिरिक्त हाताला काम नाही, बुद्धीला खाद्य नाही. अशावेळी बर्‍याचदा गिरणी कामगार दारूच्या गुत्त्यावर, जुगाराच्या कोंडाळ्यात दिसत होते. या सर्वांना त्यांना हवंस वाटेल असं काही द्यावं, गैरवर्तनाला आळा बसवायचा तर त्यांच्या हातात मनोरंजनाचं साधन द्यायला हवं. दिवसभर थकलेली माणसं मनोरंजन शोधतात. आपला गाव शोधतात, आपल्या माणसांसोबत घालवलेले क्षण शोधतात.
 
त्यावेळी लालबागला एक छोटं हनुमान थिएटर होतं, तिथल्या नाट्यकर्मींशी बोलून जोशींनीच ही जागा त्या नव्याने नाटक करू पाहणार्‍यांना उपलब्ध करून दिली. पहिल्यांदा आलेले बाबाजी परब. खरे म्हणायचे तर त्यांनीच या संस्थेची, कामगार रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली असे म्हणावे लागेल. हे साल होते १९४२. आता हे नाट्यगृह काही आजच्यासारखे सोईसुविधांनी सज्ज नव्हतं. एक पत्र्याची शेड वजा आडोसा असलेलं खुलं नाट्यगृह. पण अनेक कलाकार या वास्तूने घडवले. कित्येकांना यश लाभत गेलं ते या वास्तूत. अशा केवड्यातरी रंगकर्मींचा संघर्ष, प्रवास आणि चळवळ या वास्तूने पहिली. यापूर्वीच १९२५ साली जोशींनी सहकारी मनोरंजन मंडळ रजिस्टर करवून घेतलं आणि म्हणूनच आशियातील पहिली स्थापन झालेली ही नाट्यसंस्था. आज दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळ दोघांनाही १०० हून अधिक वर्षे होऊन गेली.

या मंडळाची प्रगती, कलाकारांचा विकास आणि नाट्यगृहाचे बदलते रुपडं एकाचवेळी पुढे सरकत होतं. या काळापर्यंत नाट्यगृहाचे सर्व व्यवहार सहकारी मनोरंज मंडळाच्याच हातात होते. पुढे काही कालावधीत समाजसेवक मंडळाचा हस्तक्षेप झाला आणि पुढे पुढे ही वास्तू पूर्णपणे समाजसेवक मंडळाच्या अधिपत्याखाली आली. याचवेळी नाट्यगृहाचे नूतनीकरण वगैरे केले जात होते. खरंतर आश्चर्य वाटतं पण यावेळी सहकारी मनोरंजन मंडळाच्या सदस्यांनी कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. ही सर्व नटमंडळी, जन्मजात चंचल. स्थिरता ही कलेची वैरीण असते असं म्हणतात. संधीसाठी उत्सुक असलेली ही मंडळी राजकारणात रमली नाहीत आणि मिळत गेलेल्या संधीच सोनं करत राहिली. याच काळात नवनवी नाट्यगृह मुंबईत जोम धरत होती. शिवाजी मंदिर नाट्यगृह जवळच आणि नव्याने सुरू झालं होतं. सहकारी मंडळ असं पंगत गेलं. नानासाहेब फाटक, मास्टर दामले, बाळ कोल्हटकर, नैना आपटे, विजय पाटकर, अशा बर्‍याच कलाकारांना या संगीत नाट्य चळवळीने पुढे आणले.

या सर्वांनी या हॉलमध्ये प्रयोग केले आहेत. या मंडळाने ब्रिटिश काळातसुद्धा आपल्या नाटकाचे प्रयोग लावून सरकारला मदत केलीय. याचा अर्थ ही कलावंतमंडळी ब्रिटिश धार्जिणी होती असा होत नाही, तर त्यांना मिळालेल्या नाट्यगृहाच्या माध्यमातून व्यासपीठाचा मोबदला त्यांनी अशा प्रकारे दिला. त्यावेळी ब्रिटिशांनी प्रदान केलेली नऊ सोन्याची, तीन चांदीची पदकं अजूनही मंडळाकडे आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी मंडळ चांगले काम करते म्हणून गौरव केला होता. पुढील काळात मात्र ही संस्था आर्थिकदृष्ट्या काहीशी विंवचनेत आली आणि काळाच्या मागेच पडत गेली. मंडळाला जेव्हा १०१ वर्षे पूर्ण झाली. तेव्हा, सध्याच्या कार्यकारिणीने नूतनीकरणाचा घाट घातला. बाजूलाच असलेले जोशी विद्या संकुल आणि हे नाट्यगृह. दोन्हीचे नूतनीकरण करावयाचे ठरवले. परंतु, शाळा बंद करता येत नाही तेव्हा दामोदर हॉल पाडून त्याजागी शाळेची नवी इमारत उभी राहणार व त्यानंतर नाट्यगृहाचे काय ते ठरवण्यात येईल.
 
मात्र, या सर्व व्यवहाराबाबत स्पष्टता अजूनही नाही. व्यवहारात कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नाही. नाहीतर नूतनीकरण कुणाला नको? ते हवेच. सर्व अद्ययावत सोईसुविधांनी नाट्यगृह संपन्न झाले, तर ते हवेच आहे, तरच त्याकडे रसिकांची पावले लक्ष्मीच्या रूपाने उमटू लागतील. मात्र, ही पारदर्शकता यावी हाच आंदोलकांचा आणि ‘महाएमटीबी’चा आग्रह आहे. इतकेच.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.